‘अशोका’ची शोकांतिका

    28-Mar-2024   
Total Views |
Ashoka University

हरियाणातील सोनीपत येथील अशोका विद्यापीठात निदर्शने करताना, काही विद्यार्थ्यांनी ‘ब्राह्मण-बनियावाद मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. ब्राह्मण आणि बनिया समाजाला शिवीगाळ करण्याबरोबरच त्यांनी ‘जय भीम-जय मीम’ आणि ‘जय सावित्री-जय फातिमा’ अशा घोषणा दिल्या. विद्यापीठात जात जनगणना करण्यात यावी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. दरम्यान, विद्यापीठात अशा घोषणाबाजीला नेमकी परवानगी कुणी दिली, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची बीजं पेरण्याऐवजी द्वेषाची बीजं कोण पेरतंय, याचाही धांडोळा घेणेही गरजेच. आधी ब्राह्मण आणि आता बनिया. अशा घोषणा देऊन एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचा हा प्रकार आहे. यांना वेळीच आवरलं नाही, तर भविष्यात दुसरा समाज यांच्या द्वेषपूर्ण घोषणांना बळी पडेल. हिंदूंमध्ये फूट पाडणे आणि त्यांच्यावर वैचारिक हल्ले करून गोंधळ माजवणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम, हे यावरून स्पष्ट होते. जेएनयूतील असल्या राष्ट्रद्रोही प्रकारांनी प्रत्येक भारतीय मन विषण्ण झालं. भारतातच असणार्‍या, या विद्यापीठात भारतीयांनीच भारताविरुद्ध घोषणाबाजी केली होती. सध्या या टोळीचा म्होरक्या काँग्रेसमधून आपले राजकीय अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतोय. काही महिन्यांपूर्वीच पुण्यातही प्रभू राम आणि सीतामातेवर अपमानजनक नाटक सादर करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या जात जनगणनेच्या मागणीच्या धर्तीवर हे सर्व विद्यार्थी नेते विद्यापीठात जातनिहाय जनगणनेची मागणी करताहेत. विद्यापीठात दरवर्षी जात जनगणना झाली पाहिजे, जेणेकरून विद्यापीठात किती विद्यार्थी सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत आणि किती ओबीसी किंवा एससी-एसटी समाजातील आहेत, हे समजेल, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले. जात जनगणनेशिवाय उशिरा येण्याचा दंड रद्द करून, डॉ. भीमराम आंबेडकर यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. अशोका विद्यापीठ यापूर्वीही वादात सापडले आहे. त्यामुळे राहुल गांधींनी ’भारत जोडो’ यात्रा काढली खरी; पण त्यांच्या जातगणनेच्या मागण्यांमुळे विद्यार्थीवर्ग जातीपातीत विभागला जाण्याची खरी भीती आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी जात जनगणना करण्याची मागणी करत असतील, तर त्याहून दुसरे दुर्दैव तरी काय म्हणा!

 
उबाठाचा शब्दच खोटा!
 
 
नाशिक लोकसभेच्या जागेसाठी उबाठा गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली अन् दुसरीकडे ठाकरे गटात धुसफूस सुरू झाली. ‘मी खुद्दार आहे, गद्दार नाही, मी लढणार आणि पाडणारही’ असा इशारा उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख आणि सध्याचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी दिला आहे. तसेच आज किंवा उद्या आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगत, बंडाचे संकेतही दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री व उबाठा गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. नाशिकमधील बहुतांशी नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी शिंदेंना पाठिंबा दिला. मात्र, करंजकर यांनी ठाकरे गटात राहणे पसंत केले आणि आता निष्ठेच्या फळाची किंमत मला चांगली समजली आहे, अशी कबुली त्यांनी दिली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात वाजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेळावा पार पडला, या मेळाव्याला विजय करंजकर गैरहजर राहिले. दरम्यान, आपली भूमिका मांडताना विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरेंनी जवळपास एक वर्षापूर्वीच नाशिक लोकसभेची तयारी करण्याचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे, तर संजय राऊत यांनीही नाशिकमध्ये मविआची उमेदवारी करंजकर यांनाच देण्याचे सूतोवाच केले होते. नुकतीच उद्धव ठाकरेंनी सावरकर स्मारकाला भेट दिली. त्याचवेळी त्यांनी विजय करंजकर यांच्या घरीदेखील भेट दिली. त्यामुळे करंजकर यांचे तिकीट नक्की समजले जात होते. प्रचारालाही सुरुवात झाली; मात्र ऐनवेळी करंजकर यांच्याऐवजी वाजेंची लॉटरी लागली. मुळात ना वाजेंनी उमेदवारी मागितली होती, ना कुणी शिफारस केली होती, तरीही कुणाच्या ध्यानीमनी नसताना, त्यांना तिकीट मिळाले. परिणामी, नाशिकमध्ये उबाठा गटातील धुसफूस समोर आली असून, ठाकरेंचा शब्दच खोटा अशी चर्चा सुरू झाली आहे. बंद खोलीत अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचे उद्धव सांगत असतात. मात्र, निष्ठावंत असलेल्या करंजकरांना एक वर्षापूर्वी दिलेला शब्द खुद्द ठाकरेंनीच मोडला. त्यामुळे उद्धव ठाकरे केवळ कामापुरते शब्द देतात आणि नंतर बाजूला सारतात अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरेंनी कितीही आपले शब्द खरे असल्याचा दावा केला; मात्र करंजकर यांना दिलेला शब्द मोडल्यामुळे, उद्धव ठाकरेंचा शब्दच खोटा असा सूर सध्या नाशिककरांमध्ये पाहायला मिळत आहे.



पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.