संन्यास संस्कार (उत्तरार्ध-२)

वैदिक षोडश संस्कार

    27-Mar-2024
Total Views |
sanyas sanskar

संन्यास्याचे हृद्गत

यावेळी हा संन्यासेच्छुक यजमान उदार अंतःकरणाने म्हणतो, “आजपर्यंत या संसार सागरात बुडत चाललो होतो, आता मी या जगाच्या क्षणभंगुरतेला पाहून त्यापासून विलग होत आहे. यापुढे माझे मन इकडे तिकडे भरकटणार नाही. मनाची स्वामिनी असलेल्या मनीषा शक्तीच्या आधीन झालो आहे.” परमेश्वराला माता-पिता समजून तो पुढे आत्मविश्वासाने म्हणतो आहे, “हे मातृपितृस्वरूप देवा, तुझ्या कृपेने माझ्यामध्ये इतके आत्मबळ वाढले आहे की, यापुढे भौतिक इंद्रियांच्या मागे न धावता त्यांच्यावर विजय प्राप्त करेल.

ज्या आध्यात्मिक मार्गाला निवडले आहे, त्यावर मी मोठ्या निष्ठेने चालत राहणार आहे. ज्या ज्येष्ठ संन्यासी व्यक्तींनी परमेश्वराला कणाकणांमध्ये व्यापक समजून ज्ञानपूर्वक आचरण केले आहे व तपोनिष्ठ जीवन जगत ते ज्या ठिकाणी पोहोचले आहेत, हे देवा ! तूदेखीलमला त्या (शाश्वत सुखस्थळी) ठिकाणी ने. मी त्यांच्याच मार्गाचे अनुकरण करीत राहीन.” समग्र सृष्टीतील अग्नी, वायू, सूर्य ,चंद्र, सोम, इंद्र, जल, ब्रह्म या महान शक्तींना संबोधून प्रार्थना करताना तो म्हणतोय - ज्याप्रमाणे या दिव्यशक्ती या समग्र विश्वामध्ये सर्वांसाठी एकसारख्याच व्यवहार करतात. त्या कोणत्याही प्रकारचा भेदभाव बाळगत नाहीत, त्याचप्रमाणे मीदेखील आपल्या शुद्ध ज्ञान, पवित्र आचारविचार व सद्व्यवहारांच्या सदुपयोगाने विश्वाचे कल्याण करीत राहील. म्हणजेच स्वतःचे समग्र संन्यस्त जीवन अखिल मानवमात्राच्या व प्राणिसमूहाच्या सेवेत अर्पण करेल!

यानंतर पुनश्च भाताने दिल्या जाणार्‍या १५ आहुत्यांच्या माध्यमाने संन्यास आश्रमात प्रवेश करणार्‍या संन्यासी यजमानास अतिशय मौलिक स्वरूपाचा उद्देश मिळतो. त्यात म्हटले आहे- संन्यासी बनू इच्छिणार्‍याने नेहमी धर्मतत्त्वांचे पालन व पवित्र आचरण करीत इतरांना सत्यज्ञानाचा उपदेश करीत राहावा. यम, नियम, आसन, प्राणायाम इत्यादी योगाच्या आठ अंगांचा अभ्यास करावा. शम, दम, शांतता, सुशीलता, ज्ञान, विज्ञान आदींच्या माध्यमाने कल्याणकारक अशा गुण, कर्म व स्वभावाने परिपूर्ण व्हावे. भगवंताला आपला सोबती साहाय्यक मानत मोठ्या पुरुषार्थाने आपल्या शरीर, मन, प्राण व इंद्रियांना वाईट आचरणापासूनव अशुद्ध व्यवहारापासून दूर ठेवावे. उत्तमोत्तम असेच शुभ आचरण करावे. कधीही पक्षपात करू नये. कटकारस्थाने किंवा अधार्मिक व्यवहारांपासून स्वतःला दूर ठेवावे. समाजातील अज्ञानी बांधवांना दुर्गुण व दोषांना दूर करीत त्यांना योग्य तो सदुपदेश करावा. त्यांना चांगले ते शिकवून वाईटांपासून परावृत्त करावे. स्वतः आध्यात्मिक साधनेच्या बळावर आनंदी असावे. इतरांनाही आनंद प्रदान करावा.

त्याबरोबरच आणखी ३५ आहुत्या प्रदान कराव्यात. या लघुमंत्रांतून संन्यास धारण करणारी व्यक्ती समग्र सृष्टीतील अग्नी, विश्वदेव, ध्रुवभूमी, ध्रुवक्षिती, धर्म, जल, औषधी, वनस्पती, गृह, मृत्यू, सर्व प्राणी पृथ्वीलोक, सूर्य, चंद्र, वायू, नक्षत्र, इंद्र, बृहस्पती, प्रजापती, ब्रह्म इत्यादी जवळपास ३० दिव्यशक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहे. या सर्व शक्ती म्हणजे समग्र सृष्टीची आत्मा असून त्या नित्य विद्यमान आहेत. ‘तत्पुरो नमः!’ अर्थात ‘या सर्वांच्या पुढे मी माझे डोके नमवितो,’ असे याप्रसंगी तो म्हणतो. हे सर्व मंत्र तैत्तिरीय आरण्यकाच्या दहाव्या प्रपाठकतून निवडले आहेत. या मंत्रांच्या आहुत्या प्रदान केल्यानंतर संन्यास ग्रहण करणारा यजमान डोक्यावरील पाच-सहा केस सोडून दाढी, मिशा यांच्यासह संपूर्ण डोक्याचे मुंडन करून स्नान करतो. त्यानंतर मुंडवलेल्या डोक्यावर ऋग्वेदातील पुरुष सूक्त मंत्रांनी १०४ वेळा अभिषेक केला जातो.

