‘मिडकॅप’, ‘स्मॉलकॅप’चे सहअस्तित्व ‘लार्जकॅप’साठी पूरक!

    28-Mar-2024
Total Views |
midcap, smallcap schemes


भारतीय उद्योगजगतात ‘ब्लू चीप’, ’ए लिस्टेड’ अर्थात मोठ्या कंपन्यांचे फारच कोडकौतुक होताना दिसते. या कंपन्यांची लोकप्रियता स्वाभाविकच, पण अचानक ‘लार्जकॅप’च्या तुलनेत ‘मिडकॅप’, ‘स्मॉलकॅप’ कंपन्यांच्या समभागांचे मूल्य का वधारले आहे? परदेशी गुंतवणूकदारांनाही या फंडांमध्ये का रस आहे? ‘सेबी’ने मध्यंतरी ‘मिडकॅप’ कंपन्यांच्या फंडांवर घेतलेले आक्षेप कितपत योग्य? यांसारख्या शेअर बाजारामध्ये सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...


भविष्यातील विविध तरतुदींसाठी आणि भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी आजच्या जगात गुंतवणुकीशिवाय पर्याय नाही. पण, बरेचदा शेअर बाजारातील गुंतवणूक त्याला अपवादही ठरू शकते. कारण, हा केवळ नशिबाचा खेळ नाही, तर बाजारातील काही मूलभूत समीकरणांचाही खेळ आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून नवीन वादाला तोंड फुटले आहे. हा वाद आहे, लार्जकॅप, मिडकॅप व स्मॉलकॅप प्रकारातील गुंतवणुकीचा. पण, हा नेमका प्रकार काय आहे, हे समजून घेण्यासाठी शेअर बाजाराती संहिता थोडक्यात जाणून घेणे आवश्यक ठरावे.‘रिलायन्स’, ‘टाटा’, ‘अदानी’ यांसारख्या मोठमोठ्या ‘ब्लूचिप’ कंपन्या सोडल्या, तर नवनवीन उद्योजक आपले भागभांडवल शेअर बाजारातून गोळा करत, उद्योगधंद्यात आपले बस्तान बसवण्याचा आणि टिकविण्याचा प्रयत्न करतात. शेअर बाजारात काही सुची आहेत, ज्यातून कंपन्यांचे तीन प्रकार पडतात. ‘ब्लूचिप’म्हणजे ‘लार्ज साईज’ कंपन्या, ज्यामध्ये मोठे भांडवल असलेल्या कंपन्यांचा समावेश होतो.

