आकांक्षा जेव्हा उंची असतात...

    28-Mar-2024   
Total Views |
Charuhas Joshi

व्यवस्थापनापासून दुर्धर दगडात शोधलेल्या वाटांवरचा प्रवास केलेले प्रशिक्षक, प्रस्तरारोहक चारुहास जोशी यांच्या आजवरच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाविषयी...

हाता-पायाशी असलेला आधारच आपल्याला ऊर्ध्व जायची संधी देत असतो. तोच मार्ग दाखवतो. पण, आपल्याला आपला आधार समजून घेता यायला हवा, ओळखता यायला हवा. सह्याद्री हा अनादी कालापासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा आधार. पहाडासारखा धिप्पाड, वादळ, वारे अडवून धरतो. चारुहास जोशी यांना या सह्याद्रीने अगदी बालवयातच भुरळ घातली. त्यांचे वडील रेडिओ शिपी होते. त्यांच्यासोबत चारुहास बरेच फिरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहून, त्यातलं वैविध्य शोधणं हा त्यांचा विरंगुळा. शालेय वयापासूनच आपल्या सोबत्यांना घेऊन, ते दुर्गभ्रमण करण्यासाठी निघत. वाटा दुर्गम, शिधा बांधून घेतलेला असायचा आणि सुळक्यापाशी पोहोचायची वाटच इतकी दुर्गम असायची की, त्यातच सारा शीण यायचा आणि त्यानंतर प्रस्तरारोहणाला सुरुवात!

मुंबईत दादरजवळ राहत असल्याने, त्यांनी जवळपासच्या साईट्स शोधून काढल्या. राष्ट्रीय उद्यान, कान्हेरी गुहा अशा अनेक जवळपासच्या ठिकाणी जाऊन, त्यांनी अनेक मार्ग तयार केले. या क्षेत्राचं असं आहे की, या खेळाला फार समाजमान्यता किंवा आदर नाही. कौतुक होतं; पण पैसे नाही! चारुहास एकटे नोकरी करत होते, त्यांचे सहकारी त्यावेळी अर्थार्जन करत नव्हते. दगडावर जितकं वर वर जावं, तेवढा धोका वाढत जातो. मग दगडात बोल्ट मारून, त्याला वर लावावा लागतो. यामुळे दगडाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. आपल्याकडे हे बोल्ट्स तयार केले जायचे नाहीतच. आजही आपल्याकडे टेस्टिंग लॅब्स नाहीत. मग वेल्डिंग फॅक्टरीतून लोहाच्या उरलेल्या तुकड्यांपासून हे बोल्ट्स बनवले जायचे. त्यांचा उपयोग पाचरीसारखा करत, ही मंडळी आपापले मार्ग जोखत असत. ‘स्पोर्ट क्लायंबिंग’साठी उत्पादित होल्ड प्रथा भारतात आले, ते चारुहास यांच्यामुळेच. ‘शिखर क्लब’द्वारे त्यांनी पहिली पोर्टेबल स्पोर्ट्स क्लायंबिंग वॉल बनवली. ते साल होतं १९९२.

आज मुंबईत क्लाइंब करण्यासाठी एकच वॉल दुर्गप्रेमी आणि खेळाडूंना परिचयाची आहे-ती म्हणजे गोरेगाव येथील आंतरराष्ट्रीय फेरो सिमेंट-थीमवर आधारित ’स्पोर्ट क्लायंबिंग वॉल.’ ही संकल्पनादेखील चारुहास यांचीच. याचसोबत त्यांनी अनेक ठिकाणी क्लायंबिंग वॉल डिझाईन केली आहे. रणजित सावरकर यांच्याशी चर्चा करून, सावरकर सैनिक शाळा आहे, तिथे की क्लायंबिंग वॉल बसवली. वॉल डिझाईन केली आणि बसवून देण्याचे काम चारुहास यांचेच. तसेच मुरबाड-स्पोर्ट क्लायंबिंग वॉल त्यांनीच डिझाईन करून बांधली आहे.केवळ क्लायंबिंग वॉल तयार करून मुले घडत नसतात, तर त्यासाठी मुलांनाही तयार करावे लागते. त्यांनी मुंबईबाहेरही अनेक प्रशिक्षण वर्ग घेतले. शेकडो विद्यार्थ्यांसाठी मूलभूत आणि प्रगत रॉक क्लायंबिंग अभ्यासक्रम आयोजित केले. हे अभ्यासवर्ग त्यांची नोकरी सुरू असताना सुरू असतं. तेव्हा वार्षिक रजा शिल्लक ठेवून, त्या वापरत त्यांनी हे वर्ग केले. आता सह्याद्रीपुरते मर्यादित राहून चालत नाही. नवं आकाश, नवी उत्तुंग शिखरं त्यांना सर करावी वाटू लागली. यातून त्यांनी हिमालयातील गिर्यारोहण सुरू केले. त्यांनी अनेक हिमालयीन शिखरे सर केली.

संपूर्ण भारतभरात प्रशिक्षण वर्ग घेऊन, अनेक कार्यक्रम केले. शेकडो कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यक्रम, पॅन इंडिया आणि ग्लोबलसाठी ट्रेनर आणि फॅसिलिटेटर म्हणून काम केले. एवढेच नाही तर बैठे खेळसुद्धा त्यांना गुंतवून ठेवत. बुद्धीबळ हा असाच त्यांचा आवडता खेळ. ”या खेळाने मला व्यवस्थापन शिकवले,” असे ते म्हणतात. भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी आणि एकावेळी समोर दिसत असलेल्या अनेक मार्गांमधून एक मार्ग निवडण्याची निर्णयक्षमता बुद्धीबळाने त्यांना दिली. सध्या ते ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेत अध्यपन करतात. ‘अनुभवातून शिक्षण’ या सर्वांगीण विकास करायच्या पद्धती, हा त्यांचा अध्यापनाचा मूळ गाभा. वानरलिंगी सुळका आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती असेल. आजकाल जीवधन वानरलिंगी वेली क्रॉसिंग किंवा झिप लाईन उपक्रम कित्येकांनी सुरू केले आहेत.

यातून सर्वजण सुळक्यावर जाऊन, आम्ही सुळका सर केला, असे ते सांगतात. तेव्हा हा मार्ग शोधलेल्या माणसाला किती मानसिक यातना होत असतील, याची कल्पना न केलेलीच बरी!१९८३ साली केल्या गेलेल्या एका अत्यंत कठीण व जोखमीच्या चढाईसंबंधी एक माहितीपट चारुहास यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रित करण्यात आला. त्यात त्यांनी निर्मितीसाठीही हातभार लावला आहे. ‘खडा पारसी’ किंवा ‘वानरलिंगी’ नावाने प्रचलित असलेल्या सुळक्यावर चढाई करतानाच, हा माहितीपट आहे. चेंबूरमध्ये या माहितीपटाची पहिली स्क्रीनिंग झाली, त्यानंतर हा माहितीपट युट्यूबवर सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध देण्यात आला आहे. चारुहास जोशी यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...


-मृगा वर्तक

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.