संजय निरुपम काँग्रेस सोडणार! खर्गे-गांधींनाही सुनावलं

न्याय यात्रा कसल्या काढताय! पक्षात काय चाललयं ते बघा! काँग्रेस नेत्यानं राहुल गांधींना सुनावलं!

    27-Mar-2024
Total Views |
Sanjay Nirupam

(संजय निरुपम - Image Credit Sanjay Nirupam File Photo) 


मुंबई
: काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही गटांनी एकत्र येऊन लोकसभा २०२४ निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. भाजपविरोधात हे तिन्ही पक्ष एकवटल्याचा दावा यापूर्वी वेळोवेळी केला होता. देशपातळीवर इंडी आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीच्या रुपाने भाजप विरोधी सुर या नेत्यांनी आळवला होता. मात्र, या दोन्ही पक्षांतील नेत्यांची खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. संजय राऊत यांनी जाहीर केलेली काँग्रेस नेत्यांची यादी याला कारणीभूत ठरली आहे. माजी खासदार काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी याच निमित्त ठाकरेंसह काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. यावेळई त्यांनी राहुल गांधींनाही सोडलं नाही.

नेमकं काय घडलं?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राज्यातील एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. गजानन किर्तीकर सध्या शिवसेना म्हणजेच एकानाथ शिंदेंसोबत आहेत. मात्र, अमोल किर्तीकर हे स्वतः ठाकरे गटातून निवडणूक लढविणार आहेत. याबद्दल यापूर्वीही खदखद काँग्रेसने बोलून दाखविली होती. गुरुदास कामत यांच्यानंतर गेली दोन टर्म ही जागा खासदार संजय निरुपम यांना देण्यात आली होती. मात्र, मोदी लाटेच्या प्रभावात निरुपम यांचा दोनदा दारुण पराभव झाला होता. मराठी विरुद्ध उत्तर भारतीय मतदार, असे या लोकसभेसाठी समीकरण होते. मात्र, निरुपम यांची झालेला पराभव पहाता, यावेळी ही जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंकडे गेली. यामुळेच निरुपम नाराज आहेत.

संजय निरुपम नेमकं काय म्हणाले?

"मी आठवड्याभराचा वेळ माझ्या पक्षनेतृत्वाला देत आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांचा ज्या भावना आहेत त्या मी समजून घेईन. जर आठवड्याभरात काही सक्रिय हालचाली दिसल्या नाहीत तर मला माझा मार्ग मोकळा आहे.", अशा शब्दांत थेट इशारा दिला आहे. काँग्रेसने मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघासाठी रोखठोक भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं आहे की, मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चिंता आता प्रदेश काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला नाही, त्यांना इथे वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहे. ही गोष्ट निंदनीय आहे, अशा तिखट शब्दांत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हा तर काँग्रेस अध्यक्षांचा पराभव!

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्त्व आग्रही होते, असे मी ऐकले होते. आमच्या पक्षाच्या हितासाठी काहीतरी निर्णय होईल, अशी मला अपेक्षा होती. मात्र, उद्धव ठाकरेंशी वाटाघाटी करण्यात ते सपशेल अपयशी ठरले, असा घणाघात निरुपम यांनी राहुल गांधींसह मल्लिकार्जून खर्गेंवर नाव न घेतला केला. आता समोर दिसत आहे की, आमचे पक्षनेतृत्त्व मुंबईत काँग्रेसला उद्धव ठाकरेंपुढे गुडघे टेकण्यासाठी मजबूर करत आहे, असे म्हणत तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

उबाठाला काँग्रेसची गरज नाही!

शिवसेना उबाठा गटाला आता काँग्रेसची गरज राहिलेली नाही, असा त्यांचा अविर्भाव आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळे काँग्रेसला सांगलीची जागा उद्धव ठाकरेंना सोडावी लागत आहे. उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं की काँग्रेसशिवाय ते महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे निवडणूका लढवू शकत नाही. ही गोष्ट आता काँग्रेसने उद्धव ठाकरेंना लक्षात आणून दिली पाहिजे. आमच्या पक्षाकडून उद्धव ठाकरेंनी जागा खेचून घेतल्या आहेत. काँग्रेसला संपूर्ण संपवावं, हा त्यांचा छुपा अजेंडा असू शकतो हे ही लक्षात घ्यायला हवं.

प्रकाश आंबेडकरांनाही वेगळं केलं!

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सोबत घ्यावं, ही गोष्ट काँग्रेसनेच लावून धरली होती. मात्र, त्यांच्या जागांची अवास्तव मागणी होती. त्यामुळे ते काही महाविकास आघाडीला शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांना या नेत्यांनी बाजूला केलं आहे.


मुंबईतील सहा जागा उबाठाला आंदण

काँग्रेस पक्ष हा पूर्वापार मुंबईतील आपला जनाधार टीकवून आहे. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई या तीन जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आमचा आग्रह होता. दक्षिण मुंबईही आमचा गड आहे मात्र, तिथे उबाठाचे खासदार निवडून येतात त्यामुळे आम्ही तो दावा सोडला. मुंबईतील सहा जागांपैकी या तीन जागा आम्हाला मिळायलाच हव्यात हा आमचा जनाधार तिथे आहे, तिथून आमच्या जागा निवडून आजही येऊ शकतात. मात्र, या सहा जागा उबाठा गटाला आंदण देऊन टाकण्यात आल्या, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

काँग्रेसला गुडघ्यावर आणलं!

काँग्रेसला मुंबईत गुडघ्यावर आणण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुंबईतील काँग्रेसचा मतदार काय उबाठा गटाला मतदान करतील का? याचं उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. काँग्रेसचा मतदार हा परप्रांतातील मजूर आहे. त्यांनी कोविड काळात जे काही भोगलं आहे त्या वेदना विसरलेलो नाही. खिचडी घोटाळ्यात ज्या उबाठा गटातील नेत्यांनी घोटाळे केले, ही गोष्ट मतदार विसरलेलं नाही, असा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

सत्तेच्या मलाईसाठी उबाठांच्या दावणीला

पाच वर्षांत काँग्रेसने जे काही गमावलं आहे ते परत मिळवता येणं शक्य होतं. नव्याने सुरुवात करून विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसून काम करता आलं असतं. मात्र, आमच्यातील काही नेत्यांना सत्तेची मलाई खाण्याची इतकी चट लागली की त्यांनी ग्राऊंडवरील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. उद्धव ठाकरेंसोबत जाऊन त्यांनी काँग्रेस मुंबईतून नामशेष करण्याचा जणू विडाच उचलला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.