दुःखदायक चित्रकथेला पुन्हा मागणी

    29-Mar-2024
Total Views |
Joe Sacco

जो सॅकोने काही वेगळं पाहिलं आणि क्रमशः नऊ चित्रकथा चितारून, त्याने पॅलेस्टाईनी अरब्यांच्या अवस्थेचं एक वेगळं चित्र लोकांसमोर मांडलं. पुढे त्या नऊ चित्रकथा एकत्र करून, त्याचं ‘पॅलेस्टाईन’ असं एकत्रित पुस्तक निघालं.

जोसॅको हा एक अमेरिकन वार्ताचित्रकार आहे. म्हणजे काय? वार्ताहर किंवा बातमीदार हा शब्दांच्या माध्यमातून, वर्णनाद्वारे एखाद्या घटनेची बातमी लोकांपर्यंत पोहोचवतो. एक प्रकारे शब्दांद्वारे तो त्या घटनेचं चित्र वाचकांसमोर उभं करतो. छायाचित्रकार किंवा प्रकाशचित्रकार हा मुख्यतः कॅमेर्‍याने टिपलेल्या चित्राद्वारे एखादी घटना वाचकांसमोर मांडतो. या चित्रातले तपशील देण्यापुरतेच शब्द तिथे वापरलेले असतात. मुख्य वर्णन चित्राद्वारेच केलेलं असतं.प्रचलित काळातलं कोणतंही वर्तमानपत्र हे लिखित शब्दांमधील बातमी ही मुख्य आणि त्या मजकुराला साहाय्यक म्हणून चित्र अशा स्वरुपाचं असतं. एके काळी ‘लाईफ’ हे अमेरिकन मासिक चित्रांवर आधारित बातम्यांसाठी प्रसिद्ध होतं. म्हणजे चित्र मुख्य आणि शब्द त्याचे साहाय्यक असा त्याचा आराखडा असायचा.मासिकं, दिवाळी विशेषांक आणि पुस्तकं यांच्यात चित्रांचा आणखी एक वेगळा प्रकार आढळतो. लेख किंवा कथा यांच्यातल्या एक किंवा अनेक पात्रांचा समावेश असणारं, चित्रकाराने हाताने रेखाटलेलं चित्र, म्हणजेच ’इलस्ट्रेशन.’ उदाहरणार्थ, चित्रकार वसंत सरवटे यांनी पु. ल. देशपांडे यांच्या अनेक लेखांसाठी केलेली चित्रं. पुलंच्या लेखनाइतकीच सरवट्यांची ही ‘इलस्ट्रेशन्स’देखील गुदगुल्या करणारी असत.

चित्रांचा आणखी एक प्रकार जगभर सर्वत्र अस्तित्वात असलेला आपल्याला आढळतो. शब्दांमध्ये लिहिलेल्या कथेच्या कागदावरच समासांमध्ये किंवा वर-खाली कुठेही त्या कथानकातल्या घटनांची क्रमवार चित्रे काढलेली असणे. आपल्याकडे आढळलेल्या रामायण-महाभारताच्या ताडपत्राच्या कागदावर लिहिलेल्या प्राचीन पोथ्या, इजिप्तमधल्या पपायरसच्या गुंडाळ्यांवरच्या कथा, युरोपातल्या बायबलच्या प्राचीन हस्तलिखित आवृत्त्या या सगळ्यांमध्ये अशी चित्रं आढळतात. उदाहरणार्थ, राम-लक्ष्मण-सीता वनवासाला निघाले आहेत, असा मजकूर असलेल्या पोथीच्या कागदावरच राम-लक्ष्मण-सीता वल्कले धारण करीत आहेत. कैकयी आणि मंथरा खुषीत आहेत, तर दशरथ, कौशल्या, सुमित्रा शोक करीत आहेत. राम गुहकाच्या नौकेतून गंगा पार करीत आहेत इत्यादी चित्रे रेखाटलेली असतात. बायबलच्या पोथीमध्ये, येशू जन्माला आला या कथानकाच्या पानावर तत्कालिन रोमन सम्राट हेरॉड याने शिरगणती सुरू केली; याकरिता जोसेफ-मेरी यांच्या मूळ गावी आले; तिथे येशू एका गुरांच्या गोठ्यात कसा जन्मला, एक दिव्य तार्‍याने दाखवलेल्या वाटेने तीन शहाणे बाल येशूच्या दर्शनाला कसे आले इत्यादी चित्रे दिलेली असतात. भारतातल्या अनेक कोरीव लेण्यांमध्येही हा प्रकार बघायला मिळतो. स्तुपावर किंवा त्याच्या सभोवती गौतम बुद्धाच्या जीवनातील अनेक घटना कोरलेल्या असतात.

