ठाण्यात आयुक्त ॲक्शन मोडवर, डाटा सेंटरमधील वॉर रूमची झाडाझडती!.

28 Mar 2024 18:57:10
Thane Municipal Commissioner



ठाणे :     ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त सौरभ राव ॲक्शन मोड मध्ये आले आहेत. बुधवारी सायंकाळी आयुक्त राव यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष, टी.डी.आर.एफ आणि डाटा सेंटरला भेट देऊन झाडाझडती घेतली. महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट देऊन नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती घेतली.

तसेच, मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आप्तकालीन कक्षात असावेत, त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत हाजुरी परिसरातील डाटा सेंटरमधील सीसीटीव्ही वॉर रूमची पाहणी आयुक्तांनी केली. ठाणे शहराचा तिसरा डोळा म्हणजेच शहरातील सीसी टीव्हीचा देखील आयुक्तांनी आढावा घेतला. शहरामध्ये एकूण १६०० सीसी टीव्ही असून १२०० सीसी टीव्हीचा ॲक्सेस येथुन दिला गेला आहे.

आयुक्तांनी तेथील मॅनेजर व ऑपरेटर यांना विचारता, मुंब्रा परिसरात ठाणे महापालिकेकडून ७ महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही लावण्यात आलेला असून त्यामधून ६ सीसी टीव्ही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. मात्र ऑपरेटर व मॅनेजर यांना अपूर्ण माहिती असल्याचे यावेळी निदर्शनास आले. या अनुषंगाने सीसी टीव्ही वॉर रूममध्ये नवीन तज्ञांच्या समावेश करण्याचे आदेश आयुक्त सौरव राव यांनी दिले.


टीडीआरएफ जवानांशी संवाद

हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिराला भेट देऊन आयुक्त राव यांनी जवानांशी संवाद साधला.या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी करून विविध मोहिमां बद्दलचे अनुभवही त्यांनी जाणून घेतले. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले.


Powered By Sangraha 9.0