महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे मुंबईत ‘बर्ड ट्रेल’चे आयोजन

    29-Mar-2024
Total Views |


bird trail


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्र पक्षिमित्र या संस्थेने रविवार दि. ३१ मार्च रोजी पक्षीनिरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र पक्षिमित्रचे कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी केले असून ते या कार्यक्रमात पक्षी विषयक मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. रविवारी सकाळी ७ ते ९.३० या दरम्यान ही बर्ड ट्रेल असणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये व सामान्यांमध्ये पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी व पक्ष्यांची माहिती व्हावी या दृष्टीने पक्षी निरीक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये करण्यात येणार असून पहिला कार्यक्रम भांडूप पंपिंग स्टेशन आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान पक्षी निरीक्षकांना दोन्ही प्रजातींचे फ्लेमिंगो पक्षी तसेच परतीच्या प्रवासातील महत्वाचे व दुर्मिळ स्थलांतरित पक्षी बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पक्षीनिरिक्षणाची ही संधी निशुल्क उपलब्ध केली गेली असून त्यासाठी या संकेतस्थळावर (https://forms.gle/TaPNviePRQgb5Ffo6) नावनोंदणी ही करता येणार आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे दरवर्षी पक्षिमित्र संमेलने, व्याख्याने, पक्षी सप्ताहाचे आयोजन तसेच पक्षी जनजागृती व संवर्धन यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. पक्षीविषयक जनजागृतीसाठी मुंबई येथे प्रथमच निशुल्क पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अशा कार्यक्रमातून महाराष्ट्रातील पक्षी विविधतेची माहिती होऊन पक्षी संवर्धनासाठी उपयोग होऊ शकेल. यातून पक्षीमित्रांचे संघटन मजबूत होण्यास मदत होईल असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केले.