कम्युनिस्टांचा जातीयवाद

    27-Mar-2024
Total Views |
CM Pinarayi Vijayan

भारतात सर्वाधिक ढोंगी आणि जातीयवादी पक्ष कोणते असतील, तर ते कम्युनिस्ट पक्ष. भारतीयांनी पूर्णपणे नाकारलेल्या या पक्षांना काँग्रेसने आपल्या राजकीय सोयीसाठी जीवंत ठेवले. कम्युनिस्टांना म्हणे धर्माची अ‍ॅलर्जी असते; पण भारतातील कम्युनिस्टांना फक्त हिंदू धर्माची अ‍ॅलर्जी असल्याचे पुनश्च सिद्ध झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात कोणताही ठोस आरोप किंवा मुद्दा हाती लागत नसल्याने विरोधी पक्षांची आणि नेत्यांची कुचंबणा होताना दिसते. त्यामुळे नवनवे वाद उकरून काढले जात असून, त्यांचा संबंध येनकेन प्रकारेण भाजपशी जोडण्याचा खेळ सुरू झाला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी नुकताच असा एक वाद उत्पन्न केला खरा; पण दुर्दैवाने ते स्वतःच त्यात अडकले आहेत.मल्लपुरम येथे ‘सीएए’ या कायद्याविरोधात आयोजित केलेल्या एका मेळाव्यात त्यांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘जय हिंद’ या घोषणा सर्वप्रथम एका मुस्लीम नेत्याने उच्चारल्याचे सांगत, त्यामुळे आता रा. स्व. संघ आणि भाजप या घोषणा देण्याचे बंद करणार का, असा प्रश्न विचारला. आपण भाजपपुढे एक बिनतोड डाव टाकल्याचे समाधान पिनराई यांना वाटले असेल. पण, भाजपचे विद्वान प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी त्यावर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, विजयन यांचे दात त्यांच्याच घशात अडकले.

डॉ. त्रिवेदी यांनी या आरोपाला उत्तर देताना, विरोधकांच्या देशविरोधी मानसिकतेवर कटाक्ष टाकला. ‘सीएए’ कायद्यावर बोलताना ‘भारतमाता की जय’चा मुद्दा मुळात आला कोठून, असा प्रश्न करीत त्यांनी त्यामागचा बादरायण संबंध दाखवून दिला. या घोषणा एका ‘मुस्लिमा’ने नव्हे, तर एका ‘भारतीया’ने केल्याचे स्मरण विजयन यांना करून दिले. पण, विजयन यांना त्यात एक मुस्लीम दिसला, यातूनच त्यांची जातीयवादी आणि भेदाभेद करणारी मानसिकता आणि दूषित दृष्टी दिसून येते. त्यानंतर डॉ. त्रिवेदी यांनी ज्यांनी सर्वप्रथम ही घोषणा दिली, त्या दीवाण अझीमुल्ला खान यांची माहिती दिली. अझीमुल्ला खान हे पहिल्या स्वातंत्र्यसमरातील नेते नानासाहेब पेशवे यांचे दिवाण होते. पेशवे हे भारतातील पहिल्या हिंदू पदपातशाहीचे (छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे) प्रतिनिधी होते आणि त्या अर्थाने अझीमुल्ला खान हे हिंदवी स्वराज्याचेच शिपाई होते. तसेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताचे पहिले जाहीर गायन १८९५ मध्ये काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात करण्यात आले, ज्याचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते रेहमतुल्ला अहमद सयानी हे होते. त्या काळात हे सर्वजण भारताच्या एकात्मतेचे प्रतीक होते. पण, आता या नेत्यांची त्यांच्या धर्माच्या आधारावर वाटणी करण्याचा घातक प्रयत्न केला जात आहे.

