संगीत ते समाधी (भाग-३०)

    27-Mar-2024
Total Views |
sangit and samadhi


चित्ताला कल्याणप्रद भव्य-दिव्य भावना देण्याचे कार्य कल्याण थाट करतो. पंडित भातखंडे यांनी त्याचे वर्णन केल्याप्रमाणे तो खरोखरच ’कल्याणौ विमलौ विभाती सकलौ तीव्र स्वर मंडितौ’ असाच स्वरमेल आहे. स्वर्गीय दिव्य-भव्य संगीत कल्याण मेलाचेच. नामसाधर्म्याने जवळ जवळ वाटणारे मारुबिहाग, मार्गविहाग आणि मार्गकल्याण राग पाहा. मारुबिहागातील दोन्ही मध्यमांमुळे त्याला कोणी वेलावलीत न्यायला पाहतात, तर तीव्र मध्यम दाखवून कोणी त्याला कल्याणात घेऊ पाहतात. पण, वेलावलीतील कोमल मध्यमाने मात्र मारुबिहागाची भव्यदिव्यता कोमल करून आपल्या प्रेयसीच्या प्रतीक्षेकरिता ताटकळत ठेवली आहे, हे कोणाही सुजाण व्यक्तीला मानावे लागेल. मार्गबिहागात कोमल मध्यमाला स्थान नाही. त्यामुळे मार्गबिहागातील स्वर श्रोत्याला स्वर्गीय हिंदोळ्यावर झुलवीत-झुलवीत स्वर्गीय वातावरणातच न्यायला पाहतात. एका मध्यमाचा एवढा प्रताप! मार्गकल्याण तर श्रोत्याला ध्यानावस्थेतच नेऊ पाहतो आणि जगातील कोमलभावना जणूकाही भगवंताकरिताच राखून ठेवल्या आहेत. असे दिव्य सामर्थ्य श्रोत्यांत उत्पन्न करतो. याचे कारण त्यातील ऋषभ-गंधाराची विशिष्ट पद्धतीची युती हे होय. मार्ग कल्याण गाताना शाश्वत कल्याणाचा मार्गच खुला होतो. गायक आणि श्रोते मार्गकल्याण योग्य तर्‍हेने गात आणि ऐकत असतील, तर त्यांच्या भ्रुमध्यातून प्रकाश शलाका बाहेर पडून तेवढ्यापुरते त्यांना ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही.

कल्याण थाट

ज्ञानसत्रातील, कीर्तनातील, प्रवचनातील श्लोक, अनुष्टुपछंद रचना ही सर्व कल्याण थाटातील असतात. श्रोत्यांच्या मनावर किती जागृत परिणाम होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना येत असेल. कीर्तनात पेंगणारे कल्याण थाटातील तीव्र स्वरांच्या मार्‍याने जागरूक होऊन कल्याण मार्गाला लागतात. कल्याण मेलातील श्रृंगार, वीररसांना एकप्रकारचे दिव्यत्व असते, तेवढे दिव्यत्व इतर मेलांना नसते. शुद्ध कल्याणातील ‘मान जिन करो, माननी आयो हैं सावन मास’ या पदाचे स्वर आणि अर्थ याचा मेळ घालून त्यांचा श्रोत्यांच्या मनावर काय परिणाम होतो, हे पाहावे. हेमकल्याणातील ’अब मैं कासे जाय कहूँ अपने जियाकी व्यथा’ हे पदही अर्थ आणि स्वरसंयोजनाच्या दृष्टीने किती परिणामकारक आहे याचा अनुभव घ्यावा. करुण गीते कल्याण थाटात नसावीत. त्यांचा श्रोत्यांवर विपरितच परिणाम होईल. याचे उदाहरण म्हणजे यमनकल्याणातील ’अरी येरी आली पियाबिन’ हे पद विचार करण्यासारखे आहे. यमन कल्याणाचे धीरगंभीर, पण उत्तान स्वर कानावर पडल्यावर त्यातील ’जबसे पिया परदेश गवन किनो, रतिया कटत मोरी तारे गिनगिन’ असल्या विरह पंक्ती अनाठायी एवम् मनाला खटकणार्‍या वाटतात.

याचा अर्थ असा की, असल्या विरह भावनांना कल्याण मेल योग्य नाही. कल्याणांचा मेल घडविणारा तो कल्याण मेल, यात अकल्याण कसे काय होणार? कल्याणातील कल्याणप्रद अवस्थेचे कारण त्यातील सर्वच तीव्र स्वर होत. कल्याणातील एक ऋषभ स्वर कोमल केल्याने त्यातील भव्यदिव्यपणाला एक प्रकारचे दिव्य कोमलत्व येऊन सारे वातावरण भगवंताच्या आठवणीने भारले जाते. पूर्याकल्याणातील ’होंवन लागी सांझ’ हे गीत या दृष्टीने पाहावे. अंतर्‍यातील ’अब तो याद करो’ ही पंक्ती भगवंताकरिता किती आसुसलेली आहे, हे कळून येईल. कल्याणातील गंधार कोमल केल्यावर त्यावर विरहाची आणखी एक मात्रा स्वार होते आणि तो राग मधुवंतीच्या धर्मवती थाटात वावरू लागतो. परंतु, त्याचा सर्व थाट भगवंताला आळविण्याकरिताच होईल. ’मधुवंतिच्या सुरासुरांतून, आळविते मी नाम, एकदा दर्शन दे भगवान’ असेच गायकाच्या तोंडून सार्थ उद्गार निघतील, अन्य उद्गार या रागाला शोभणार नाहीत. कल्याण थाटातील मध्यम कोमल केल्यास वेलावली मेल तयार होतो.
 