पुन्हा आचमन करून कमीत कमी तीन वेळा प्राणायाम करतो. हात जोडून यज्ञवेदीसमोर डोळे मिटून मनातल्या मनात ओम् ब्रह्मणे नमः, ओम इंद्राय नमः, ओम सूर्याय नमः, ओम् सोमाय नमः, ओम् आत्मने नमः! ओम् अंतरात्मने नमः या सहा मंत्रांचा जप करतो. सोबतच तुपाच्या चार आहुत्यादेखील प्रदान केल्या जातात.यानंतर मधुपर्क विधी पूर्ण करून पुनश्च प्राणायाम केला जातो व मनात गायत्री मंत्राचा जप करीत त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या वेळी ‘सावित्रीं प्रविशामि’ असा उल्लेख केला जातो. शेवटी अन्य मंत्रांनी प्रायश्चित्त व इतर आहुत्या प्रदान करून या बृहद् यज्ञाची पूर्णाहुती दिली जाते.यज्ञाच्या शेवटी संन्यासी यजमान सर्वांच्या समोर हस्तांजलीत (ओंजळीत) पाणी घेऊन भूमीवर सोडतो आणि म्हणतो- ‘पुत्रैषणा, वित्तैषणा, लोकैषणा मया परित्यक्ता, मत्त: सर्वभूतेभ्योऽभयमस्तु स्वाहा’ म्हणजेच आजपासूनमी पुत्र, पौत्रादी परिवाराचा मोह, धन व इतर भौतिक वस्तूंचा मोह, इहलोकातील पदप्रतिष्ठा, मान -सन्मान इत्यादींचा मोह या त्रिविध मोहांचा व इच्छा आकांक्षांचा त्याग करीत आहे. आता माझ्यापासून सर्वभूत म्हणजेच समस्त प्राणिसमूहास अभय (निर्भयता, आश्रय) मिळत राहो, असे हृदयस्थ उद्गार काढतो. यानंतर नदीच्या पाण्यात किंवा एखाद्या टपात भरलेल्या पाण्यात नाभीपर्यंत प्रविष्ट होत पूर्व दिशेकडे मुख करून उभा राहतो व पुनश्च गायत्री मंत्रांचा जाप करतो.

सम् + न्यस्त = संन्यस्त! सर्वस्वाचा त्याग करीत परोपकारी जीवन जगण्यासाठी तत्पर झालेला हा संन्यासी यजमान भू:,भुव:,स्व: या तिन्ही लोकांसंबंधीच्या मोहबंधनाचा त्याग करतो, तर पुनश्च हस्तांजलीत पाणी घेऊन ‘ओम् अभयं सर्वभूतेभ्यो मत्त: स्वाहा’ या मंत्राने सर्व प्राणिसमूहास अभयता (निर्वैर अहिंसक भावना) प्रदान करण्याचा शुभ संकल्प करतो. तत्पश्चात क्षौरकर्मानंतर जे शेंडीसाठी जे पाच-सहा केस डोक्यावर शिल्लक राहिले होते, त्यास तो एकैक करून उखडून व यज्ञोपवीत (जाणवे) उतरवून ते पाण्याने भरलेल्या ओंजळीत घेतो. यानंतर ‘ओम् आपो वै सर्वा: देवता: स्वाहा’ व ‘ओम् भू: स्वाहा’ या मंत्रांनी आहुती दिली जाते. पुढे संन्यासेच्छुक यजमान पाण्याच्या बाहेर येतो. त्यावेळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ संन्यासी विद्वानाच्या शुभहस्ते भगवी वस्त्रे प्रदान केली जातात. नंतर दीक्षा प्रदान करणारे संन्यासी (आचार्य) हे आपल्या हाती दंड घेऊन उभे राहतात व त्या संन्यासेच्छुक व्यक्ती त्यांच्या समोर हात जोडून राहाते. ‘ओम् ये मे दण्ड: परापत’ या मंत्राचा उच्चार करून तो दंड स्वीकारतो.

याप्रसंगी या संन्याशास स्वामी(....)आनंद असे एखादे नवे नाव प्रदान केले जाते. सोबतच भिक्षापात्र रुपाने कमंडलू व इतर साहित्य दिले जाते. शेवटी उपस्थित ज्येष्ठ मंडळी या नूतन यतिवरास स्वस्तिमंत्रांनी शुभकामना प्रदान करतात.अशा तर्‍हेने हा संन्यासी आता या भगवंताच्या सृष्टीव्यवस्थेत संपूर्ण जगाचे कल्याण करण्यासाठी तत्पर झाला आहे. संन्यासी म्हणजेच आपले सर्वस्व समाज, राष्ट्र व समग्र विश्वाला त्रिविध दुःखापासून मुक्त करण्यासाठी परोपकारमय जीवन जगणारा परमेश्वराचा प्रतिनिधी होय. तो आपल्या विशुद्ध ज्ञान सामर्थ्याने, सदाचारी जीवनाने, अपूर्व त्याग व परोपकाराच्या भावनेने अखंडित तेवत असलेला तेजोमय दीपस्तंभ होय.भारतीय ऋषिमुनींच्या परंपरेत असे अनेक संन्यासी महापुरुष होऊन गेले की, ज्यांनी जीवनभर ‘इदं विश्वाय.... इदं नमः’ या भावनेतून आपले सर्वस्व अर्पिले, अशा असंख्य परिव्राजक पुण्यात्म्यांना शतकोटी वंदन!


-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य