गीतकार समीर सामंत सावरकर चित्रपटाची चिकित्सा करतात तेव्हा..

    28-Mar-2024
Total Views |

swatantryaveer savarkar 
 
 
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून उत्तरोत्तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अर्थात राष्ट्रसेवकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काहीसा दुहेरी असल्याने त्याचा फटका सावरकर चित्रापास बसला यात नवल नाही. परंतु सुप्रसिद्ध गीतकार समीर सामंत यांनी या चित्रपटातील आवडलेल्या आणि न आवडलेल्या अशा दोन्ही बाजू मुद्देसूद मांडून त्याविषयीचं मतप्रदर्शन केले आहे.
 
चित्रपट समीक्षा त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून केली आहे. ते प्रस्तावनेत म्हणतात, "इतिहास हे माझं प्रेम आहे आणि स्वभावचिकित्सा हे व्यसन. प्रेमात मी भेदभाव करत नाही. आणि अटीही ठेवत नाही. इतिहास. मग तो आर्यांचा असो.. द्रविडांचा असो.. मुघलांचा असो.. रजपुतांचा असो .. मराठ्यांचा असो... मानवतेच्या हक्काचा असो.. सशस्त्र क्रांतीचा असो की अहिंसक लढ्याचा.. स्वातंत्र्यलढ्यावर आधारित चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, मी गांधी फिल्म ही पाहिली. भारतात रिलीज न झालेली जिन्हा फिल्म ही पाहिली. केतन महेताची सरदार ही उत्कृष्ट फिल्म आणि त्याचीच मंगल पांडे ही सपशेल गंडलेली फिल्मही पाहिली. बाबुजींनी बनवलेली वीर सावरकरही पाहिली. संतोषीची लिजंड ऑफ भगतसिंग. जब्बार पटेल यांची भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ही पाहिली. अजूनही बरेच चित्रपट पाहिले.. ( केतन महेताची सरदार फिल्म आणि श्याम बेनेगलांची संविधान सिरीअल मला प्रचंड आवडतात) तेव्हा माझ्या मित्रमंडळींकडून टोकाच्या प्रतिक्रिया वाचूनही मी हुडाची स्वातंत्र्यवीर सावरकर फिल्म बघणार हे नक्कीच होतं. कारण मी आदर आणि भक्ती यातलं अंतर राखतो आणि कोणाचंही कार्य सरसकट नाकारण्याइतका मी कृतघ्न नाही. सावरकरांबद्दल लहानपणापासून बरंच ऐकलेलं वाचलेलं.. नंतर नंतर वाईटही ऐकायला वाचायला मिळालं. दादरच्या सावरकरस्मारकातील लाईटसाउंड शो ची संहिता लिहिताना जवळजवळ समग्र सावरकर वाङमय वाचून झालं... त्यामुळे त्यांचा जीवनपट, मानसिकता आणि वैचारिकता याबद्दल काही अंदाज होते.. पण ते सारं बाजूला ठेऊन एक चित्रपट म्हणून ही फिल्म पाहिली. प्रचंड मेहनत.. प्रश्नच नाही!"
 
