वणव्यांचे वाढते प्रमाण आणि उपाययोजना

    26-Mar-2024   
Total Views |
wildfires and measures

‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’ने (एफएसआय) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात एकूण 3 हजार, 929 वणवे लागल्याची नोंद करण्यात आली. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात निसर्गहानी आणि वित्तहानी करणार्‍या या वणव्यांमागची कारणे, हवामान बदलाचा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...

मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात ज्या ठिकाणी सहसा वणवे पेट घेत नाहीत, त्या तामिळनाडूमधील निलगिरीच्या ककनूर प्रदेशात आठवडाभर वणव्याने सगळेच भस्मसात केले. तामिळनाडूच्या वन खात्याला एअर फोर्समधील आगीशी खेळणार्‍या जवानांनी, हेलिकॉप्टरला केबलने अडकवलेल्या ‘बाम्बी बकेट’च्या साहाय्याने वणवा विझविण्याकरिता साथ दिली. चिंतेची बाब म्हणजे, हा वणवा विझविण्यासाठी त्यांना तब्बल 16 हजार लीटर पाण्याचा वापर करावा लागला.
 
‘बाम्बी बकेट’ म्हणजे काय?

हल्ली जगभर वणवे विझविण्याकरिता ‘बाम्बी बकेट’ची यांत्रिक संरचना असलेल्या हेलिकॉप्टरच्या मदतीने वणव्याची आग विझविली जाते. हेलिकॉप्टरच्या खाली एका केबलने ही ‘बाम्बी बकेट’ टांगलेली असते व त्या बकेटला एक व्हॉल्व्ह असतो. ही बकेट नदीतील पाणी वा पाण्याच्या डबक्यातील पाणी बकेटमध्ये भरून घेतात. आगीच्या ठिकाणी हवेमधून ‘बाम्बी बकेट’च्या साहाय्याने आगीजवळ नेऊन तेथे आग विझविण्याकरिता व्हॉल्व्ह उघडून यांत्रिक रचनेमधून पाण्याचा मारा केला जातो. त्यामुळे जंगलात लागलेले वणवे ‘बाम्बी बकेट’नी विझविता येतात. यात जवानांना आगीजवळ न गेल्याने आगीपासून सुक्षितता मिळून, वणवे नियंत्रणात आणता येतात.

वणव्यांचे देशातील चित्र

नोव्हेंबर ते जून हा काळ वणव्यांचा हंगामी काळ म्हणून ओळखला जातो. या काळात हजारो छोट्या- मोठ्या आगी दरवर्षी जंगलात भडकतात. ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’च्या (खडठज) उपग्रह डेटामधून वणवे पेट घेतात अशा स्थळांची एक नोंद करण्यात आली आहे. हे जंगलातले वणवे मार्चच्या प्रारंभीपासून पेट घेतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी, गुजरातमधील दक्षिणेकडील किनारपट्टी प्रदेश, गिर, सोमनाथ व पोरबंदर, राजस्थानच्या दक्षिणेतील प्रदेश, मध्य प्रदेशातील नैऋत्येकडील प्रदेश, किनार्‍याकडील व ओडिशाचा आतील प्रदेश आणि झारखंड यांचा वणव्यांच्या प्रदेशात समावेश होतो. याशिवाय कधीकधी अकस्मात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या जंगलांमध्येही वणवे पेटतात. पण, हे वणवे नेहमी या भागात लागत नाहीत. ‘फायर सर्व्हे ऑफ इंडिया’नुसार, पानगळतीनंतर शुष्क जंगलांमध्ये लागलेल्या आगी या अधिक प्रखर असतात, तर सदाहरित, अर्धहरित वा समशितोष्ण कटिबंधातील जंगलात लागणारे वणवे हे कमी प्रखर असतात.


