जम्मू-काश्मीरमधून 'AFSPA' हटविणार! केंद्रीय गृहमंत्र्यांचे पुढील योजनेबाबत सूतोवाच

    27-Mar-2024
Total Views |
planning-to-revoke-afspa-from-jammu-kashmir
 

 
नवी दिल्ली :    जम्मू आणि काश्मीर मधून ३७० कलम हटविल्यानंतर आता सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) हटविण्याच्या दृष्टीने केंद्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात भाष्य केले असून ते म्हणाले, AFSPA हटवून येथील लष्कर मागे घेण्याचा विचार सुरू आहे.
 
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर येथे विधानसभा निवडणूका अजून झालेल्या नाहीत. आता लवकरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्याबाबत सुतोवाच गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरबाबत मोदी ३.० अजेंडादेखील सांगितला.
एका माध्यमसमूहाला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकार सैन्याला विशेष अधिकार देणारा AFSPA राज्यातून काढून टाकण्याचा विचार करत आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की कलम ३७० बाबत राज्यात गैरसमज पसरवले गेले, त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने दहशतवाद्यांची भरती केल्याचेही शाह यावेळी म्हणाले.
 
सदर मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून ३७० रद्द केल्यानंतर झालेल्या बदलांविषयी, जम्मू-काश्मीरबाबत सरकारची धोरणे, भविष्यातील पावले याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. या मुलाखतीतून केंद्रीय गृहमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केले आहे.


AFSPA कायदा काय आहे?

(Armed Forces Special Powers Act) हा कायदा १९५८ साली अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नालागँड आणि त्रिपुरा अशा सात राज्यांसाठी पारित केला गेला. तसेच, १९९० साली जम्मू-काश्मीर करिता स्वतंत्र AFSPA लागू केला गेला. दरम्यान, केंद्र सरकारने २०१५ साली त्रिपुरामधून आणि २०१८ साली मेघालयमधून हा कायदा मागे घेतला आला आहे.