समीर सामंत यांना चित्रपटातील आवडलेल्या गोष्टी -
ते म्हणतात, "मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे प्रसंगांची डिटेलिंग आणि व्यक्तीरेखेचा प्रवास. सावरकर गांधी यांची पहिली भेट तो कोलंबीफ्राय वाला घडलेला प्रसंग आणि सावरकर गांधींची रत्नागिरीतली भेट हे दोन्ही प्रसंग आठवून पाहिले की दोन्ही व्यक्तिरेखांचा ग्राफ दिसतो.
पुर्वार्धातला धिरोदात्त आत्मविश्वासू हसतमुख नायक... उत्तरार्धात काळापाण्यापासून... त्रासलेला... निराश.. चिडचिडा.. झाल्याचं दिसतं...
ब्रिटिश कायद्यानुसार फार फारतर तीन वर्षे शिक्षा हा अंदाज बांधलेल्या सावरकरांसाठी इंडियन पिनल कोडखाली पन्नास वर्षे काळापाण्याची शिक्षा .. दोन जन्मठेप.. हे प्रचंड डिस्टर्ब करणारं आहे... अंडमानला आल्यावर आता पुढे काय.. हा भाव त्या व्यक्तीरेखेत जाणवतो..
सावरकरांचा तुरूंगातला छळ हा शारिरीक आहेच पण त्यापेक्षा जास्त मानसिक पातळीवर आहे .. एका संघटकासाठी.. व्यासंगी व्यक्तीसाठी.. सहा सहा महिने काळकोठडीत एकटं राहणं हे कोलू किंवा खडाबेडीहून जास्त त्रासदायक आहे .. ती अवस्था परफेक्ट दाखवलीय..
दयायाचिकेचा अर्ज शब्दनशब्द वाचून हुडाने प्रेक्षकांना आता तुम्हीच ठरवा असं सांगितलंय जणू.. हे आवडलं
तसंच सावरकरबंधूंविषयीचं गांधींचं मत आणि त्यांच्या सुटकेसाठी गांधींनी केलेले प्रयत्नही दाखवलेत.. आणि सावरकरांनी याची जाण ठेवून आभार व्यक्त केलेलेही दाखवलेत..
तारूण्यात भोवतालच्या प्रत्येकाला आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पाडणाऱ्या सावरकरांना.. अंदमानात भेटायला आलेल्या पत्नीसमोर जाताना आरशाच्या तुकड्यात आपल्या देहाच्या गलिच्छ अवस्थेकडे पाहून घृणा वाटते.. हे ही छान दाखवलंय... तुरूंगात आयुष्य
सडणं म्हणजे काय ते दिसतं..
दीर्घ कैदेतून सुटलेल्या सावरकरांच्या स्वागताला तुरूंगाबाहेर मोठा जमाव आणि प्रचंड जयघोष अपेक्षित असतो ... पण प्रत्यक्षात त्यांच्या स्वागताला तुरूंगाबाहेर कोणीही नसतं... ती शांत सुन्नता डिस्टर्ब करते... आणि तिथेच भारतातील तत्कालीन परिस्थितीचा आणि सावरकरांच्या मनःस्थितीचा अंदाज येऊ लागतो
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या योजनेचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील नायक होऊ शकणाऱ्या बुद्धीमान, साहसी तरूणाची... आयुष्याच्या उत्तरार्धात फारशी कोणी दखलही घेत नाही याची खंत ही ठळकपणे दिसते...
आपल्याला कोणी समजू शकत नाही...
जे अनुयायी म्हणून सोबत आहेत त्यांनाही आपले विचार पूर्णपणे समजलेले नाहीत..
एकूणच स्वातंत्र्यलढा आज ज्या वाटेने चाललाय ती आपली वाट नव्हतीच.. वगैरे विचार न बोलता प्रसंगातून दिसतात...
गांधींच्या खुनाच्या खटल्यात कोर्टात हसत असलेल्या गोडसे आपटे पहावा वगैरेकडे ओळखही न दाखवत मागे निर्विकारपणे बसणं हे ही दाखवलंय..
सुभाषबाबुंच्या मृत्यूची बातमी ऐकून सारे फासावर गेलेले क्रांतीकारी आठवणं... बाबारावांच्या मृत्यूनंतर ... हमारी हिंसा का उद्देश सर्वनाश नही था... असं पुटपुटणं..
एकूणच पहाता जनाधार न लाभलेल्या एकाकी विचारधारेची शोकांतिका वाटते...
म्हणूनच पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या भारत दौऱ्याच्यावेळी वृद्ध सावरकरांना अटक केली जाते त्या प्रसंगात सावरकर जेव्हा... गमतीने पत्नीला म्हणतात "देखा.. नेहरू अब भी मुझसे डरता है"
किंवा पोलिसाला म्हणतात... "अच्छा हुआ आप ने मुझे गिरफ्तार किया.. वर्ना मै पाकिस्तान के प्राईममिनिस्टर के कार को बम से उडा देता"
तेव्हा मनात कालवाकालव होते."
 
