तो ‘आयुष्या’ला भिडला!

    27-Mar-2024   
Total Views |
Aayush Ashish Bhide

चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि निवडलं पूर्ण वेळ अभिनय क्षेत्र. पण, त्याचवेळी आई-वडिलांचं निधन झालं, तरी आयुष भिडे आयुष्याला भिडलाच!

आयुषचा जन्म सांगलीचा; पण लहानपणापासूनच तो सोपारा या ऐतिहासिक नगरीत वास्तव्याला आहे. त्याचे वडील अदानी समूहात व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. आई आकांक्षा भिडे या गृहिणी होत्या. त्याचे माध्यमिक शिक्षण नालासोपारातील सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये झाले. तसेच विज्ञान शाखेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्याने सेंट पीटर्स महाविद्यालयातून पूर्ण केले. पुढे अभियांत्रिकी शाखेतून विवा महाविद्यालयातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अर्ध वेळ ’एमबीए’चे शिक्षण घेतले आहे.आयुषला लहानपणापासून फुटबॉल, व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांची विशेष आवड. परंतु, २००९ला शालेय संस्थेच्या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात त्याने सहभाग घेतला. जिथे त्याला ’सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पहिल्यांदा पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्याची नाट्य क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. मुळात नाटकाचं बाळकडू त्याच्या घरात बाबांकडूनच त्याला मिळालं.

आयुषचे बाबा आशिष भिडेदेखील नोकरी सांभाळून, नाट्य क्षेत्रात कार्यरत होते. त्याच पद्धतीने आयुषदेखील पदवीचे शिक्षण घेत असताना, नाटकात काम करू लागला. याच दरम्यान आयुषने आपल्या महाविद्यालयातील काही मित्रमंडळींना सोबत घेऊन, वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. तसेच दुसर्‍या बाजूला तो क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सहभागी होत असे.
मुळात आयुष छंद म्हणून नाट्य क्षेत्राकडे पाहत होता. त्यामुळेच पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने नोकरीला सुरुवात केली.परंतु, नोकरी सोबतच वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमध्ये तो सहभाग घेत राहिला. त्यावेळी विवा महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी शाखेत ’युवा महोत्सवा’साठी दिग्दर्शक म्हणूनदेखील त्याने काम केले. २०१७ ते २०२१ पर्यंत जवळजवळ चार वर्षं नोकरी केल्यानंतर, अखेर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे, असे आयुषला वाटले. दरम्यान, कोरोनाच्या काळात ’आदी प्रोडक्शन’, ’मॅड बॉईज’ आणि ’सिनेमा स्टुडिओ’ अशा तीन निर्मिती संस्था त्याने सुरू केल्या. या संस्थांच्या माध्यमातून युट्यूब व्हिडिओ, लघुपट बनवण्याचं काम केले.मधल्या काळात नाट्य विषयाशी संबंधित ऑनलाईन तासिका, नाट्य शिबीरदेखील त्याने घ्यायला सुरुवात केली. या सर्वांत आयुषच्या वडिलांची साथ त्याच्यासाठी तितकीच महत्त्वाची होती. त्याचवेळी आयुषला ’जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय आयुषने घेतला.

मुळात पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात उतरण्याआधी आयुषने आपल्या वडिलांशी यासंदर्भात चर्चा केली होती. आणि खर्‍या अर्थाने घरातून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे आयुष चांगली नोकरी सोडून, पुन्हा शून्यातून सुरुवात करण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळाला. पण, नियतीच्या नशिबात काही वेगळंच होतं. एकीकडे आयुषच्या मालिकेचं चित्रीकरण सुरू होणार होतं; पण दुसरीकडे आयुषच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. कोरोना संसर्गामुळे शरीरातलं ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागलं आणि अचानक आयुष्य वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलं.दरम्यान, आईलाही असाच त्रास जाणवू लागल्यामुळे, त्यांनाही हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आणि अचानक एकुलत्या एक आयुषच्या डोक्यावरच मायेचं छत्र हरवलं. आधी वडिलांचं आणि मग १४ दिवसांनी आईचे निधन झालं. एकीकडे आयुष नव्याने आयुष्याची सुरुवात करत होता. दुसरीकडे, त्याच वेळी संघर्ष काळात त्याला साथ देणारे आईवडील या जगाचा निरोप घेऊन कायमचे निघून गेले होते.

पण, आई-वडिलांच्या निधनानंतर पुन्हा शून्यातून सुरुवात करणे आयुषसाठी कठीण होते. कारण, यावेळी ”आयुष तुला हवे, ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे,“ असे म्हणणारे आईवडील दोघेही या जगात नव्हते.आयुषने अखेर आयुष्याला भिडण्याचा आणि अभिनय क्षेत्रात स्वतःला आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयुषने ’जय भवानी जय शिवाजी’, ‘आई कुठे काय करते?’, ’रंग माझा वेगळा’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ’शुभविवाह’, ‘प्रेमाची गोष्ट’ व ‘प्रेमात रंग यावे’ या मालिकांमध्ये काम केले. तसेच ‘विठ्ठला’, ‘कॉफीन अंडर फाय फिट’, ‘दिल धक धक करे’, ‘प्रणाम भारत’, ’एप्रिल फूल बनाया’ व ‘मीटू’ अशा नाटकांत आयुषने वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. तसेच वसई-कला क्रीडा महोत्सव, मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव, अटल करंडक, अमर हिंद मंडळ, राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिकेही पटकावली. तसेच आयुष भिडेला ’द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी २०२२-२३चा ‘अपकमिंग आर्टिस्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता आयुष हा ‘श्री आशिष कलामंच’ आणि ‘आम्ही रंगकर्मी’ अशा दोन नाट्यसंस्था देखील चालवतो. सध्या आयुष ’घोर’ या दीर्घांकात दिग्दर्शन आणि अभिनय करत आहे, तरी भविष्यात आई-वडिलांच्या आशीर्वादाने चित्रपट आणि नाटकात अभिनय करण्याची इच्छा असल्याचे आयुष आवर्जून सांगतो. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून आयुषला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

सुप्रिम मस्कर


सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.