कल्पक ‘मिसाईल मॅन’

    29-Mar-2024
Total Views |
Mahendra Lonare

पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी धडपडणारे, ठाण्याचे ‘मिसाईल मॅन’ महेंद्र लोणारे या कल्पक अभियंत्याविषयी...


ठाण्यातील गायमुख येथील कशेळी पाड्यात राहणारे, महेंद्र लोणारे यांचा जन्म दि. ७ मे १९६८ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील उमरठा या खेडेगावात झाला. महेंद्र यांचे वडील रघुनाथ हे गावी सुतारकाम करीत असल्याने, नवनिर्मितीची कल्पनाशीलता त्यांच्या अंगी बाणवली होती. वडिलांनाही त्यांच्या कामात मदत होत असे. याच छंदातून लहानपणी महेंद्र यांनी बैलगाडी, ट्रक, बस अशा खेळण्यातील विविध वस्तू बनवल्या होत्या. खेळण्या-बागडण्याच्या नादात शाळेत नावच दाखल केलेले नसल्याने, शिक्षणाकडे त्यांची पाठ फिरली होती. एक दिवस अपघाताने बालपणीच्या एका मित्राच्या सोबतीने महेंद्र यांनी पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकले. तेव्हा पहिल्याच दिवशी आपल्या हुशारीची चुणूक दाखवल्याने, शिक्षकांनी महेंद्रचे नाव शाळेत दाखल करून घेतले. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेताना पहिली ते सातवीपर्यंत महेंद्र यांनी परीक्षेत पहिला क्रमांक कधीच सोडला नाही.
 
पुसद येथे माध्यमिक शिक्षण घेऊन, तद्नंतर विज्ञान शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर ते मॅकेनिकल इंजिनिअर बनले. शिक्षण सुरू असतानाच, वाचनाचा अफाट व्यासंग असल्याने, त्यांनी विविध लेखकांच्या पुस्तकांचा अक्षरशः फडशा पाडला. ‘विदर्भातील माती’ यावर एक कादंबरीही लिहिली. मात्र, यातील एकही लेखन आजवर ते प्रकाशित करू शकलेले नाहीत. लेखक होण्यासाठी म्हणून १९८७ साली मुंबई गाठली. तेथून ठाण्यात विसावले. पण, लेखनाने पोट भरणार नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी एका कंपनीमध्ये ’मेंटेनन्स मॅकेनिक’ म्हणून कामाला सुरुवात केली. कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, अभियांत्रिकी क्षेत्रातील फायबर ग्लास फिल्डमध्ये शिरकाव केला. ऑटोमोबाईल्सचे पार्ट बनवत असताना विविध मोल्ड, पॅटर्न यांकडे लक्ष केंद्रित केले. इतकेच काय तर नवशिक्या लोकांसाठी उपयुक्त ठरणारे, या विषयावरील एक पुस्तकदेखील त्यांनी लिहिले; पण तेही प्रकाशित होऊ शकले नसल्याचे ते सांगतात.

फायबर मोल्ड हे क्षेत्र म्हणजे कला आणि अभियांत्रिकी यांचा संगम आहे. आजपर्यंत त्यांनी ’क्रिएटिव्ह मोल्डर्स’ या त्यांच्या कंपनीद्वारे हजारो प्रकारच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्यात पत्रे, दरवाजे, बाथटब, ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिकल्स, केमिकल्स, इंडस्ट्रीज, वॉटर पार्क स्लाईडस, प्राणी, पक्षी, महापुरुषांचे पुतळे, उद्यानामधील खेळणी वगैरेंचा समावेश आहे. याच दरम्यान त्यांच्या वाचनात पृथ्वीवरील हवेच्या प्रदूषणाविषयीचा एक लेख आला.सभोवतालच्या प्रदूषणाची चिंता त्यांना सतावू लागली. पण, चिंता करत बसण्याऐवजी त्यांनी वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी काम करायला सुरुवात केली. लोकवस्तीचा अभ्यास करून, प्रदूषण नियंत्रित करणारी एक मिसाईलच त्यांनी विकसित केली. ही मिसाईल वातावरणातील विषारी घटक शोषून, शुद्ध हवा बाहेर सोडणारी होती. आकाराने लहान असली, तरी ही मिसाईल अवघ्या १३ मिनिटांत धुराने भरलेल्या १०० चौरस फूट घरातील हवा स्वच्छ करते. ५०० ‘एक्यूआय’ (एअर क्वालिटी इंडेक्स) क्वालिटीची हवा दहा मिनिटांत १०० ‘एक्यूआय’ क्वालिटीवर आणते. एका तासात चारपट एरिया क्लीन करते. घर, दुकान, बस थांबा, रेल्वे स्थानक, गॅरेज अशा कोणत्याही ठिकाणी ती सहजपणे ठेवता येते. म्हणूनच परिसरातील लोक तिला प्रदूषणापासून वाचवणारी मिसाईल आणि महेंद्र यांना ’मिसाईल मॅन’ म्हणू लागले.
 
तुटपुंजी साधने आणि आर्थिक विवंचना असल्याने त्यांनी अगदी कमी खर्चात हे काम केले. ज्या ठिकाणी ही मिसाईल बसवली जाते, त्या परिसरातील हवेतील धूळ, धूर, कार्बन डायऑक्साईड आत घेऊन शुद्ध हवा बाहेर सोडली जाते. तिच्यात त्यांनी वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवली. ही प्रणाली सर्वत्र वापरात आणली, तर प्रदूषण नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे तापमानवाढीचा वाढता वेग कमी करता येऊ शकतो, असा विश्वास महेंद्र यांना वाटतो.दरम्यान, या मिसाईलच्या उपकरणाआधी त्यांनी वाहनांमधून कार्बनयुक्त धूर शोषून घेणारी यंत्रणा तयार केली. या उपकरणाचे त्यांनी २०१९ मध्ये ’पोल्यूशन कंट्रोल सिस्टम ऑन रोड’ नावाने पेटंट नोंदणीकृत करून घेतले. वाहनांच्या धुरामधील कार्बन पाण्याच्या टाकीत जमा करून, तो इतर आवश्यक घटकांसाठी वापरता येतो. रस्त्यावरून वाहने धावत असताना अथवा सिग्नलवर उभी असताना वाहनातून निघणारा धूर ही यंत्रणा आपल्याकडे ओढून घेते आणि धुरामध्ये असणारा कार्बन पाण्यात जमा करून ठेवते. त्यामुळे तिथला परिसर वाहनांमधून निघणार्‍या विषारी धुरापासून मुक्त होतो.


“माझ्या या उपकरणाचे पेटंट नोंदणी केल्यानंतर, प्रदूषण रोखणारे दुसरे उपकरण तयार केले आणि त्याला मिसाईलचा आकार दिला. शासनाने या उपकरणाचा वापर करावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला; पण योग्य प्रतिसाद मिळाला नाही,” असे ते सांगतात.हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती स्वागतार्ह आहे. पण, चालत्या वाहनातच त्याचे चार्जिंग व्हावे, यावर त्यांचे काम सुरू आहे. ”जग हे सतत बदलत असतं, आजच्या समस्या उद्या नसतात. उद्या वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्याप्रमाणे माणसाच्या गरजाही बदलत असतात. तेव्हा त्यावर लक्ष ठेवून, नव्या पिढीने नवनिर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे,” असा संदेश ते देतात. अशा या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झटणार्‍या, कल्पक अभियंत्याला पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

 
- दीपक शेलार