ईशान्येकडील प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ व उत्तराखंड या ठिकाणातील जंगली वणवे हे नोव्हेंबर ते जून या काळात साधारणपणे पेट घेतात. गेल्या वर्षी मार्चमध्ये गोव्यातील जंगलामध्ये असेच वणवे पेटले होते. चौकशीअंती ते वणवे मानवनिर्मित असल्याचे निष्पन्न झाले. 2021 मध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, नागालॅण्ड-मणिपूर सीमा, ओडिशा, मध्य प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी एकामागोमाग एक अशा वणव्यांनी पेट घेऊन मोठ्या प्रमाणात वनसंपेदेचे नुकसान झाले. सर्वसाधारणपणे जगामधील तीन टक्के म्हणजे 98 दशलक्ष हेक्टर क्षेत्रातील जंगल क्षेत्रात वणवे पेटतात व ती क्षेत्रे उष्ण कटिबंधातील असतात. ‘फायर सर्व्हे ऑफ इंडिया’च्या 2019 मधील अहवालाप्रमाणे, (खडऋठ ीशिेीीं) भारतातील 36 टक्क्यांहून जास्त जंगलक्षेत्र हे वणव्यांच्या निर्मितीला अनुकूल झालेले दिसते. चार टक्के क्षेत्र हे नेहमी वणवे पेटणारे आहे, तर सहा टक्के क्षेत्र हे कायमच्या वणव्यांचे क्षेत्र ठरले आहे.

जंगल-वणव्यांचे प्रमाण (कंसातील आकडे वणव्यांचे)


‘फायर सर्व्हे’प्रमाणे मार्चमध्ये लागलेल्या वणव्यांची संख्या पुढीलप्रमाणे- मिझोराम (3738), मणिपूर (1702), आसाम (1602), मेघालय (1252), महाराष्ट्र (1215). यावर्षी बरेचसे वणवे मानवनिर्मित होते. ते मानवांच्या निष्काळजीपणातून, विडीकाडी फेकल्यामुळे, कॅम्प फायरमुळे वा कचरा जाळल्यामुळे, जंगलात राहणार्‍या आदिवासी जमातींच्या खट्याळपणामुळे लागले होते, तर काही वणवे विजा पडल्यामुळे वा झाडांच्या घर्षणातून लागले होते. एकदा जंगलात वणवे लागले की, दाटीवाटीच्या वृक्षराजीमुळे आणि जोराच्या वार्‍यामुळे ते लगेच आसपास पसरतात.

वणव्याबाबत उपग्रहांनी दिलेला डेटा काय सांगतो?

 
जागतिक पातळीवर हल्लीच्या घडीला 20 वर्षांच्या तुलनेत दुप्पट वृक्ष वणव्यामध्ये जळून नष्ट होत आहेत. त्याचा अनेक देशांच्या मानवी जीवनावर व अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळाला. या वणव्यांचा सर्वाधिक परिणाम रशिया, कॅनडा, अमेरिका, फिनलंड, नॉर्वे, चीन, जपान यांच्या जंगलांवर झाला. जैवविविधतेचा खजिना असणारी ‘अ‍ॅमेझॉन’सारखी उष्णकटिबंधातील जंगले, आग्नेय आशियातील जंगले व भारतातील जंगलांनाही वणव्यांच्या वाढीचा धोका आहे.

जगातील सर्वांत मोठे वणवे

‘पृथ्वीचे फुफ्फुस’ अशी ख्याती असलेल्या द. अमेरिका खंडातील अ‍ॅमेझॉनच्या सदाहरित जंगलात 2019च्या ऑगस्टमध्ये महाभयंकर वणवे पेटले होते. त्यात जंगलामधील लाखो झाडे नष्ट झाली. जगभरातील वनस्पतींपासून निर्माण होणार्‍या एकूण ऑक्सिजनपैकी, 20 टक्के ऑक्सिजन अ‍ॅमेझोनच्या जंगलातूनच निर्माण होतो. तसेच पृथ्वीवरच्या ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यामध्ये या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, या मोठ्या वणव्यात हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मीळ वनस्पती जळून खाक झाल्या. याचे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले. त्या पाठोपाठ पेरु, बोलिव्हिया आणि पेग्वे या देशातही वणव्यांचा धूर पसरला.

वणवे किती प्रकारचे असतात?

वणव्यांचे वर्गीकरण उद्भवानुसार केले जाते. जमिनीच्या आतील, पृष्ठभागावरील आणि वृक्षांच्या सर्वांत वरच्या भागातले वणवे असे ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल. जमिनीच्या आतील वणवे सेंद्रिय गोष्टी जाळणारे, जमिनीवरील वणवे सुकलेली पाने, फांद्या आणि इतर झाडांच्या गोष्टी जाळतात, असे वणवे वेगाने पसरतात. एका झाडाच्या शेंड्यापासून दुसर्‍यापर्यंत पसरणारी आग तिसर्‍या प्रकारात मोडते.

भारतात जंगल वणव्याने किती हानी होते?