परंतु, फक्त चित्रांद्वारेच एखादी संपूर्ण कथा वाचकांसमोर मांडावी, ही संकल्पना मात्र एकोणिसाव्या शतकातली. १८३७ साली स्वित्झर्लंडमध्ये राहणार्‍या फ्रेंच भाषिक रुडॉल्फ टॉपफर या चित्रकाराला ती प्रथम सूचली. ‘हिस्टोरी डि व्ह्यू बोआ’ म्हणजे ‘व्ह्यू बोआ नामक नायकाची साहसे’ त्याने चित्रे काढून आणि त्या चित्रांमधल्या पात्रांना अगदी कमीत कमी शब्दांचे संवाद देऊन वाचकांपुढे ठेवली.आज आपण ज्याला ‘कॉमिक्स‘ किंवा ‘चित्रकथा’ म्हणतो, त्याची सुरुवात ही अशी झाली. यानंतर १८६१ साली अमेरिकेत यादवी युद्ध पेटलं. खरं तर तोवर कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रणाला सुरुवात झालेली होती. पण, अजून ती कला अगदीच बाल्यावस्थेत होती. यावर अमेरिकी पत्रकारांनी आणि संपादकांनी भलताच नामी तोडगा काढला. रोजचं रणांगण प्रत्यक्ष पाहून त्यावरच्या लढायांची, हालचालींची चित्र रेखाटू शकणारे हुशार चित्रकार त्यांनी रणभूमीवर धाडले. अगदी फोटोग्राफ इतकी तंतोतंत नव्हे; पण प्रत्यक्षाच्या बरीच जवळ जाणारी चित्रे किंवा चित्रमालिका हे चित्रकार झटपट रेखाटीत. वृत्तपत्रांनी नेमलेले खास ‘रनर्स’ ही चित्रे शक्य तितक्या त्वरेने वृत्तपत्र कचेरीकडे घेऊन जात. वाचकांना रणभूमीचा शक्य तितका प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या, या प्रयत्नांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असे.

नंतरच्या काळात छायाचित्रणाची कला वेगाने विकसित होत गेली. पण, म्हणून ‘कॉमिक्स’ किंवा ‘चित्रकथां’चं महत्त्व अजिबात कमी झालं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धावरची शब्दांमध्ये कथा सांगणारी, फोटोग्राफद्वारे घटना दाखवणारी अशी जेवढी पुस्तकं आहेत, तेवढीच कॉमिक्स म्हणजे चित्रकथेद्वारे ती घटना सांगणारी पुस्तकं पाश्चिमात्य देशात निघालेली आहेत आणि तीदेखील चांगली लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ, १९४१-४२ साली जर्मनीचा प्रख्यात सेनानी जनरल रोमेल विरुद्ध अँग्लो-अमेरिकन सेनानी जनरल ऑकिनलेक, जनरल माँटगोमेरी यांच्यात फार भीषण लढाया झाल्या. ‘बॅटल ऑफ एल अलामीन’, ‘बॅटल ऑफ तोब्रुक’, ‘बॅटल ऑफ सीदी रेगेझ’ अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या या वाळवंटी लढायांमध्ये दोन्ही बाजूंची लक्षावधी माणसं ठार झाली. त्यांचा शब्दांमधील वृत्तांत वाचताना आपण थरारून जातो. त्यांचे प्रत्यक्ष फोटो पाहताना आपण सुन्न होतो. पण, त्यांच्यावर आलेल्या चित्रकथांची पुस्तकं पाहताना-वाचताना आपण जणू प्रत्यक्ष घटनास्थळीच आहोत, असा आपल्याला भास होतो. दृश्य माध्यमाची ही मोठी शक्ती आहे.

