वसंत मोरेंचं ठरलं, 'वंचित'कडून पुणे लोकसभेची उमेदवारी?

    29-Mar-2024
Total Views |
Vasant More met prakash Ambedkarमहाराष्ट्र :     मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांच्याकडून उमेदवारी मिळविण्याकरिता विविध पक्षांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. आता वसंत मोरे यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यात आली आहे. दादर येथील राजगृह येथे वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पुणे लोकसभा उमेदवारीबाबत खलबतं सुरू आहेत.

दरम्यान, पुण्यात वंचितच्या पांठिब्याकरिता वसंत मोरे आग्रही असून पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच विचार करेन, असेही वसंत मोरे यांनी सांगितले. वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असून त्यांच्याकडून विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. आंबेडकरांच्या भेटीआधी मोरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता वसंत मोरे यांना कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार का, याबाबत राजकीय आखाड्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.

 
वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी पुणे लोकसभा जागेबाबत चर्चा होणार आहे. तसेच, वसंत मोरे यांना लोकसभा निडवणूक लढवायची आहे, तशी इच्छादेखील त्यांनी बोलून दाखवली आहे. आता आंबेडकर यांच्या भेटीनंतर वंचितकडून उमेदवारी मिळण्याची आशा वसंत मोरे यांना आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यासंदर्भात कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

पुणे लोकसभा जागांवर भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. महायुतीकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर मविआकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, वंचितने मविआतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांना उमेदवारी देऊन पुण्यातील राजकारण ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केले जाऊ शकतात. एकंदरीत, प्रकाश आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेतात, तसेच वसंत मोरे वंचितमध्ये प्रवेश होईल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.