साधारपणे वणव्यांचा हंगाम फेब्रुवारीमध्ये सुरू होतो. हे वणवे सुमारे 14 आठवडे टिकतात. देशभरात दि. 29. अ‍ॅागस्ट 2022 ते 28 ऑगस्ट 2023 या काळात 14 हजार, 689 वणव्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. 2002 ते 2022 या 20 वर्षांच्या काळात वणव्यामुळे भारताने 3.93 लाख हेक्टर आर्द्र प्राथमिक जंगल क्षेत्र गमावल्याचे आकडेवारी सांगते.
 
हे वणवे नियंत्रणात आणायला हवेत

मध्य प्रदेशमध्ये प्रचलित व छत्तीसगढमध्येही लागू केलेले वणवा नियंत्रण मॉडेल आता देशभरात लागू करावे लागणार आहे. मध्य प्रदेशच्या मॉडेलमध्ये जंगल कर्मचार्‍यांना मोबाईल अ‍ॅपद्वारे जंगल वणव्यांची माहिती मिळते. छत्तीसगढने या मॉडेलचा मागील वर्षी वापर केल्यावर वणव्यांच्या घटनेमध्ये तुलनेने घट नोंदवण्यात आली. या मॉडेलमध्ये उपग्रहाकडून मिळालेल्या प्रतिमांचे विश्लेषण केले जाते व सर्वाधिक आग कुठे व केव्हा लागली आहे, ते तपासले जाते. या निष्कर्षांच्या आधारे 2016 मध्ये बनविलेले ‘फॉरेस्ट फायर काँपेंडियम’ अधिक प्रभावी बनविले गेले. कर्मचार्‍यांना व लोकांना वणव्यांची माहिती त्वरित पोहोचण्यासाठी विशिष्ट फायर प्रणाली विकसित करण्यात आली. यामध्ये उपग्रहावरुन प्राप्त प्रतीमा अ‍ॅपवर उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात आगीचे ठिकाण व व्याप्ती यांची अचूक माहिती मिळते.

जगभरातील काही मोठे जंगल-वणवे

उत्तर अमेरिकेतील हवाई बेट : गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये माऊयू बेटावर महाभयंकर वणवे पेटले व कमीतकमी 55 लोक मृत्यू पावली. जोरदार वार्‍यामुळे, शुष्क वातावरणामुळे मोठ्या आगी लागल्या व हे वणवे पसरले. बरेचजण नकळतपणे या संकटात सापडले व लाहैना शहर 80 टक्के बेचिराख झाले. यामुळे शहरातून लोक दूर समुद्राच्या दिशेने पळू लागले. या लाहैना शहरातील कमीतकमी 270 इमारती पडल्या व अनेक जणांना बेघर व्हावे लागले. सैन्याच्या अनेक हेलिकॉप्टर्सनी अग्निशामक जवानांना वणवे विझविण्यासाठी मदत दिली. त्यांना सुमारे 575 हजार लीटर पाणी वणवे विझविण्याकरिता लागले.दक्षिण युरोपमधील ग्रीसमध्येही प्रखर उष्णतेमुळे जंगल वणवे पेट घेतात. अग्निशामक जवानांना चार दिवस आग विझविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. अथेन्समधील रुग्णालयांमधील आजारी रुग्णांना दुसर्‍या जागी हलवावे लागले. पोर्तुगॉल, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी व फ्रान्समध्ये देखील या वणव्यांमुळे मोठी आपत्ती घोषित केली होती. 200 अग्निशामक जवान आग विझविण्याचे काम करत होते. या वणव्यामुळे उष्ण्तेचा पारा 45 अंश सेल्सिअसला पोहोचला होता. येलोनाईक, कॅनडा : या शहरातील 20 हजार नागरिकांचे वास्तव्य असलेल्या वस्तीजवळ गेल्या ऑगस्टमध्ये वणवे पेटले होते व शहरापासून हे वणवे 16 किमी अंतरावर होते. या ठिकाणी गेल्या वर्षात 21 हजार चौ. किमी क्षेत्रात 288 जंगल वणव्यांनी पेट घेतला होता. त्यामुळे शहरातील वस्तीचे स्थलांतर सरकारी संस्थांना करावे लागले. यामुळेच वणव्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, देशातील हानी कमी करण्याकरिता भारतीय सरकारकडून जंगली वणव्यांवर नियंत्रण आणणे जरूरीचे आहे.
अच्युत राईलकरअच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.