दुसरीकडे मध्यम भांडवल व बाजारात पाय रोवण्यास प्रारंभ केलेल्या कंपन्यांना ‘मिडकॅप’ कंपन्या म्हणतात व तिसरा प्रकार ‘स्मॉलकॅप’ कंपन्या, ज्यांचे भांडवल कमी असून नुकत्याच किंवा तुलनेनेनवीन नोंदणीकृत असलेल्या कंपन्या या वर्गात मोडतात. तेव्हा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अशा विविध कंपन्यांमध्ये आपापल्या परीने गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध असतात.पण, भारतीय शेअर बाजारातील इतिहास पाहता, शेअर बाजार व मोठ्या कंपन्यांचे तसे अतूट नाते. वर्षांनुवर्षे आधारित असलेले नाते हे अबाधित असले तरी स्टार्टअपच्या जमान्यात ‘स्मॉलकॅप’ कंपन्यांचे महत्त्व वाढले आहे, हे नाकारता येणार नाही. बाजारातील तंत्रज्ञान वाढीसोबतच स्टार्टअपमधील दूरदर्शी गुंतवणूकदेखील वाढली. पारंपरिक उद्योगांपेक्षा चौकटीपलीकडच्या उद्योगांतूनभविष्यात अधिक उत्पन्न मिळू शकते, या आशेने छोट्या कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबतीत एक विचारप्रवाह निर्माण झालेला दिसतो.त्यातूनच गेल्या काही वर्षांत ‘मिडकॅप- स्मॉलकॅप’ समभागात गुंतवणूकदारांना संधी मिळाल्याने, या प्रकारच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढलेले दिसते. मागील वर्षाच्या २३ टक्क्यांच्या तुलनेत, यंदाच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील काही दिवसांतच या समभागांवर गुंतवणूकदारांना ६० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, हा नफा ‘लार्जकॅप’मध्ये गुंतवलेल्या समभागांपेक्षा अधिक असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. वर्षांनुवर्षे प्रस्थापित कंपन्यांच्या समभागांवर मिळणारे लाभांश, त्यांचा निव्वळ नफा, महसूल, नवी माहिती या मुद्द्यांवर या मोठ्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन होत असते. अपवाद वगळता या कंपनीचे समभाग (शेअर) तितके चढउतार करत नाही. मात्र, तरुणांमध्ये गुंतवणुकीची वाढलेली प्रवृत्ती पाहता, या समभागात खरेदी किंमत कमी व परतावा अधिक, या कारणांमुळे गुंतवणूकदारांची पावले या समभागांकडे वळताना दिसतात.विशेषतः म्युच्युअल फंड गुंतवणुकीत सर्वांधिक प्राधान्य ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’ कंपनीच्या गुंतवणुकीत फंड मॅनेजर करताना दिसतात. परिणामी, या कंपनीच्या ‘मार्केट कॅपिटलायझेशन’ (बाजारी भांडवल) मध्ये वाढ झाल्याने, या कंपन्याही आता मोठ्या कंपन्यांना तुल्यबळ ठरत आहेत. अर्थात, यामध्ये नैसर्गिक किंवा कृत्रिम फायदा किती हा वेगळा मुद्दा. परंतु, ‘बीएससी’, ‘एनएससी’ने वाढविलेल्या ‘मार्केट कॅपिटलायझेशन’मध्ये ’मिडकॅप’, ‘स्मॉलकॅप’चा मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, २०२३ या आर्थिक वर्षात ‘निफ्टी मिडकॅप’ व ‘निफ्टी स्मॉलकॅप’मध्ये मोठी वाढ झाली. ज्यामध्ये ‘निफ्टी मिडकॅप’ ४६ टक्क्याने, तर ‘निफ्टी स्मॉलकॅप’मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मुख्यतः या कंपनीच्या सेवा, सुविधा या तंत्रज्ञानप्रणित किंवा नव्या सेवा सुविधांवर आधारलेल्या असतात. परिणामी, यातील भांडवली मागणी वाढल्याने यांचा सकारात्मक परिणाम होतो. परंतु, दुसर्‍या बाजूला अनेक वर्षांची मक्तेदारी कमी झाल्याने नक्कीच ‘लार्ज कॅप’ कंपन्यांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्येही काहीशी असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचेही पाहायला मिळते.अनेक परदेशी गुंतवणूक कंपन्या व परदेशी संस्थापक गुंतवणूकदारदेखील ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’ कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर भर देत आहेत. परिणामी, भारतातील गुंतवणुकीत एकाएकी वाढ झाली. अनेकदा पैशाची तरलता (लिक्वीडीटी) जपून ठेवण्यासाठी गुंतवणूकदार लहान कंपनीच्या समभागांना प्राधान्य देताना दिसतात. तेव्हा अचानक ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’कडे गुंतवणूकदारांचा वाढलेला ओढा ‘सेबी’च्या नजरेतूनही सुटला नाही. परिणामी, ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी म्युच्युअल फंड कंपन्यांना ‘स्ट्रेस टेस्ट’ करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बाजारातही खळबळ माजली. ‘स्ट्रेस टेस्ट’ म्हणजे एखाद्या समभागातून किती गुंतवणूक परतावा तरलेतून (Liquidity) मिळू शकतो, याची चाचणी होय.


म्युच्युअल फंड कंपन्या ‘स्मॉल’ आणि ‘मिडकॅप’ पोर्टफोलिओच्या तरलतेचे मूल्यांकन करण्यासाठी या चाचण्या घेऊन, त्या कंपनीच्या समभागांचे वास्तववादी मूल्यांकन करतात. एवढेच नाही तर, ‘सेबी’च्या माधवी पूरी बुच यांनी ’मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’मध्ये अचानक वाढलेली गुंतवणूक हा ’बबल’ (फुगवलेला फुगा) आहे का? असे विधान केल्याने गुंतवणूकदारांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली. मग ‘सेबी’च्या आदेशानुसार, या कंपन्यांचे शेअर्स कुठपर्यंत तरलता निर्माण करू शकतात, यासाठी चाचणी घेतली गेली. त्यामुळे बाजारात काही सत्रांत या घटनेचा परिणाम जाणवल्याने बाजारही घसरला. परंतु, अजूनही त्यातून फार काही निष्पन्न होऊ शकलेले नाही. किंबहुना, पुन्हा एकदा ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’ समभागांच्या मूल्यात पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली.अर्थात, जितका परतावा अधिक तितकी जोखीमही अधिक हे बाजाराचे पूर्वापारचे समीकरण. मोठ्या कंपन्यांमध्ये नफ्याचे गुणोत्तर जोखीमपूर्ण असले तरी वेळोवेळी या कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना परतावा प्राप्त होत असतो. परंतु, छोट्या कंपन्यांच्या समभागात अधिक जोखीम असते. कारण, त्या कंपन्यांच्यावतीने परताव्याची कुठलीही खात्री कोणीही देऊ शकत नाही. कधी या लहान कंपन्यांमधील गुंतवणुकीवर मोठा परतावाही मिळू शकतो, तर कधी मोठे नुकसानही संभवते.