 
समीर यांना चित्रपटातील खटकलेल्या गोष्टी-
ते लिहितात, "पहिल्या पाच मिनिटात .. सावरकरांचं चरित्र सुरू होण्याआधी..
अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर भारतीयांनी पुन्हा बंड करू नये म्हणून इंग्रजांनी भारतीय आणि इंग्रज यांच्यात समन्वय साधण्यासाठी कॉंग्रेस ची निर्मिती केली हे सांगितलं जातं...
इथे चित्रपटाच्या फोकस किंवा हेतूबाबत संशय निर्माण होतो
सावरकरांचं चरित्र सुरु करण्यापूर्वी भगतसिंग च्या तोंडून सावरकरांबद्दल कौतुक करण्याची गरज नव्हती... सावरकरांच्या मोठेपणाला आधी 'भगतसिंग सर्टिफाईड' करून मग सुरू करण्यासारखं वाटतं ते..
पुढेही सावरकरांचं मोठेपण दाखवताना इतरांना उगाच छोटं केलंय असं जाणवत होतं (अपवाद बाबाराव सावरकर आणि मदनलाल धिंगरा... ती दोन कॅरेक्टरस् जबरा झालीयत)
रॅंड ला बलात्कारी दाखवणं हे इतिहासाला धरून नाही कारण दामोदर चापेकरांच्या आत्मवृत्तात त्यांनीही रॅंड च्या चारित्र्याबद्दल चांगलं लिहीलय..
पुढे सशस्त्र क्रांतीच्या प्रत्येक घटने नंतर गांधींच्या तोंडी अहिंसा परमो धर्मः हे पालूपद आणि कॉंग्रेस ने ह्या कृत्याला कॉवर्ड म्हटल्याचे न्युज पेपर कात्रण.. पुन्हा पुन्हा त्याच तर्‍हेने दाखवणं हे सहेतूक बिंबवणं वाटतं
गांधी तसे अनेक चित्रपटात टार्गेट झालेत पण या चित्रपटात गांधींसोबत नामदार गोखलेही टार्गेट झाल्याने जास्त वाईट वाटलं (मी गोखले हायस्कूल चा विद्यार्थी असल्याने असेल कदाचित)
थकलेल्या टिळकांना भाषण देताना खोकल्याची उबळ आलेली पाहून ना. गोखल्यांचं गालात हसणं आणि गांधींना खूण करून पुढे करणं जरा जास्तच वाटतं..
मुस्लिम राखीव जागा आणि तीन मतांचा अधिकार वगैरे गोष्टी लखनौ करारातील आहेत.. तिथे टिळक होते... पण ते खापरही गांधींच्या माथी मारलंय
लॉर्ड माउंटबॅटन भारतात आल्यावरच्या प्रसंगांत नेहरू आणि गांधी यांची लेडी माउंटबॅटन बरोबरची चेष्टामस्करीच्या फोटोंमधली दृष्य पडद्यावर दाखवणं हे सावरकर चरित्रासाठी गरजेचं नव्हतं..
भगतसिंग ची गुप्त भेट किंवा सुभाषबाबुंना प्रेरणा ह्या गोष्टी डॉक्युमेंटेड नाहीत (असूही शकत नाहीत) त्यामुळे त्या न तशा दाखवताही सुचकपणे मांडता आल्या असत्या...
बाकी चित्रपट बनवताना अभ्यास नक्की केलाय हे संवादांतूनही जाणवतं... पण त्यामुळेच वाटत राहतं की अशी मांडणी हेतूपुरस्सर केली आहे.. जी चरित्रपट म्हणून गरजेची नव्हती
त्यामुळे होतं काय.. की शेवटाकडे येईपर्यंत चित्रपट "सावरकर विरूद्ध इंग्रज" न वाटता... "सावरकर विरूद्ध कॉंग्रेस" बनतो."