नकार आणि स्वीकार

    29-Mar-2024
Total Views |
bjp political strategy in lok sabha election

भाजपतर्फे ज्या खासदारांना तिकीट नाकारण्यात आले, त्यात नवीन चेहर्‍यांसह अगदी दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळे एकीकडे वादग्रस्त नेत्यांना योग्य संदेश देण्यात आला आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे भाजपची ध्येयधोरणे मान्य असणार्‍या सर्वपक्षीय नेत्यांना भाजपने आपली दारे उघडी केली आहेत.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत सात याद्या जाहीर केल्या असून, त्यात ४०० हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भाजप नेते ‘४०० पार’ करण्याचा दावा करत आहेत. या दाव्यात किती तथ्य आहे, हे निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, भाजप प्रत्येक जागेवरील तिकीट वाटपात खूप खोलवर जाऊन विचार करत आहे. यामुळेच यावेळी भाजपने अनेक खासदार आणि बड्या नेत्यांना संधी नाकारलेली दिसते. विशेष म्हणजे, भाजप काही वादग्रस्त खासदारांना कोणताही विचार न करता, बाजूला सारत आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर, प्रवेश वर्मा, रमेश बिधुरी, अनंत हेगडे असे अनेक नेते आहेत, ज्यांची तिकिटे कापून भाजपने स्पष्ट संदेश दिला.वाचाळवीरांच्या वक्तव्यांमुळे सगळेच राजकीय पक्षच बरेचदा अडचणीत येतात. अशा वाचाळवीरांमुळे पक्षाचे नुकसान होते, हे कित्येक उदाहरणांतून अनेकदा सिद्धही झाले आहे. भाजपकडे आज स्वतःचा असा मतदार आहेच. मात्र, भाजप पुढील पाच वर्षांचा नव्हे, तर २०४७ पर्यंतचा विचार करत असल्याचे, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत सत्ता हवी असेल, तर पक्षसंघटना मजबूत असणे आणि पक्षसंघटनेस कुंपणावरच्या आणि कुंपणाबाहेरच्या मतदारांना आपल्याकडे आणणे तितकेच गरजेचे. त्यामुळे जर वाचाळवीरांच्या वक्तव्यांमुळे असा मतदार दूर होणार असेल, तर त्याला आपल्याकडे आणण्यासाठी अशी कारवाई करणे समर्थनीय ठरते.

भाजपची पहिली यादी दि. ९ मार्च रोजी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये १९५ उमेदवारांची नावे होती. पक्षाने पहिल्याच यादीत ३४ विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द केली. यात भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर आणि दिल्लीतील रमेश बिधुरी या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. प्रज्ञा ठाकूर यांनी २०१९ मध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली होती. भाजपनेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना संसदीय संरक्षण सल्लागार समितीतून हटविले होते. तसेच जाहीर सभांपासूनही त्यांना दूर ठेवण्यात आले होते. मात्र, तरीदेखील त्यांची वक्तव्ये सुरूच राहिल्याने, पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली. त्याचप्रमाणे भाजपने दक्षिण दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी यांचे तिकीटही रद्द कापले. बिधुरी यांनी संसदेत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होत्या. गेल्या वर्षी त्यांनी संसदेच्या अधिवेशनात तत्कालीन बसप खासदार दानिश अली यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. याप्रकरणी भाजपने त्यावेळी थेट काहीही वक्तव्य केले नाही; मात्र आता त्यांची उमेदवारी नाकारून योग्य संदेश दिला आहे. दिल्लीचे दुसरे खासदार प्रवेश वर्मा हेदेखील अशाच बाबींसाठी वादग्रस्त ठरत होते, त्यांनाही भाजपने पुन्हा संधी दिलेली नाही. यामध्ये अगदी ताजे उदाहरण हे कर्नाटकमधील तब्बल सहा वेळा खासदार असलेले अनंत हेगडे. हेगडे हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात भलतेच आघाडीवर असतात. ”एनडीएला ४०० जागा मिळाल्या, तर राज्यघटना बदलू,” असे विधान त्यांनी नुकतेच केले होते. हेगडे हे गेल्या २८ वर्षांपासून भाजपचे खासदार आहेत. मात्र, त्यांनाही उमेदवारी नाकारण्याचा धाडसी निर्णय भाजपने घेतलेला दिसतो.
 
