गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; चित्रकारावरुन ठेवले पालीचे नाव

28 Mar 2024 17:17:07
gecko


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
तामिळनाडू राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरुन पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध महाराष्ट्रातील संशोधकांनी लावला आहे (two new species of gecko). ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरु असलेल्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळून आल्या (two new species of gecko). नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आलेला आहे. (two new species of gecko)

‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरुन त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केलेला आहे. हे संशोधनामधे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग आहे.

गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरुन दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळ्या ठरतात. नव्याने शोधलेली 'निमास्पिस व्हॅनगॉगी' ही प्रजात तामिळनाडू राज्यातील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामधे आढळून आली. 'निमास्पिस व्हॅनगॉगी' या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरुन केलेले आहे. या पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या ' द स्टारी नाईट' या चित्राशी मिळतीजुळती आहे. 'निमास्पिस सथुरागिरीएन्सिस' ही प्रजात तामिळनाडूच्या विरुदुनगर जिल्ह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळून आली. तिच्या आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण 'निमास्पिस सथुरागिरीएन्सिस' असे केले आहे. नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.
Powered By Sangraha 9.0