परिणामी, म्युच्युअल फंड गुंतवणुकीत संतुलित गुंतवणुकीचा दृष्टिकोन दिसून आला आहे. ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’मध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत असतानाच, मोठ्या कंपन्यांमध्ये देखील संतुलित गुंतवणूक होत असते. ‘एनएससी’वरील नवीन माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१९ ते २०२३ मध्ये नवीन १२ कोटी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली. एकूण बाजारातील गुंतवणूकदारांपैकी १६ टक्क्यांहून अधिक गुंतवणुकीचे प्रमाण हे छोट्या-मध्यम कंपनीच्या समभागात वाढल्याचेही ही आकडेवारी सांगते.याशिवाय ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’, ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या मोदी सरकारच्या यशस्वी योजनांमुळे, रिटेल क्षेत्रातील गुंतवणुकीत देखील मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढलेल्या गुंतवणुकीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा या क्षेत्राला झाला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये ‘लार्जकॅप’ योजनांमधून २८० कोटी निव्वळ बाह्य प्रवाहाच्या (आऊटफ्लो) तुलनेत ‘स्मॉलकॅप’ योजना आणि ‘मिडकॅप’ योजनांना अनुक्रमे ३ हजार, ८५७ कोटी आणि १ हजार, ३९३ कोटींचा निव्वळ प्रवाह प्राप्त झाला. यातूनच या विभागातील समभागातील महत्त्व आपल्याला लक्षात येईल. यातून जाणकारांनी ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’मध्ये गुंतवणुकीत सावधतेने पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’मध्ये जसे गुंतवणुकीला वेळ लागतो, तसेच पैसा काढायलाही वेळ लागतो, हेही तितकेच खरे. परंतु, ‘लार्जकॅप’मधील गुंतवणुकीसारखेच ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’मध्ये गुंतवणूक तितकीच महत्त्वाची आहे. कारण, आजच्या ‘लार्जकॅप’ कंपन्या कधीकाळी ‘मिडकॅप’ कंपन्या होत्या. त्यामुळे गुंतवणुकीचे गुणोत्तर साधताना या छोट्या कंपन्यांचा विचार होणे आवश्यक आहे.वाढलेली परदेशी गुंतवणूक व नव्या तरुण गुंतवणूकदारांचा उत्साह पाहता, ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’मध्ये गुंतवणुकीचा आलेख उंचावणे क्रमप्राप्त आहे. ‘एसएमई’ (Small and medium-sized enterprises)क्षेत्रातील गुंतवणूक भारतातीलस्टार्टअपमधील ऊर्जेला बळ देणार आहे. दुसरीकडे पारदर्शक कारभाराची या क्षेत्रातआवश्यक असताना, समाजातील सगळ्या घटकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे हेदेखील ‘सेबी’च्या अजेंड्यावर असले पाहिजे. भारतासारख्या मिश्र अर्थव्यवस्थेत मोठ्या उद्योजकांसह लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास, कंपनीच्या बाजारी भांडवलात निश्चितच मोठी वाढ होऊ शकते.सरकारने गुंतवणुकीसाठी सकारात्मक धोरणे राबविली असली तरी ‘सेबी’नेही ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’मध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे सार्वत्रिक हिताचे ठरेल. कारण, ‘स्ट्रेस टेस्ट’नंतर फार काही निष्पन्न झाल्याचे दिसून आले नाही. किंबहुना, ते समभाग तुल्यबळ म्हणून या स्पर्धेत सहभागी झाले आणि तग धरुन उभे राहिले. एकूणच काय तर गुंतवणुकीसाठी छोट्या-मध्यम कंपन्यांचे सहअस्तित्व हे मोठ्या कंपन्यांइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘एसएमई’ क्षेत्रातील ‘आयपीओ’मधील वाढती गुंतवणूक पाहता, ‘मिडकॅप’ व ‘स्मॉलकॅप’चे कंपन्यांचे महत्त्व ‘लार्जकॅप’ एवढेच आहे, हेच यावरुन सिद्ध होते.


-मोहित सोमण