सत्संगतीने दुष्टबुद्धी पालटते...

    27-Mar-2024   
Total Views |
shri ram and Ramdas Swami

 
माणूस जन्माला आल्यानंतर जीवनात त्याला अनेक स्थित्यंतरे पाहावी लागतात. त्यातून त्यांचा स्वभाव, प्रवृत्ती तयार होत जाऊन व्यक्तिमत्व तयार होते. त्यात संगतीचा मोठा परिणाम दिसून येतो. मन वायूरूप असल्याने चंचल, अस्थिर असते. तथापि मनाची एक विशेषता म्हणजे एखादी गोष्ट मनाला पटली, तर मन तो विचार सहसा सोडत नाही. आपल्या जीवनातील ध्येय निश्चिती झाली की त्या ध्येयाकडे जाण्याचे जे मार्ग असतात, त्यावर सारासार विचार करून आपण अनुरूप मार्गाची निवड करतो. मनाला ध्येयविचाराची खात्री पटली की, त्याप्रमाणे आचरण घडू लागते आणि ध्येयाप्रत जाणे सुलभ होते.
 
सज्जनांच्या संगतीत राहिल्याने सज्जनांच्या चांगल्या वृत्तीचा थोडा तरी प्रभाव आपल्यावर होईल व मन तसे अनुकरण करण्याचा विचार करू लागेल. मनातील दुष्ट विचारांना, वासनांना, विकारांना आळा घालण्यासाठी संतांच्या संगतीचा उपयोग होतो. म्हणून स्वामींनी यापूर्वीच्या श्लोक क्र. १२८ मध्ये सांगितले आहे की, ’मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे।’ येथे हे लक्षात येते की, मन कसेही असले तरी स्वामींनी प्रथम त्याला ‘सज्जन’ म्हणून गौरवले आहे. स्वामी म्हणतात, “हे मना, तू सज्जन आहेस. पण, तरीही तुझ्या चंचल, अस्थिर आणि बलवान स्वभावामुळे तू सज्जनांच्या संगतीत राहिलास, तर भलत्या वाटेला जाणार नाहीस. सज्जनांच्या संगतीत राहाणेकेव्हाही श्रेयस्कर आहे.” विशिष्ट गुणधारक व्यक्तींच्या वस्तीत विजातीय गुणांची व्यक्ती राहू शकत नाही. सज्जनांच्या वस्तीत राहायचे, तर सज्जन होऊन राहावे लागेल. त्यामुळे मनाचा ओढा सभ्यतेकडे राहील. मन अवगुणांना थारा देणार नाही. स्वामींनी सुचवलेला हा ’सज्जनी वस्ती कीजे’ उपाय अमलात आणायचा, तर प्रथम सज्जन माणसांचा शोध घ्यावा लागेल. त्यासाठी विवेकपूर्ण विचाराने सभोवार नजर ठेवली पाहिजे.

समाजात काही लोक वर सज्जनपणाचा आव आणतात. त्यांचे खरे रूप समजेपर्यंत त्यांच्या सभ्यतेची खात्री देता येत नाही. सुदैवाने एखाद्या अंतर्बाह्य सभ्य सुजनाशी आपली गाठ पडली, तरी त्यांच्याबरोबर ’वस्ती’ किजे’ यासाठी त्यांच्या सहवासात काही काळ राहता आले पाहिजे. तसेच त्यांनी आपल्याला त्यांच्या सहवासात राहण्यासाठी संमती दर्शवली पाहिजे. थोडक्यात, सज्जनी वास्त कीजे’ हे दिसते तेवढे सोपे नाही. यातून मार्ग काढायचा तर उचित संतसंगती मिळेपर्यंत आपण संतांनी लिहिलेल्या सद्ग्रंथांचा अभ्यास करून त्यांच्या विचारांच्या सहवासात राहावे. संतसंगती आणि सद्ग्रंथांच्या, मनन चिंतनातून मिळणार्‍या लाभात काही फरक नाही. ग्रंथ म्हणजे एकप्रकारे ग्रंथकर्त्यांची ती वाङ्मयीन मूर्ती असते. दासबोध ही समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे, असे म्हटले जाते. देह सोडण्याच्या दोन-तीन दिवस अगोदर समर्थ आपल्या शिष्यांना म्हणाले होते.

आत्माराम दासबोध। माझे स्वरूप स्वतः सिद्ध। असता न करावा खेद। भक्तजनीं॥

समर्थ जे बोलले, त्यांचा थोडक्यात आशय असा की, ’मी इहलोक सोडून गेले तरी दासबोध ग्रंथातील तत्त्वज्ञान, उपदेश, त्यातील भक्तिमार्ग, व ज्ञान तुमच्यासोबत राहणार आहे. हे नश्वर शरीर कधीतरी सांडावे लागेल म्हणून बिघडले कुठे? माझ्या ग्रंथांद्वारा मी आहे जगज्जीवनी निरंतर.’ कोणत्याही विभूतीचे विचार ग्रंथरूपाने चिरकाल जीवंत असतात, तेव्हा सद्ग्रंथ वाचनाने मिळणारा ग्रंथकाराचा सहवास हा सत्संगतीपेक्षा कमी नाही. या संतसंगतीचा परिणाम मानवी जीवनावर कसा घडतो हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत,


