ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा तो देश मोठा; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    27-Mar-2024
Total Views |
dr. mohanji bhagwat
 
मुंबई : "समाजाने ज्याला राजा बनवले त्याने राज्यकारभार चालवला. ज्याने ते नाही केले त्या राजास समाजाने उतरवले. देशाचे उत्थान हे समाजाच्या उत्थानावर अवलंबून आहे. देश मोठा व्हायचा असेल तर समाज मोठा व्हायला हवा. ज्या देशाचा सामान्य माणूस मोठा तो देश मोठा.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत Dr. Mohanji Bhagwat यांनी केले.
 
'लोकमान्य सेवा संघ, पारले' संस्थेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. २७ मार्च रोजी सरसंघचालकांचे मार्गदर्शनपर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी 'सामाजिक परिवर्तन-संस्थांची भूमिका' या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. स्वा. सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ, पारले येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.
 
जपानच्या उन्नतीविषयी बोलताना सरसंघचालक म्हणाले, " जपानच्या उन्नतीचे कारण मुख्यतः जपानचे लोक आहेत. कारण जपानचे लोक देशभक्त आहेत, साहसी आहेत. कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्यासाठी ते सदैव तयार असतात. ते कधी एकट्याच्या उन्नतीचा विचार करत नाहीत. तेथील लोक अनुशासित आहेत. म्हणून समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे."
 
पुढे ते म्हणाले, "लोकांना सन्मार्ग सहसा आपणहून कळत नाही. ज्यांच्याकडे ही क्षमता आहे, त्यांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी असा समाज घडवावा. हे प्रत्येक देशाने केलं तर सारे विश्व चांगले होईल. यासाठी आपल्या घरापासून प्रत्येकाने सुरुवात करायला हवी. शिक्षणातून सामाजिक बांधिलकीची ओळख होणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे."
 
परिवर्तन म्हणजे नेमकं काय यावर बोलताना ते म्हणाले, "परिवर्तन म्हणजे विचारांचे परिवर्तन. हे परिवर्तन समाजाच्या मनाशी, बुद्धीशी आणि कृतीशी संबंधित आहे. समाजाच्या बुद्धीचे योग्य परिवर्तन करणे, विचारांतून येणारा निष्कर्ष प्रत्येकाच्या मनात उतरवणे आणि तशी कृती प्रत्येकापासून सुरू होणे हे काम प्रत्येक संस्थांचे आहे. मनुष्य जीवनाची दिशा दाखवणे हा परिवर्तनाचा मूळ उद्देश आहे."
 
 
संस्थांव्यतिरिक्त सामान्य व्यक्तीदेखील समाज परिवर्तनात आपले योगदान कसे देऊ शकतो यावर बोलताना सरसंघचालक म्हणाले की, "आपल्या परिसरात किंवा सोसायटीत निरनिराळे कार्यक्रम आयोजित करून आपण एकत्र येऊ शकतो. त्यामध्ये प्रत्येक जण एकमेकांशी आपले पूर्वज, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या परंपरा या संदर्भात संवाद करू शकतो. एकत्र येऊन गप्पांमधून मतमतांतरे झाल्यास वैचारिक परिवर्तनाला सुरुवात होऊ शकते. आपल्या पूर्वजांबद्दल जे गैरसमज समाज माध्यमांवरून निर्माण झालेत ते अशा चर्चांमधून आपण दूर करू शकतो."
 
संस्थेचे कौतुक करत सरसंघचालक म्हणाले, "रा.स्व.संघ आणि लोकमान्य सेवा संघ या दोन्ही संघांची स्थिती बऱ्याच बाबतीत समान आहे. लोकमान्य टिळकांची प्रेरणा संघ निर्माते डॉ. हेडगेवार यांच्या जीवनाच्या मुळाशी होती. तीच या संस्थेच्याही मुळाशी आहे."

कार्यक्रमादरम्यान मंचावर लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, कार्याध्यक्ष उदय तारदाळकर उपस्थित होते. मुकुंद चितळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तर शेवट वंदे मातरम ने झाला.
 
कुटुंब प्रबोधनाचे महत्त्व मांडताना सरसंघचालक म्हणाले की, "आजच्या देशाची परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी कुटुंब लहान झालेली दिसतात. आजच्या पिढीला अनेक लोकांच्या कुटुंबात सवय नसल्याने इगो मॅनेजमेंटची सवय राहिलेली नाही. सुशिक्षित कुटुंबामध्ये जी विस्कळीतता दिसते ती अशिक्षित कुटुंबांमध्ये सहसा दिसत नाही, ही आजची वास्तविकता ही आहे. त्यामुळे कुटुंब प्रबोधन होणे गरजेचे आहे."
 
सरसंघचालकांचे मार्गदर्शन ही संस्थेची पुण्याईच
११ मार्च १९२३ रोजी संस्थेची स्थापना झाली. गेली १०० वर्ष वेगवेगळ्या शाखांद्वारे समाजाभिमुख काम संस्था करत आहे. एकूण २२ शाखा सध्या कार्यरत आहेत. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले ही संस्थेची पुण्याईच असे लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी म्हटलं आहे.