उबाठा गटाची पहिली यादी जाहीर; अनेक जागांवर धक्कातंत्राचा वापर!

    27-Mar-2024
Total Views |
 uddhav thackray
 
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरण्याआधीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील उबाठा गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी समाज माध्यमावर लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
 
उबाठा गटाने यावेळी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांना तिकीट दिले आहे. याशिवाय मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उबाठा गटाच्या या यादीत सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांनाच उमेदवार बनवण्यात आले आहे. या जागेवर काँग्रेस आपला दावा सांगत आहे.
 
 
सांगलीच्या जागेवरुनच काँग्रेस आणि उबाठा गटामध्ये संघर्ष सुरू होता. उबाठा गटाने उमेदवार जाहीर केल्यामुळे आता काँग्रेस या जागेवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उबाठा गटाने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपली दावेदारी सांगितली होती.
 
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम : संजय देशमुख
मावळ : संजोग वाघेरे-पाटील
सांगली : चंद्रहार पाटील
हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर : चंद्रकांत खैरे
धारशिव : ओमराज निंबाळकर
शिर्डी : भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक : राजाभाऊ वाजे
रायगड : अनंत गीते
ठाणे : राजन विचारे
सिंधुदुर्ग-रत्नागिरी : विनायक राऊत
मुंबई ईशान्य : संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई : अरविंद सावंत
मुंबई उत्तर पश्चिम : अमोल कीर्तिकर
मुंबई दक्षिण मध्य : अनिल देसाई
परभणी : संजय जाधव
 
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला पाच जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला आठ जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी ११ जागांवर तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी ११ जागांवर मतदान होणार आहे. तसेच, पाचव्या टप्प्यात २० मे रोजी १३ जागांवर मतदान होणार आहे.