सह्याद्रीमधून पालीच्या ४ नव्या प्रजातींचा शोध; सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापुरात आढळ

    26-Mar-2024
Total Views |
gecko in shayadri



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन' आणि 'शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर' मधील संशोधकांना यश मिळाले आहे (geckos in sahyadri). यासोबतच पालीच्या 'निमास्पिस गिरी' गटातील इतर नऊ प्रजातींचे नव्याने वर्णन करुन जुन्या संशोधन निबंधांमधील विसंगती दूर करण्यात आल्या आहेत.(geckos in sahyadri)
निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरुन त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केलेला आहे. हे संशोधन अक्षय खांडेकर यांच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधून सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे आणि प्रा. डॉ. सुनिल गायकवाड त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यासोबत या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, सत्पाल गंगलमाले आणि डाॅ. ईशान अग्रवाल यांचा सहभाग आहे.
नव्याने शोधण्यात आलेली 'निमास्पिस बर्कीएन्सिस' या प्रजातीचा शोध कोल्हापूरमधील बर्की (शाहूवाडी), वाशी (पन्हाळा) आणि तळये बुद्रुक (गगनबावडा) या ठिकाणांवरुन लागला आहे. बर्की राखीव वनक्षेत्रामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण 'निमास्पिस बर्कीएन्सिस' असे करण्यात आले आहे. 'निमास्पिस चांदोलीएन्सिस' ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील चांदेल वनपरिक्षेत्रामध्ये आढळून आली. चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण 'निमास्पिस चांदोलीएन्सिस' असे करण्यात आले आहे. निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील रुंदीव रेंजमधे आढळून आली. महाराष्ट्रामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण 'निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस' असे केले आहे. तसेच निमास्पिस सह्याद्रीएन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वेत्ती रेंजमधे आढळून आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधे स्थित आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण केले आहे.

निमास्पिस कुळातील पाली त्यांच्या प्रदेशनिष्ठतेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे आढळक्षेत्र छोट्या भूप्रदेशावरती विस्तारलेले असते. थंडाव्याच्या जागांशिवाय त्या तग धरु शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे आढळक्षेत्र मर्यादित अनुकूल जागांपुरतेच सीमित असते. सदरच्या संशोधन मोहिमांमध्ये नव्याने शोधलेल्या पाली त्यांचे आढळक्षेत्र सोडून इतरत्र कुठेही आढळलेल्या नाहीत. शिवाय चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून शोधलेल्या तीन प्रजाती एकमेकांपासून फक्त ८ ते १२ किमी. अंतरावरुन शोधलेल्या आहेत. गर्द झाडीच्या जंगलांच्या मधे पसरलेल्या उघड्या माळसदृश्य सड्यांनी या प्रजातींचा वावर सीमीत केला असावा, असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे. इतकी टोकाची प्रदेशनिष्ठता असणे हे 'निमास्पिस' कुळातील पालींचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच या पालींचे आढळक्षेत्र असणारी जंगले संवर्धनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरत आहेत. या संशोधनामधे महाराष्ट्र वन विभागाने आवश्यक ते परवाने देऊन सहकार्य केले. तसेच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील (चांदोली राष्ट्रीय उद्यान) वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सव्हेक्षणादरम्यान संशोधकांना मोलाची मदत केली.
"मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलच्या रांगांची संख्या, शेपटीच्या खालच्या बाजूला असणार्‍या खवल्यांच्या रचना आणि विशिष्ट जनुकीय संचांवरुन या पाली एकमेकांपासून आणि कूळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या आहेत हे स्पष्ट करण्यात यश आलेले आहे. या चारही पाली दिनचर आहेत. झाडांचे बुंधे आणि दगडांच्या आडोश्याने त्या वावरतात. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे या पाली अन्नसाखळीत समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात." - प्रा. डॉ. सुनिल गायकवाड


"यापूर्वी झालेल्या संशोधनांमधून निमास्पिस गिरी गटात महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून एकूण दहा प्रजाती नोंदवलेल्या होत्या. यापैकी बहुतांश प्रजातींच्या वर्गीकरणामधील विसंगती आणि चुकांमुळे निमास्पिस गिरी गटातील पालींवर नव्याने अभ्यास करणे आव्हानात्मक बनले होते. वेगवेगळ्या प्रजातींमधील बाह्य वैशिष्ट्ये नोंदवण्यासाठी यापूर्वींच्या संशोधकांनी निवडलेल्या अनेक पद्धतींमधे सुसुत्रता नसल्याचे नव्याने आढळून आले. जनुकीय संचामधील वेगळेपणाच्या पुष्ठीनंतर संशोधकांकडून बाह्य वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब ठरत आहे. या विसंगती दूर करण्यासाठी, सदरच्या संशोधनामधे जुने नमुने तपासण्यात आले; तसेच पूर्वीपासून ज्ञात असलेल्या प्रजातींच्या आढळक्षेत्रामधून नमुने नव्याने गोळा करुन त्यांच्यात स्थिर राहणारी बाह्य वैशिष्ट्ये नव्याने मांडण्यात आली." - अक्षय खांडेकर, संशोधक