भाजपने आतापर्यंत ४०२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यापैकी जवळपास १०० जागा अशा आहेत, जिथे पक्षाने उमेदवार बदलले आहेत. वादात अडकलेल्या नेत्यांपासून पक्ष दूर होताना दिसत आहे. याद्वारे वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या नेत्यांना माफ करणार नाही, असा संदेश पक्षाने दिला आहे. यादीतील सर्व नेत्यांचे कार्यअहवाल आणि त्यांचे वादांशी असलेले संबंध भाजपने लक्षात ठेवले. भाजपने त्या सर्व नेत्यांची तिकिटे रद्द केली. ज्यामध्ये पक्षाला बॅकफूटवर यावे लागले. विशेष म्हणजे, ज्या खासदारांना तिकीट नाकारण्यात आले, त्यात नवीन चेहर्‍यांसह अगदी दिग्गज नेत्यांचाही समावेश होता.एकीकडे वादग्रस्तांना योग्य संदेश देण्यात येत आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे भाजपची ध्येयधोरणे मान्य असणार्‍या सर्वपक्षीय नेत्यांना भाजपने आपली दारे उघडी केली आहे. यामध्ये गुरुवारीच ओडिशाच्या कटकचे खासदार आणि बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते भर्तृहरी महताब यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे ओडिया चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सिद्धांत महापात्रा आणि ‘पद्म’ पुरस्कारार्थी वनवासी नेत्या दमयंती बेश्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधूनही भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांचा ओघ सुरू आहे.

येथूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदीर्घ काळ काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले अनेक खासदार भाजपच्या गोटात आले आहेत. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि पतियाळा येथील खासदार प्रनीत कौर, माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आणि खासदार रवनीतसिंग बिट्टू, आम आदमी पक्षाचे खासदार सुशील कुमार रिंकू आणि जालंधर विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार शीतल अगुराल यांचा समावेश आहे. हरियाणातील कुरुक्षेत्रातून दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नवीन जिंदाल हेदेखील भाजपमध्ये आले असून, त्यांना कुरूक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली आहे. माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते वरप्रसाद राव वेल्लापल्ली यांनी दि. २४ मार्च रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जनार्दन रेड्डी यांनी केवळ भाजपमध्ये प्रवेश केला नाही, तर त्यांनी त्यांचा पक्ष कल्याण राज्य प्रगती पक्षही भाजपमध्ये विलीन केला.मध्य प्रदेशात तर विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक फूट पडली आहे. मध्य प्रदेशातील सुमारे दहा हजार काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या काँग्रेसमधून बाहेर पडण्यात ब्लॉक पातळीपासून ते जिल्हा आणि विधानसभा स्तरापर्यंतचे नेते सामील आहेत.


भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी जानेवारीपासून सुमारे आठ हजार नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, जगतप्रकाश अन्नू (जबलपूर नगराध्यक्ष), शशांक शेखर सिंग, राकेश कटारे (विदिशा जिल्हाध्यक्ष), गजेंद्रसिंग राजुखेडी (माजी खासदार), संजय शुक्ला (माजी आमदार), विशाल पटेल (माजी आमदार), अर्जुन यांचा समावेश आहे. पालिया (माजी आमदार), दिनेश अहिरवार (माजी आमदार), कमलापत आर्य (माजी आमदार) यांच्यासह अनेक प्रसिद्ध नेत्यांचा समावेश आहे.भाजप हा आता देशात केंद्रस्थानी असलेला राजकीय पक्ष. विरोधी पक्षांकडून भाजपवर ’ईडी’, ‘सीबीआय’ यांचा वापर करून, पक्ष फोडण्याचा आरोप होत असला, तरीदेखील या आरोपामध्ये सरसकट तथ्य असल्याचे कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये येण्याचे प्रमुख कारण हे विरोधी पक्षांचे अपयश आहे. काँग्रेस असो की तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष असो की एआयएडीएमके यांनी आपल्या पक्षास कौटुंबिक मालमत्ता बनविल्यामुळे पक्षामध्ये नाराजी निर्माण होणे साहजिक आहे. कारण, राजकारणामध्ये असलेल्या प्रत्येक नेत्यास संधी हवी असते. ही संधी त्यांना त्यांच्या पक्षात मिळणे शक्य नाही, असे लक्षात आल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे, हे अगदीच साहजिक आहे. त्यामुळे अगदी नगरसेवकापासून ते माजी केंद्रीय मंत्र्यापर्यंत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये अनेकांना भाजपला त्यांच्या मूळ भूमिकेचा विसर पडला का, असे वाटू शकते. त्यांना तसे वाटण्यात गैरही नाही. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर या नेत्यांना भाजप आपली भूमिका स्वीकारण्यास भाग पाडते, हेदेखील आतापर्यंत दिसून आले आहे.