जो सॅको हा अमेरिकन वार्ताचित्रकार आहे. म्हणजे तो नुसत्या बातम्या लिहीत नाही वा नुसते कॅमेर्‍याने फोटो काढत नाही. तो घटनास्थळी जाऊन एक किंवा अनेक घटना पाहतो, अनुभवतो. शक्य असल्यास संबंधित लोकांशी त्यासंदर्भात बोलतो, गप्पा मारतो, पुढचे-मागचे धागेदोरे जाणून घेतो. मग त्या माहितीतून तो साधारण ३०-३५ पानांची एक चित्रकथा बनवतो. सध्या त्याच्या ‘पॅलेस्टाईन’ या चित्रकथेला एकदम मागणी आली आहे. गंमत म्हणजे, ही कथा नवी कोरी नसून, चक्क जुनी म्हणजे १९९१ साली प्रकाशित झालेली आहे. त्यावेळी ती काही फारशी खपली वगैरे नव्हती. त्यामुळे कॉमिक्स पुस्तकांची वाचनालयं, कॉमिक्स पुस्तकांचे विक्रेते, कुणाच्याच ती फारशी आठवणीत राहिलेली नव्हती. अशा स्थितीत तिला एकदम मागणी यायला लागल्यावर सगळे एकदम चकितच झाले. पण, अमेरिकन लोकांइतके धंद्यात सजग जगात दुसरे कोण असणार? अमेरिकन प्रकाशकांनी वेगाने त्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या छपाईला सुरुवात केली आहे. १९९१ साली फारशा न खपलेल्या चित्रकथेला २०२४ साली एकदम मागणी येण्याएवढं काय आहे तिच्यात?

तुम्हाला जर आठवत असेल, तर आपल्याकडे १९६०च्या दशकात ‘टाइम्स’ वृत्तपत्र गटाने ‘इंद्रजाल कॉमिक्स’ या नावाने प्रथम इंग्रजीत नि मग मराठी, हिंदी, बंगाली आणि गुजरातीत ‘महाबली वेताळ’ आणि ‘जादुगार मॅण्ड्रेक्स’ यांच्या चित्रकथा छापायला सुरुवात केली. या कथा आणि त्यातली चित्रं अमेरिकन होती. पुढे अनंत पै किंवा पै काका यांनी ‘अमर चित्रकथा’ हे स्वतःचं प्रकाशन सुरू करून, त्याद्वारे सर्व भारतीय पौराणिक, ऐतिहासिक कथा चित्रकथा म्हणून ‘कॉमिक्स’ म्हणून वाचकांसमोर ठेवल्या. शिवाय ‘सुपरमॅन’, ‘बॅटमन’, ‘टिनटिन’ वगैरे अमेरिकन ‘कॉमिक्स’ येतच असत. काही वृत्तपत्रं रोज जेम्स बॉण्डच्या कथेवर आधारित चित्रपट्टी-कॉमिक स्ट्रिप छापत असत. देश कोणताही असो वा नायक कुणीही असे, या चित्रकथांमध्ये अखेर सत्य असत्याचा पराभव करीत असे.जो सॅको १९९१च्या आसपास पॅलेस्टाईन-गाझा-इस्रायल या परिसरात वार्ताहर म्हणून फिरला, तेव्हा पॅलेस्टाईनी अरबांचा ‘इंतिफदा’ सुरू होता. ‘इतिफदा’ म्हणजे विद्रोह. गाझा आणि वेस्ट बँकमधल्या पॅलेस्टाईनी अरब्यांनी इस्रायल सरकार विरुद्ध विद्रोह पुकारला होता. म्हणजे जमेल त्या मार्गाने तो इस्रायल सरकार विरुद्ध आपण असंतोष व्यक्त करीत होते आणि इस्रायली पोलीस, लष्कर त्यांना बदडून काढत होतं. पश्चिमी प्रसारमाध्यमं आणि पत्रकार साहजिकच इस्रायलच्या बाजूने बातम्या रंगवत होते. म्हणजे इस्रायल हिरो नि पॅलेस्टाईनी अरब हे व्हिलन!

