वंचित...

    29-Mar-2024
Total Views |
ravindra dhangekar


सध्याचा मौसम निवडणुकांचा. लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्ष आणि ही निवडणूक लढवू इच्छिणार्‍या हौशींचीही चंगळ. राजकीय पक्षांपासून ते माध्यमांपर्यंत सर्वत्र नुसती राजकीय धुळवड. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून, ज्यांना या देशात खुर्चीची सवय जडली होती, त्यांना मोदींना बदनाम करून, कसेही ही खुर्ची पुन्हा बळकावयची आहे. सत्तेसाठी मग काहीही अशी होड लागल्याचे दिसून येते. कोणत्याही विधायक कामाचे मूल्यमापन न करता, हे सगळे मोदी विरोधक एकत्र आले असले, तरी ते कसे एकमेकांपासून वंचित आहेत, हेच आता दिवसेंदिवस जनतेच्या देखील लक्षात येऊ लागले आहे. एकीकडे आम्ही एक आहोत. आमची वज्रमूठ आहे, मोदींना गाडायचेच आहे, अशा वल्गना करणार्‍यांची उमेदवारी देताना, काय स्थिती झाली आहे, हे जनतेच्या समोर आहेच. मोदींना हे नेते टक्कर देतील, याचीदेखील आता शाश्वती वाटेनासी झालेली. या सगळ्यांना आता ‘वंचित’ म्हणूनच सूज्ञ नागरिक ग्राह्य धरताना दिसतात. काँग्रेस पक्षात नेमके काय सुरू आहे, हे त्यांच्याच नेत्यांना माहीत नसते. उमेदवार मिळत नाही म्हणून चक्क पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या व्यक्तीला तिकीट देण्याची वेळ आलेल्या, या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे जातपडताळणी प्रमाणपत्रदेखील बोगस निघते. त्यामुळे या पक्षाचा अंतर्गत कारभार तरी किती दर्जेदार असावा, याबाबत शंका उपस्थित करायला वाव आहे.राज्यातील उबाठा गटाने काँग्रेसची कोंडी केल्यावर देखील हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांसाठी पुढाकार घ्यायला तयार नाही, हे भीषण वास्तवदेखील काँग्रेस पक्षात समोर आले आहे. मोदींनी केलेल्या कामांचा एकीकडे लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे मोदींनी काहीच केले नाही, असा डंका पिटायचा, हे या विरोधकांना अगदी मुखोद्गत झालेले. त्यामुळे या वंचितांची डाळ शिजते कशी आणि खिचडी बनते किती, याचे उत्तर दि. ४ जूनला मिळणार आहे, एवढे मात्र नक्की.

 
संचित...


एकीकडे राज्यातील विरोधी पक्षांना सत्तेपासून वंचित राहावे लागणार असल्याची चिन्ह ठळकपणे दिसत आहेत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेच्या भल्यासाठी जे संचित करून ठेवले, त्याची अनेक उदाहरणे तर नागरिकांना दिसतच आहेत. मात्र, देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे या लोकांच्या हातात सत्ता देऊनदेखील कल्याणकारी योजनांचा लाभ ते नागरिकांना देऊ शकले नाही. त्या योजनांचा लाभदेखील या दहा वर्षांत नागरिक घेत असल्याने, या संचिताच्या विश्वासावरच आता येत्या निवडणुकीत मतदार ’विकसित भारता’साठी कौल देणार आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाही.या देशात मोदी सरकार विरोधात कितीही ‘नॅरेटिव्ह’ पसरविले गेले, अपप्रचार केला गेला, तरी जनतेचा विकास करणारे कोण आणि केवळ स्वतःचा विकास करणारे कोण, हे आता पूर्णपणे कळून चुकले आहे. स्वतः काय दिवे लावले, हे सांगता येत नाही आणि मोदींनी काहीच केले नाही, हे सांगताना साधी लाजही वाटत नाही, असे या विरोधकांचे वर्तन. काय तर म्हणे, मोदी या देशाची राज्यघटना बदलणार आहेत वगैरे अतिरंजित दावे. पण, या देशातील जनता आता एवढी खुळी तर नक्कीच नाही की, ते आता या गोष्टींवर विश्वास ठेवतील.अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात डांबण्यात आल्याचे देखील विरोधक राजकारण करीत आहेत. मग घोटाळे करणार्‍यांना तुरुंगात नाही, तर काय देवळात आणून बसवायचे काय, असा सवाल आता नागरिक करीत आहेत. देशातील जनता सूज्ञ आहे. देशात दहा वर्षांत मोदींनी ’विकसित भारता’चा केलेला प्रशस्त मार्ग जर आपण या विरोधकांच्या हाती सोपविला, तर यावर भ्रष्टाचाराचे मैलाचे दगड हे लोक आणून बसवतील, याची जनतेला पूर्ण खात्री पटली आहे. त्यामुळे मोदींचे संचित जपण्याचे भान या देशातील सुज्ञास आहेच! हेदेखील दि. ४ जूनला कळेल, यात शंका नसावी.

 
अतुल तांदळीकर