होळी रे होळी

    26-Mar-2024
Total Views |
Samatol Foundation

‘समतोल फाऊंडेशन’ गेली अनेक वर्षे समाजाच्या विविध प्रश्नांसाठी काम करते. त्यातही घरून पलायन करून रेल्वे स्टेशनवर राहणार्‍या मुलांचे पुनर्वसन हे मुख्य काम. ‘समतोल’ या मुलांना आधार देते, संस्कार देते आणि जीवनात यशस्वी होण्याची दिशाही देते. होळी उत्सवाच्या निमित्ताने ‘समतोल फाऊंडेशन’चे हे विचारकार्य मांडणारा हा लेख...

भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे महत्त्व खूप वेगळेच आहे, खूप छानसुद्धा आहे. परंतु, जनजागृती नसल्याने त्याचे महत्त्व राहिले नाही, असे वाटते. शिवाय नवीन पिढीला हे समजलेच नाही. त्यामुळे ते वेगळ्याच अर्थाने या सणांकडे बघतात.टीव्ही, मोबाईल यामुळे तर अजूनच मोठी वाढ त्यामध्ये झाली आहे. वेगवेगळ्या नशा, दारू पिऊन, डिजे वगैरे लावून वेगळ्याच प्रकारचा नाच होताना दिसत असतो. परंतु, हे सर्व आपल्या सणांचा भाग नाही हे आता सांगण्याची गरज आहे. माझ्या आयुष्याची तर होळी झाली, आता काय रंग भरणार, अशी ओरड करणारे खूप भेटतील. आमच्याकडे तर मुलांच्या समस्या घेऊन येणारे नेहमीच असे शब्द वापरतात.समाजातील काही कुटुंबांमध्ये वादविवाद छोट्या छोट्या गोष्टींवरून होत आहेत त्याचे परिणाम मुलांना भोगावे लागतात, हे मात्र कुटुंब विसरत असतात म्हणूनच संसाराची, आयुष्याची होळी झाली, असे दोष देत सणांचेही महत्त्व कमी करून टाकतात.
 
फाल्गुन महिन्यात होळी येते म्हणजे वर्षाच्या शेवटी हा सण आहे. त्यानंतर चैत्र, वसंत ऋतू येतो. हळूहळू झाडाला नवीन पालवी फुटायला सुरुवात होईल. नवचैतन्य निर्माण होईल, किती छान रचना निसर्गाने केली आहे.‘समतोल फाऊंडेशन’ स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात अशीच समस्याग्रस्त मुलांना घेऊन काम करताना मुलांना लागणार्‍या वाईट सवयी, नशा, वाईट विचार याचे दहन केले जाते. आतापर्यंत ४२ हजार मुलांचे वाईट विचार बाजूला करून नवचैतन्य निर्माण केले आहे. आमच्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा विषय आहे. समाजासाठी ही जनजागृती झाली पाहिजे तरच सणांचे महत्त्व समजते.‘समतोल’ने या होळीला जनजागृती केली की, सण उत्साहात साजरे करा, पारंपरिकरित्या साजरे करा, ज्यातून कुटुंब आणि समाजाला आनंद मिळेल. पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल. त्यासाठी ‘समतोल’ने काही घोषणासुद्धा बनवल्या. जसे-

मुले झाली गोळा,
सण आला होळीचा
जंगलच राहिली नाही आता
छंद सोडा लाकडे जाळायचा

केमिकलचे कलर आता करील नुकसान
जंगल, जल, जमीन वाचवण्यासाठी
राखू सर्वांचे भान

करून आग होतो शिमगा
पुरणपोळी सर्वांना मागवा
करू समतोल आयुष्याचा
निसर्गाच्या पर्यावरणाचा