पण, जो सॅकोने काही वेगळं पाहिलं आणि क्रमशः नऊ चित्रकथा चितारून, त्याने पॅलेस्टाईनी अरब्यांच्या अवस्थेचं एक वेगळं चित्र लोकांसमोर मांडलं. पुढे त्या नऊ चित्रकथा एकत्र करून, त्याचं ‘पॅलेस्टाईन’ असं एकत्रित पुस्तक निघालं. कसा आहे या चित्रकथेला बाज? हा एक मसला पाहा-खान युनीस हे गाझा पट्टीच्या दक्षिणेकडचं एक शहर. एका नाक्यावर एकदम कालवा होतो. धडाधडा गोळ्यांचे आवाज. जीन्स, टी-शर्टमधील एक अरब तरूण कोसळतो. बाकीचे पसार होतात. इस्रायली सैनिक त्या तरुणाला एका रुग्णवाहिकेत चढवीत आहेत. तोच जवळच्या वस्तीतून त्याची आई छाती पिटत तिथे येते. पण, तिला त्याला बघूही दिलं जात नाही. रुग्णवाहिका निघून जाते. तेवढ्यात त्या बाईचा दुसरा मुलगा आणि अन्य नातलग तिथे येतात. ते एक टॅक्सी पकडून रुग्णालयाकडे जाऊ पाहतात. इस्रायली पोलीस त्यांना दांडक्यांनी मारतात. त्यात एका मुलाचा हात मोडतो, तरी ते लोक कसेबसे टॅक्सीत बसत असतात. तेवढ्यात एक सैनिक रस्त्यावरचा एक दगड उचलतो आणि यांच्या दिशेने भिरकावतो. तो या बाईच्या पायाला लागतो. पण, चकार शब्द न बोलता, सगळे टॅक्सीत बसतात नि रुग्णालय गाठतात. तिथे त्या आईला समजतं की, आपला मुलगा ठार झाला आहे.

जो सॅकोच्या प्रत्येक चित्रकथेत तो स्वतः देखील असतो. एका चित्रकथेत एका म्हातारा अरब त्याला म्हणतो, “हे असंच चालू राहणार. ज्यूंच्या नव्या वसाहती. त्यांच्यासाठी आमच्या जुन्या वस्त्यांची हकालपट्टी. मग दंगे. मग जास्त सैनिक. मग आणखी छळ, आणखी शिवीगाळ.” त्यावर जो सॅको विचारतो, ‘’शांततेच्या वाटाघाटींचं काय?” तो म्हातारा हसून उद्गारतो की, ‘’त्या सुरू होण्यापूर्वीच संपल्या.”आता या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की, जो सॅकोचं चित्रकथा लेखन हे समाजवादी-साम्यवादी-उदारमतवादी छापाचं आहे. इस्रायली सैनिकांच्या गोळीबारात बळी पडलेल्या तरुणांच्या विलाप करणार्‍या आयांचं चित्रण करून, तो वाचकांच्या भावना अरबांच्या बाजूला वळवू पाहतो. पण, अरबांच्या विद्रोहात असंख्य निरपराध ज्यू नागरिक ठार झाले आहेत, त्याचं काय? की त्यांना, त्यांच्या आयांना दुःख झालंच नाही? सध्या गाझा पट्टीत जी धुमश्चक्री सुरू आहे, ती कुणी सुरू केली? दि. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ‘हमास’च्या अरब अतिरेक्यांनी गाझा पट्टीत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले चढवून १ हजार, २०० इस्रायली माणसं ठार मारली. अतिरेक्यांनी पोलिसांवर, सैनिकांवर हल्ला करणं, हेदेखील समजता येईल; पण हे सर्व हल्ले सर्वसामान्य नागरिकांवर होते. लहान आणि तरूण मुलींना अतिशय हिडीस प्रकारे बलात्कार करून ठार मारण्यात आलं. मग इस्रायली सैन्याचा जो जबरदस्त प्रत्याघात सुरू झाला, तो आज पाच महिने उलटून गेल्यावरही चालूच आहे. इस्रायलमधल्या त्या निरपराध बळींच्या आयांच्या मुलाखती घेऊन, त्यांचे आक्रोश आपल्या चित्रकथेद्वारे लोकांपर्यंत कोण पोहोचवणार?इस्रायलने आपल्या कारवाईची व्याप्ती आता लेबेनॉनपर्यंत वाढवली आहे. अरब मजबूत मार खात आहेत. बहुधा त्यामुळे अरबांबद्दल लोकांना कळवळा यावा म्हणून कुणीतरी ‘पॅलेस्टाईन’ चित्रकथा होलसेलमध्ये विकत घेऊन, फुकट वाटप करीत असणार.


 
- मल्हार कृष्ण गोखले