रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन

पंतप्रधान आणि सरसंघचालकांनी वाहिली आदरांजली

    27-Mar-2024
Total Views |

Smarananad Maharaj
 
कोलकाता : रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज (९५) (Smarananand Maharaj) यांचे मंगळवार, दि. २६ मार्च रोजी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दक्षिण कोलकाता येथील रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानच्या शिशु मंगल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून वयाच्या आजारामुळे त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरु होते. रामकृष्ण मठ आणि मिशनचे माजी अध्यक्ष स्वामी आत्मस्थानंद महाराज यांच्या निधनानंतर स्वामी स्मरणानंद महाराज यांनी जुलै, २०१७ मध्ये रामकृष्ण मठ आणि मिशनचे १६ वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता.

अध्यात्म आणि सेवेसाठी समर्पित जीवन
रामकृष्ण मठ आणि मिशनचे आदरणीय अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांनी आपले जीवन अध्यात्म आणि सेवेसाठी समर्पित केले. त्यांनी अनेकांच्या मनावर अमिट छाप सोडली. त्यांची करुणा आणि ज्ञान अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. बेलूर मठातील असंख्य भक्तांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अध्यात्मातील अनुकरणीय समर्पण
स्वामी स्मरणानंद महाराज यांनी आपल्या सेवा आणि अध्यात्माबद्दलच्या अनुकरणीय समर्पणाने रामकृष्ण मठ आणि मिशनला महान आणि प्रेरणादायी परंपरेत उत्कृष्ट नेतृत्व प्रदान केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व अनुयायांच्या दु:खात सहभागी आहे. स्वामीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. रामकृष्ण मठाचे महान कार्य त्यांच्या संकल्पाने आणि उत्कट भावनेने वाढत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक, रा.स्व.संघ