भारतातील प्रत्येक गावात पोहोचवणार डिजीटल तंत्रज्ञान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

29 Mar 2024 18:35:16
PM Narendra modi digital technology


नवी दिल्ली :    भारतातील प्रत्येक गाव आणि गावातील प्रत्येक मुला-मुलींपर्यत डिजीटल तंत्रज्ञान आणि त्याद्वारे शिक्षण पोहोचविण्याचे आपली लक्ष्य असून त्यामध्ये यश दृष्टीक्षेपात आले आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबतच्या विशेष संवादात व्यक्त केला.

मायक्रोसॉफ्ट या जगातील प्रमुख तंत्रज्ञान उद्योगाचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांच्या ७, लोककल्याण मार्ग या अधिकृत निवासस्थानी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी एआयचा वाढता वापर, कोरोना लसीकरण, हवामान बदल, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

भारतातील डिजीटल क्रांतीविषयी बिल गेट्स यांनी पंतप्रधानांनी प्रश्न विचारला असता पंतप्रधानांनी भारतीय डिजीटल क्रांतीची गाथा त्यांना सांगितली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा जगात डिजिटल विभाजनाबद्दल ऐकायचो, तेव्हा भारतात अशाप्रकारचे विभाजन कधीही होऊ न देण्याचा चंग आपण बांधला होता. सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज आहे. त्यानुसार भारतात डिजीटल क्रांती घडली असून त्यामागे लोकसहभागाचा सर्वांत मोठा वाटा आहे. भारतातील सर्व स्तरातील नागरिकांनी डिजीटल क्रांती आपलीशी केली आहे.
भारतातील महिला तर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास अधिक खुल्या आहेत. केंद्र सरकारने ‘नमो ड्रोन दीदी’ योजना सुरू केली असून ही योजना वेगाने प्रगती करत आहे. एकेकाळी सायकलही न चालवणाऱ्या आमच्या देशातील माता आणि भगिनी आज मोठ्या विश्वा,ने अगदी सहजपणे ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहेत. खेड्यापाड्यातून प्रत्येक मुलाला डिजिटल शिक्षण देणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. जेव्हा जग कोरोनाची लस देऊ शकत नव्हते, तेव्हा भारताने कोविन ॲपद्वारे लोकांना लस उपलब्ध करून दिली. या ॲपवरून कोणती लस घ्यावी आणि लसीसाठी कोणता टाईम स्लॉट उपलब्ध आहे हे समजणे सोपे होते. भारताने कोरोना लसीचे प्रमाणपत्रही ऑनलाइन दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांनी तंत्रज्ञान, एआयची भूमिका आणि त्याचे फायदे – तोटे यावर चर्चा केली. जी२० शिखर परिषदेदरम्यान एचा वापर कसा केला गेला हे देखील पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. काशी तमिळ संगम कार्यक्रमादरम्यानचे त्यांचे हिंदी भाषण तमिळमध्ये कसे भाषांतरित केले गेले आणि नमो ॲपमध्ये एआयचा कसा वापर केला गेला, हे यावेळी सांगितलं. पंतप्रधान म्हणाले की पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीदरम्यान भारत मागे राहिला, कारण भारत ही वसाहत होती. मात्र, आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

एआयच्या गैरवापरावरही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, जर अशी चांगली गोष्ट कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय लोकांना दिली गेली, तर त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. एआय सामग्रीवर वॉटरमार्क देखील ठेवला पाहिजे, जेणेकरून कोणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. भारतासारख्या लोकशाही देशात कोणीही डीपफेक वापरू शकतो. डीपफेक सामग्री एआयव्युत्पन्न आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. तसेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण काय करावे आणि काय करू नये, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0