गतीकारणे संगती सज्जनाची।
मती पालटे सूमती दुर्जनाची।
रतीनायिकेचा पती नष्ट आहे।
म्हणोनी मनातील होऊनि राहे ॥१२९॥


माणूस जन्माला आल्यानंतर जीवनात त्याला अनेक स्थित्यंतरे पाहावी लागतात. त्यातून त्यांचा स्वभाव, प्रवृत्ती तयार होत जाऊन व्यक्तिमत्व तयार होते. त्यात संगतीचा मोठा परिणाम दिसून येतो. मन वायूरूप असल्याने चंचल, अस्थिर असते. तथापि मनाची एक विशेषता म्हणजे एखादी गोष्ट मनाला पटली, तर मन तो विचार सहसा सोडत नाही. आपल्या जीवनातील ध्येय निश्चिती झाली की त्या ध्येयाकडे जाण्याचे जे मार्ग असतात, त्यावर सारासार विचार करून आपण अनुरूप मार्गाची निवड करतो. मनाला ध्येयविचाराची खात्री पटली की, त्याप्रमाणे आचरण घडू लागते आणि ध्येयाप्रत जाणे सुलभ होते.हिंदू संस्कृती केवळ धर्माचा, पंथाचा किंवा संप्रदायाचा विचार करीत नाही, तर समस्त मानवजातीच्या कल्याणाचा, उद्धाराचा विचार करते. या जगात अनेक प्रकारांची, प्रवृत्तींची असंख्य माणसे आहेत. तरी अध्यात्मात वाटचाल करताना बद्ध, मुमुक्षूअवस्था ओलांडून सिद्धावस्था प्राप्त होण्यासाठी झटावे लागते. कारण, फक्त सिद्धावस्थेत संदेहरहित ज्ञान प्राप्त होते. तेथे सर्व संशय मावळल्याने निश्चित अशा समाधानाची स्थिती अनुभवता येते. आयुष्यातील सारी धडपड या, खात्रीलायकपणे मिळणार्‍या समाधानासाठी असते. तेच आयुष्याचे परमोच्च ध्येय होय, तीच मुक्ती म्हणता येते. स्वामींनी दासबोधात सिद्धलक्षण असे सांगितले आहे.

’म्हणोनि संदेहरहित ज्ञान। निश्चयाचे समाधान। तेंचि सिद्धाचे लक्षण। निश्चयेसी॥ (५.१०.२७)

अध्यात्माच्या या वाटचालीत दुर्बुद्धी, अवगुण, अहंकार, ताठा, मत्सर, निंदा, अज्ञान हे दोष अडथळा निर्माण करीत असतात. उत्तम गती प्राप्त करून घेण्यासाठी हे दोष बाधा आणतात. वरील सर्व अवगुणांपासून सुटण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तरी त्यापैकी सत्संगती या मार्गाचा चांगला फायदा होतो. सत्संगतीने सज्जनांच्या ठिकाणी असलेल्या सद्गुणांचा प्रभाव माणसावर पडून, त्याचे मन ते सद्गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करू लागते. परंतु, वागणुकीतला वरवरचा बदल उपयोगी नसतो. माणसाच्या बुद्धीत कायम स्वरूपी बदल होणे महत्त्वाचे असते. दुष्टबुद्धीधारक माणसाच्या बुद्धीत आमूलाग्र बदल होण्यासाठी सत्संगतीसारखा दुसरा उपाय नाही. सत्संगतीने सद्बुद्धी होते आणि विचार शुद्धरूपात येऊ लागतात. शुद्ध विचाराने आचरण सुधारून अध्यात्मिक वाटचालीत प्रगती होते. म्हणून स्वामी सांगतात की, ’गती कारणे संगती सज्जनांची’ कारण दुष्टबुद्धीत बदल घडवून तिला सुमती करण्याचे सामर्थ्य सत्संगतीत आहे.

प्रस्तुत श्लोकाच्या शेवटच्या दोन ओळीत स्वामींनी महत्त्वाचा विचार मांडला आहे. मानवी जीवनात कामविकाराला महत्त्वाचे स्थान आहे. त्याचे स्वरूप रती-मदन या रूपकात्मक भाषेत मांडण्याची प्रथा आहे. या जोडीने अखिल मानवजातीलाकामवासनेच्या प्रभावाखाली आणले आहे. मदनाला भगवान शंकरांनी जाळून टाकला असा उल्लेख मागील श्लोक क्र.१३ मध्ये ’जेणे जाळिला काम त्ये नाम ध्यातो’ असा स्वामींनी केला आहे. म्हणजे रती हा नायिकेचा पती मदन नष्ट म्हणजे कोडगा असल्याने कामवासनेचा प्रभाव कायम आहे. कामवासना प्रथम मनात शिरून देह उद्दीपित करते. यातून सुटायचा एकमेव मार्ग ’मनातीत होणे’ म्हणजे वेगळे राहायला शिकणे. आपण मनातीत झालो, तर कामवासनेकडे तटस्थ वृत्तीने पाहता येईल. कामवासनेच्या दुष्प्रभावापासून स्वत:ला वाचवता येईल, यासाठी स्वामी शेवटच्या ओळीत म्हणोनि मनातील होऊनि राहे’ असा उपदेश करीत आहेत.मनातील होण्याच्या विविध छटा स्वामी पुढील श्लोकात सांगणार आहेत. (क्रमश:)सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..