श्रीलंकेला जाणारे ९५० फूट लांब जहाज धडकल्याने अमेरिकेत पूल कोसळला

    26-Mar-2024
Total Views |
maryland-baltimore-francis-scott-key-bridge


नवी दिल्ली : 
  अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील बाल्टिमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट ब्रिजवर एक जहाज आदळले. यामुळे पूल तुटून नदीत पडला. या अपघातात अनेक जण नदीत बुडाले असून मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचत लोकांना वाचवण्यात आणि नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहेत.

दरम्यान, बाल्टिमोरचा स्टीलचा पूल २.५ किमीचा लांबीचा कोसळला असून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १ वाजून २७ मिनिटांनी (स्थानिक वेळेनुसार) हे मोठे जहाज बाल्टिमोर शहरातील पॅटापस्को नदीवर बांधलेल्या फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला धडकले. हे जहाज मोठ्या प्रमाणात माल घेऊन नदीतूनन जात होते. जहाज आदळल्यानंतर काही वेळातच पूल कोसळल्याचे व्हिडीओतून समोर आले आहे.


हे वाचलंत का? - विरोधी पक्षांना ६२ टक्के देणग्या देणाऱ्या कंपन्यांवर ED-CBI छापे!


सदर घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या पुलाच्या एका खांबाला जहाज आदळल्याचे दिसून येते आणि काही सेकंदातच पुलाचे काही भाग एक एक करून नदीत पडू लागतात. यानंतर संपूर्ण पूल नदीत कोसळला. तसेच, हा पूल कोसळल्याने अनेक वाहने आणि या पुलावर काम करणारे अनेक लोक नदीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. नदी आणि ढिगाऱ्यांमध्ये मदत आणि बचाव पथक ७ जणांचा शोध घेत आहेत. या नदीत त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

अंदाजे ९५० फूट लांबीच्या जहाजाचे नाव दाली असे असून सदर जहाज सामान कोलंबो, श्रीलंकेला येथे जाणार होता. हे जहाज Maersk नावाची कंपनी चालवते. ही जगातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपन्यांपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावर २२ लोक होते. या अपघातात जहाजावरील कोणत्याही कामगाराला दुखापत झाली नसल्याची खातरजमा कंपनीने केली आहे.