तर आम्ही मुलांना होळीचे धार्मिक महत्त्वही सांगतो. घरातून पलायन केलेल्या मुलांना संस्कार आणि संस्कृतीची ओळख होणे गरजेचे आहे. हे बालक उद्याचे आपले नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वास्तवाबद्दल माहिती असायलाच हवी, असे ‘समतोल’चे मत आहे. त्यानुसार आम्ही आमच्या येथे असलेल्या बालकांना होळीचे महत्त्व सांगतो की, होळी सण इतका पवित्र आहे की, ज्या गोष्टी मनाला त्रासदायक आहे, त्याचे दहन म्हणजे होळी होय. एकदा का वाईट विचार, दुष्ट प्रवृत्ती, अहंकार, राग, लोभ, भेदभाव याचे दहन झाले की, जीवनामध्ये नवीन रंग आपोआपच भरला जातो आणि मनापासून नवीन विचारांच्या रंगाची उधळण होते. शिवाची म्हणजे भगवान शंकराची लीला असणार्‍यापैकी हा एक भाग आहे. त्यामुळे ‘शिवाचा शिमगा’, असेही होळीला म्हणतात.

महाराष्ट्रातील पुरणपोळी हा सन्मान- सत्काराचा विषय आहे. पोटातील भूक रूपी आग शांत करणारा हा पदार्थ अन्नपुर्णामधील प्रसाद असतो. जो होळीच्या दिवशी प्रत्येक कुटुंबात बनतोच. ‘समतोल फाऊंडेशन’ स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात अशीच एक महिला आपल्या संसाराची आयुष्याची होळी झाली, असे सांगून काही काम मिळेल का विचारले. आम्ही प्रयत्न करीत मार्गदर्शन केले आणि जीवन बदलून गेले नेहमीप्रमाणे नवरा दारू पिऊन मारतो, सामान विकतो, मान-सन्मान तर लांबच रोज भांडण होते. मुलेसुद्धा कंटाळून गेली. संस्कार तर राहिलेच नाही. गेली अनेक वर्षे सातत्याने असे सुरू आहे. खूप प्रयत्न केले काही फरक पडत नाही म्हणून घराबाहेर पडले. शंकराची भक्त असल्याने शिवाची आराधना करत नवीन आयुष्याची सुरुवात केली. आज एका निराधार निराश्रित बालकांची आई, बहीण, मावशी बनून सांभाळ करत आहे. जीवनात नवीन रंग आपोआपच भरले आहे त्यामुळे होळी माझ्यासाठी मोठा सण आहे, अशी भावना त्यांनी केली आहे. कारण, मागील घडलेल्या सर्व गोष्टींचे त्यांनी होळी केली होती, दहन केले होते, हे होळीचे महत्त्व आहे.

पौराणिक कथांमध्ये होलिका हिरण्यकश्यपूची बहीण होती. तिने तपश्चर्या करून आगीवर नियंत्रण मिळवले होते. पण, जेव्हा प्रल्हादाला अग्नीत भस्म करण्यासाठी तिने प्रयत्न केला, तेव्हा तिलाच भस्म व्हावेलागले. कारण, तिला तसे वरदान होते. वाईट विचार मनात ठेवून आगीवर नियंत्रण मिळवता येणार नाही. आपणसुद्धा अनेक वाईट विचार मनात ठेवून वागायचे बघतो. त्यामध्ये यशस्वी होता येणार नाही म्हणून या सणाच्या निमित्ताने सर्व वाईट विचार दहन करून पुन्हा नव्याने विचार करून छान जगायचे, असा अर्थ होळी आणि रंगपंचमी आपल्याला देत असते. चांगले विचार ग्रहण करा, चांगले वर्तन ठेवा, आपोआप जीवनात प्रगती होते, हा विचार जीवनात कार्यान्वित करण्याचा निर्धार होळीच्या निमित्ताने बालकांनी केला. खर्‍या अर्थाने त्यांच्या आयुष्यातली नकारात्मकता जळून गेली आणि प्रगतीच्या सकारात्मकतेचे तेज त्यांच्यात आले.



विजय जाधव