अभिनयातील ‘मुक्त’छंदी व्यक्तिमत्व!

    29-Mar-2024
Total Views |
mukta barve

मालिका, नाटकांपासून ते अगदी चित्रपटांपर्यंत, आजवर विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या मुक्ताच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्याकोर्‍या चित्रपटाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तिच्याशी साधलेला खास संवाद.

सुप्रसिद्ध लेखक विवेक बेळे यांचे ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे अत्यंत गाजलेले नाटक. या नाटकाचे चित्रपट माध्यमांत दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी रुपांतर केले. या चित्रपटात मुक्ता बर्वे भूमिका साकारत असून, त्याविषयी बोलताना तिने सांगितले की, “विवेक बेळे लिखित ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे नाटक मी पाहिले होते. त्यामुळे चांगल्या लेखकाच्या कलाकृतीचा भाग होणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती. मुळात ज्यावेळी नाटकाचे चित्रपटात रुपांतर केले जाते, त्यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो विषय पोहोचण्याची शक्यता तयार होते. त्यामुळे कोणत्याही कलाकृतींचे माध्यमांतर करताना विशेष काळजी घेता आली, तर त्यातून नव्या माध्यमांवर सादर होणारी ती कला प्रेक्षकांना नक्कीच भावेल यात शंका नाही. ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे नाटक जेव्हा मी पाहिले होते, त्यानंतर आता जेव्हा चित्रपटात मी काम केल्यानंतर तो चित्रपट पाहिला, तर तो नाटक न वाटता चित्रपटच वाटला आणि खरंच मी एकाक्षणासाठी नाटक विसरले होते.”

चित्रपटासंबंधीचा एक किस्सा सांगताना मुक्ता म्हणाली की, “ ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटासाठी ज्यावेळी माझे कास्टिंग करण्यात आले, तेव्हा चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मला म्हणाले होते की, तुझ्या डोळ्यात जी वेडसरपणाची झलक आहे, त्याचमुळे चित्रपटातील तुझ्या कास्टिंगला प्राधान्य दिले आहे. ते ऐकल्यावर नक्कीच आनंद झाला. कारण, वेडसरपणा असणे म्हणजे प्रत्येक पात्र साकारताना एक वेड असावे लागते आणि ते माझ्यात लेखक, दिग्दर्शकांना दिसत आहे, हे ऐकून छान वाटते.”सातत्याने वेगळ्या भूमिका साकारणे ही एक आराधना आहे, याबद्दल बोलताना मुक्ता म्हणते की, “अभिनयाची सुरुवात बालनाट्यांपासून केली. त्यानंतर अभिनयाचे शिक्षण घेतले आणि मग पुढे प्रोफेशनल आणि कर्मशियल अभिनयाची वाटचालदेखील सुरू झाली. या संपूर्ण प्रवासात अनेक चढ-उतार, आवडी-निवडी या सगळ्यांचा सामना करत आज जी मुक्ता बर्वे तुम्हाला अभिनेत्री म्हणून दिसते, तिला घडवण्यासाठी अनेकांनी मदत केली आहे. आजवर मी ज्या विविध भूमिका साकारल्या, त्या पूर्णत्वास नेण्यासाठी उत्तम लेखक आणि दिग्दर्शकांची साथ लाभली. कारण, उत्तम लिखाण आणि ते पडद्यावर कसे दिसायला हवे, याबद्दल कलाकाराला माहिती आणि मार्गदर्शन देणारा दिग्दर्शक असेल, तर ती कलाकृती ही अजरामरच होते, यात शंकाच नाही.”

पुढे बोलताना मराठी चित्रपट चालत नाही यावर अनेक लोकं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर आधारित चित्रपट येतात; बरं ते पाहण्यासाठी प्रेक्षकही चित्रपटगृहात जातात. पण, अगदीच कधीतरी ‘सैराट’सारखाच चित्रपट चालून जातो, ‘बाईपण भारी देवा’ किंवा ‘मुंबई-पुणे-मुंबई’सारखे वेगवेगळे आशय मांडणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येतात. त्यामुळे मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षक येत नाहीत, असे मी म्हणणार नाही. पण, काही गोष्टी जुळून आल्या म्हणजे काय तर ठरावीक चित्रपट योग्य वेळी प्रदर्शित होणे, त्याचे प्रमोशन होणे, चित्रपटगृहात शो मिळणे यादेखील गोष्टी महत्त्वाच्या असतात. एखादा चित्रपट आला आणि गेला; त्याबद्दल प्रेक्षकांना काही समजले नाही, तर कोणताही चित्रपट मोठा होणार नाही. कारण, एका चित्रपटासाठी बरेच हात झटलेले असतात, पैसे अडकलेले असतात त्यामुळे त्या चित्रपटाला योग्य न्याय मिळणे फार गरजेचे असते.

याशिवाय मनोरंजनाची जी विविध माध्यमं घरबसल्या प्रेक्षकांना मिळाली आहेत, त्यांच्यापासून त्यांना जरा वेळ लांब ठेवणारा दमदार आशय जर का चित्रपटातून प्रेक्षकांना मिळाला, तर त्याचाही फायदा मराठी चित्रपटांना नक्कीच होईल,” असे म्हणत मुक्ताने आपल्या कामाचे आणि भूमिकेचे श्रेय दिग्दर्शक आणि लेखकांना दिले.कलेची व्याख्या सांगताना मुक्ता म्हणाली की, “रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब म्हणजे कला आणि कलेचे प्रतिबिंब रोजच्या जगण्यात असते, हे वाक्य जरी जुनं असलं तरी ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जसे सामान्य माणसांचे रोजचं जीवन बदलत आहे, तसा रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा आविष्कारदेखील बदलत आहे. त्यामुळे बदल होत राहतात, मनोरंजनाची माध्यमं बदलतात. जसे की ‘ओटीटी’ हे नवं मोठं माध्यम प्रेक्षक आणि कलाकारांसाठी उदयास आले आणि त्यात विषयांना वेगळ्या पद्धतीने वाचा फोडण्यात आली, सादरीकरणातले वेगळे स्वातंत्र्य आले, तर या सगळ्यामुळे कला मोठी होत आहे, याचा एक अभिनेत्री म्हणून अभिमान आणि आनंद आहे.

पण, मला एक गोष्ट कलाकार आणि प्रेक्षकांच्या बाबतीत खात्रीने वाटते की, चांगल्या भावनेने कोणतीही कलाकृती तयार केली असेल, तर प्रेक्षक त्याला उत्तम आणि मनापासून प्रतिसाद देतात. आपला प्रेक्षक हा प्रामाणिक आणि प्रांजळ असतो, असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण, त्यांना आवडली नाही कला की ते पाठ फिरवतात, पण एखादी कला आवडली तर पाठदेखील थोपटतात. याचा सार हाच की, प्रेक्षकांना मनोरंजकरित्या गोष्ट सांगणं ही आम्हा कलाकारांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. ”‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटानंतर मुक्ता परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातदेखील एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.


रसिका शिंदे-पॉल