वेलावली एक सार्थ नाव! अपभ्रंशाने आम्ही त्याला ‘बिलावल’ म्हणतो हे वेगळे; पण ती आहे ‘वेलावली’ किंवा ‘शंकराभरण थाटावली.’ या रागाची प्रकृती अतिशय कोमल पण निर्मल, निर्व्याज अशी आहे. म्हणून ही रागिणी मानायला हवी. कोमल मध्यमामुळे सर्व स्त्रीसुलभ निर्व्याज्य कोमलता, निर्व्याज्य प्रेम आणि निर्व्याज्य अधीरता या रागिणीत अवतरली आहे. शरीरातील मध्यमस्थानी विराजमान झालेले हृदयच कोमल, मग का नाही त्यात स्त्रीसुलभ निर्व्याज्य निर्मल प्रेम राहणार? म्हणून वेलावलीतील रागविषय अशाच जिव्हाळ्याचे आणि स्त्रीसुलभ निर्मळ प्रेमाने ओथंबलेले असतात. तसे नसल्यास रागविषयाची हानीच होईल कारण रागिणीचा भाव एक; तर वर्णन त्याहून भिन्न असे होऊन रागिणीचे अंतःकरण विदग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. पत्नीला तिचा पती देवच असतो. ’असे पती देवची ललनांना, तयांच्या अन्य भावना ना’ म्हणून वेलावलीतील रागवर्णने भगवंताच्या स्त्रीसुलभ दिव्य प्रेमाने भारलेली असतात. त्यात एक निर्धार असतो आणि आत्मार्पण असते. वेलावलीचा भाव असाच असावा. या विरहित पदरचना असल्यास ती रागिणीला मारक ठरेल. पंचमावरून कोमल मध्यमावर उतरताना गंधाराचा आधार घेऊन मध्यमाचा विलास करावा लागतो. मध्यम पण कोमल. त्या कोमल मध्यमात सार्‍या विश्वाचे कोमल भाव सामावले आहेत असे वाटते. कोमल मध्यमाचा एवढा जगड्व्याळ प्रताप आहे. विश्वकर्त्यालाच कोमल भाव उत्पन्न होतात कोमल मध्यमामुळे! भक्तीचा वज्रनिर्धार व्यक्त झाला आहे भिष्मपितामहाच्या वाणीतून ’हरिसों चक्र धरावू, भीषम नाम कहाऊँ!’

आता कोमल अंतःकरण करण्याची पाळी आली आहे धैवतांवर, पण धैवत अडेल स्वभावाचा! आपल्या संवादी स्वराला म्हणजे ऋषभालाबरोबर घेतल्याशिवाय धैवत वाकायला तयार नाही. धैवताशिवाय ऋषभ वाकला; पण धैवत एकटाच वाकणार नाही, दुसर्‍यांनाही वाकवणार. ऋषभ त्याला येथे संवादी म्हणून साथ देतो. कोमल ऋषभ आणि कोमल धैवत. किती धीरगंभीर करुण रसप्रधान जोडी ही! संधिकालच्या छाया रंगविणारी ही जोडी! हिने भारतीय संगीतातील स्वरांना एक लक्ष्मण रेषा दिली. सायंगेय रागाचे पलीकडे, रात्रिगेय राग तर आलिकडे, दिवसगेय रागरागिण्या कोमल ऋषभधैवतात सार्‍या विश्वाचे कारुण्य साठलेले आहे. अनेक रागरागिण्या या कोमल ऋषभधैवताने भारतीय संगीतात अजोड होऊन बसल्या आहेत. पूर्वी थाटातील सर्व रागरागिण्या याच कारुण्याने ओथंबलेल्या आहेत.पूर्वीच्या थाटाला प्राचीन कालात ‘श्री थाट’ म्हणत. नावच श्री! आज पूर्वी थाटातील एक रागिणी म्हणून श्री पट्टराणीच्या पदावर विराजमान झाली आहे. इंद्राणीप्रमाणे सदा धीरगंभीर, न बदलणारी. ’हरी के चरण कमल निसदिन सुमर रे’ असे धीरगंभीर वाणीने सांगणारी श्री रागिणी! पण, या रागिणीला राग आणणारे एक वर्णन आहे. ’मेरी मोसे आसन गैली पासन’ अती थिल्लर आणि बिभत्स वर्णन, या रागिणीला न शोभणारे!


योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)