‘मोदीविरोध’ करताना आपण ‘राष्ट्रविरोध’ कधी सुरू केला, हेही या विरोधकांच्या लक्षात येत नाही किंवा येत असले तरी त्यांचा त्यामागील खरा हेतू कदाचित तोच असू शकतो.वास्तविक विजयन यांनी हा प्रश्न खरे तर मुस्लीम मतदारांना विचारायला हवा होता. एक मुस्लीम असून, अझीमुल्ला खान ’भारतमाता की जय’ अशी घोषणा देऊ शकत होते, तर आजच्या काळातील मुस्लीम ही घोषणा का देत नाहीत? जे मुस्लीम आपण अल्लाशिवाय अन्य कोणाला वंदन करू शकत नाही किंवा अन्य कोणासमोर झुकत नाही, असा दावा करतात, त्यांनी आता दीवाण अझीमुल्ला खान यांना यांच्यावर बंदी घालावी. स्वातंत्र्यासाठी अनेक मुस्लिमांनीही बलिदान केले आहे. मग ते सर्व दिशाभूल झालेले मुस्लीम होते का, असा प्रश्न या कट्टरवाद्यांना विचारला पाहिजे.भारतातील मतदारांमध्ये विशेषतः हिंदू मतदारांमध्ये जात-पात, भाषा, प्रांत, पंथ वगैरे गोष्टींवरून फूट पाडून त्यांना विखरून ठेवण्याचे कार्य कम्युनिस्ट आणि काँग्रेस या पक्षांनी गेली अनेक दशके केले. अन्य धर्मीय सामान्यतः एकगठ्ठा मतदान करतात, हा अनुभव असल्याने, हिंदू मतदारांमध्ये अशी फूट पाडून, आपली सत्ता कायम राखण्यात काँग्रेस यशस्वी झाली होती.

आजही या धोरणात फरक पडलेला नसला, तरी त्याचे स्वरूप सूचकपणे बदलले आहे. थेट जात काढण्याऐवजी आता इतर मागासवर्गीय, दलित, अनुसूचित जाती आणि जमाती तसेच उत्तर-दक्षिण भारतीय अशा व्यापक पायावर फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, पंतप्रधान मोदी यांच्या रुपाने सर्व हिंदू मतदारांना एकत्र सांधणारा दुवा निर्माण झाल्यामुळे, विरोधकांपुढे अडचण निर्माण झाली आहे.कम्युनिस्ट हे पराभूत मानसिकतेचे बळी असून, जगाने या विचारसरणीला केव्हाच मूठमाती दिली आहे. आपले राजकारण जातीयवादी नसून, ते सेक्युलर आणि तत्त्वनिष्ठ असल्याचा दावा कम्युनिस्ट करतात. पण, मग त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांमध्ये हिंदू-मुस्लीम हा भेद कसा केला? भाजप किंवा रा. स्व. संघाने कधी हा मुद्दा उपस्थित केलेला नव्हता. विजयन यांना हा हिंदू-मुस्लीम मुद्दा उपस्थित करण्याची गरज का भासावी? तसेच केरळमध्ये काँग्रेसचा विरोध करायचा; पण प. बंगाल आणि देशभरात त्याच पक्षाच्या गळ्यात गळे घालून भाजपविरोधी राजकारण करायचे, ही कसली तत्त्वनिष्ठा? हा निव्वळ ढोंगीपणा आहे.

ज्यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप हे कम्युनिस्ट करतात, त्या नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या सर्व योजनांचे लाभ कोणताही भेदाभेद न करता, सर्व गरजूंना दिले आहेत. किंबहुना, या योजनांचा सर्वाधिक लाभ मुस्लीम समाजालाच झाला आहे. परिणामी, या समाजातील सामान्य मुस्लिमांमध्ये विशेषतः महिलांमध्ये मोदी यांच्यासाठी पाठिंबा वाढत आहे. आपली हक्काची मतपेढी अशी लुटली जात असल्याचे पाहून, कम्युनिस्टांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यामुळे त्यांनी आणि काँग्रेसने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम करणे सुरू केले आहे. पण, त्यात ते यशस्वी होणार नाहीत.केरळमध्ये भाजपचा आणि मोदी यांचा प्रभाव वाढत असून सामान्य मतदारांमध्ये भाजपचा पायाही विस्तृत होत चालला आहे, याची जाणीव केरळातील कम्युनिस्ट नेत्यांना झाली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले कम्युनिस्ट नेते कोठून तरी नवा वाद उकरून काढण्याच्या प्रयत्नांत आहेत. विजयन यांनी निर्माण केलेला, भारतमातेचा वाद हा अशाच प्रकारचा कृत्रिम आहे. पण, त्यांच्या दुर्दैवाने ते स्वतःच या वादात तोंडघशी पडले आहेत.


राहुल बोरगांवकर