'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'चा काँग्रेसला पाठींबा?; हे आहे 'त्या' व्हिडिओचं सत्य!
27 Mar 2024 15:22:02
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'च्या नावाने जनार्दन मून यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद (Fake RSS Press Conference) घेत लोकसभा निवडणुकीसाठी इंडी आघाडीला आणि काँग्रेसला समर्थन दिल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी कुठलीही भूमिका नसून संघाच्या नावाने नवीन संघटना स्थापन करून नोंदणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
नागपूर : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ही राष्ट्रविचारांची जोपासना आणि समाज प्रबोधनाचे कार्य करणारी संघटना आहे. आज संघाला समाजाची मिळणारी साथ ही संघ स्वयंसेवकांच्या तपश्चर्येचे आणि नि:स्वार्थ सेवेचेच फळ आहे. परंतु, वेळोवेळी संघविरोधी मानसिकता असलेले काही लोक समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी खोटे-खोटे दावे करत राहतात आणि संघाबाबत चुकीचा प्रचारही केला जातो. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'च्या नावाने जनार्दन मून यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी इंडी आघाडीला आणि काँग्रेसला समर्थन दिल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी कुठलीही भूमिका नसून संघाच्या नावाने नवीन संघटना स्थापन करून नोंदणी करण्याचा प्रयत्न होत आहे.
संघाच्या नावाखाली घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेचा व्हीडिओ नुकताच समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यात स्वत:ला रा.स्व.संघाचे अधिकारी म्हणवून घेणारे जनार्दन मून पत्रकारांना संबोधताना दिसत आहेत. वास्तविक जनार्दन मून यांनी २०१७ रोजी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने संस्थेची नोंदणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. जनार्दन मून यांचा अर्ज सहायक निबंधक अधिकारी, नागपूर यांनी फेटाळला. तेव्हापासून ही व्यक्ती संस्थेच्या नोंदणीसाठी सतत प्रयत्न करत आहे.
जानेवारी २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनार्दन मून यांची याचिका फेटाळत निबंधक अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. गेली अनेक वर्ष हे लोक संघाच्या नावाने नवीन संघटना स्थापन करून नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही त्यास यश न मिळाल्याने प्रसिद्धीसाठी केलेले नाटक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अशा खोट्या प्रचारात आणि दाव्यांमध्ये तथ्य नाही. ही टोळी समाजाला भ्रमित करण्याचे काम करत आहे.