गुलाबशेतीचा ‘हर्ष’गंध...

    26-Mar-2024
Total Views |
Harshada Sonar

वयाच्या ३६व्या वर्षी चांगल्या पगाराची नोकरी सोडून, कुठलाही अनुभव गाठीशी नसताना, केवळ आवडीखातर गुलाबशेतीकडे वळलेल्या यशस्वी उद्योजिका हर्षदा सोनार यांची ही यशोगाथा...

आवड आणि चिकाटीच्या जोरावर हवे त्या क्षेत्रात यश मिळवता येते, याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यातील हर्षदा सोनार. हर्षदा यांचा जन्म १९७८ साली मुंबईत झाला. तीन भावंडांमध्ये हर्षदा सर्वांत धाकट्या. घरात सर्वांत लहान असल्याने त्यांना हव्या त्या गोष्टी करता आल्या. १९९८ साली हर्षदा यांनी संगणकीय शाखेतून पदवी प्राप्त केली. पुढे २००० साली लग्नानंतर त्या पुण्यात आल्या. त्यांचे पती प्रशांत सणसवाडी येथे एका ‘स्टील’ उद्योगातील कंपनीत नोकरी करतात. घराला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने त्यांनी एका कंपनीत मनुष्यबळ प्रशासन विभागात नोकरीस रुजू झाल्या.हर्षदा यांची नोकरीही चांगल्या पगाराची होती. सर्व सुव्यवस्थित सुरू असताना, स्वतःचीएक वेगळी ओळख निर्माण करायची इच्छा त्यांच्या मनात फार पूर्वीपासून होती. नोकरीवरून ये-जा करताना रस्त्याच्या कडेला दिसणारी फुले, बुके विक्री केंद्रे त्यांच्या दृष्टीस पडायची. अनेकवेळा केवळ आवड म्हणून त्या फुले, बुके खरेदी करत. त्यात असलेल्या सर्व फुलांपैकी गुलाब या फुलाविषयी त्यांना विशेष कुतूहल. कधीतरी आपणही गुलाबाच्या शेतीत उतरावे, असे त्यांना सारखे वाटे. अखेर मनाशी पक्की खूणगाठ बांधून नोकरीवर पाणी सोडत, पूर्णवेळ गुलाब शेतीचे आव्हान पेलण्याचे हर्षदा यांनी ठरवले.

हर्षदा यांच्या सासरी व माहेरी शेतीची कुठलीही पार्श्वभूमी नाही की अनुभव नव्हता. तरी जिद्द व धडाडीच्या जोरावर हर्षदा यांनी तळेगाव येथील ‘पॉलिहाऊस’ प्रशिक्षण संस्था गाठली. तेथे माहिती घेऊन आठ दिवसांचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला. पतीच्या कंपनीत काही जण ‘पॉलिहाऊस’मध्ये गुलाब शेती करायचे. त्यांच्याकडूनही शास्त्रोक्त मार्गदर्शन घेतले. इंटरनेट, युट्यूब यासारख्या माध्यमातून बरीच माहिती जमवली. एवढ्या ज्ञानाच्या तसेच आत्मविश्वासाच्या भांडवलावर २०१६ मध्ये पुण्यापासून काही किलोमीटर असलेल्या शिक्रापूर येथे २० गुंठे एकर क्षेत्रावरील पॉलिहाऊस भाडेतत्त्वावर घेतले. पॉलिहाऊसमधील सुरुवातीची काही वर्षे हर्षदा यांच्यासाठी अत्यंत खडतर गेली. पहाटे ५ वाजता उठायचे, घरची आवराआवर, स्वयंपाक करायचा. मग पुण्याहून शिक्रापूरसाठी बसमार्गे साडेचार तास प्रवास करत पाबळ फाटा गाठायचा. तेथे ठेवलेल्या दुचाकीवरून साडेसात किलोमीटर अंतर कापून शेताच्या ठिकाणी यायचे. लागलीच शेतातील कामे सुरू करून दिवसभर शेतात राबून पुन्हा याच मार्गाने संध्याकाळी घरी परतायचे.

दरम्यान, कोणत्याही संकटाची पर्वा न करता हर्षदा यांचा पावणेचार वर्ष हा नित्यक्रम सुरूच होता. या काळात मशागतीपासून ते रोपे लावणे, फवारणी, खते देणे, फुलांची काढणी, काढणी पश्चात विक्री नियोजन, माल गुलटेकडी येथे स्थानिक वाहनातून पाठवणे, अशी सर्व कामे हर्षदा शिकल्या. आज त्यांना गुलाबशेतीतील सात ते आठ वर्षांचा अनुभव. शिक्रापूर येथील ही शेती कोरोना संकटामुळे त्यांना पूर्णपणे थांबवावी लागली. कोरोनानंतर खेड-शिवापूर येथे एक एकर क्षेत्रावरील पॉलिहाऊसमध्ये ही गुलाब शेती सुरू आहे. सर्व आव्हानांवर यशस्वी मात करत हर्षदा या शेतीत चांगल्या स्थिरावल्या आहेत.एक एकरात डच गुलाब जातीच्या सुमारे २७ हजार रोपांचे व्यवस्थापन त्या करतात. त्यासाठी वेळोवेळी सल्लागाराची मदतही घेतली जाते. खते, कीटकनाशके यांचा वापर होतो. खरे तर अधिकाधिक सेंद्रिय निविष्ठांचा वापर करूनच गुलाब उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो. मात्र, रासायनिक कीटकनाशकांचा वापर अनिवार्य ठरतो, असे हर्षदा म्हणतात.
 
एप्रिल-मे महिना म्हणजे कडक ऊन. अशावेळी तापमान नियंत्रित राहावे, यासाठी पडदे लावून अथवा सकाळी लवकर ‘बेड’वर सिंचन करून गारवा तयार केला जातो. वर्षभरातील काही महिने वा कालावधी उत्पादन थंडावते. मात्र, एकूण सरासरी पाहिल्यास महिन्याला सव्वा लाखांपर्यंत फुलांचे उत्पादन मिळते. तसेच, सध्या हर्षदा यांच्यामार्फत सहा जणांना रोजगारदेखील उपलब्ध झाला आहे.“ ’एज इज जस्ट अ नंबर’ याप्रमाणे वयाच्या ३६व्या वर्षी मी चांगली नोकरी सोडून व्यवसायाकडे वळले. माझ्या आवडीच रुपांतर व्यवसायात केले आहे. बर्‍याचदा बहुतांमध्ये ’मी हे करू शकेल की नाही’ याबाबतचचा आत्मविश्वास कमी पडतो. मी आजवर जे काही केले, ते माझ्यासाठी खूप मोठे धाडस होते. परंतु, मला स्वत:ला आत्मविश्वास होता की, हे मी नक्की करू शकते. याच आत्मविश्वासामुळे मी आजवर तग धरू शकले आहे. क्षेत्र कुठलेही असो, त्यात चढउतार हा ओघाने आलाच. फक्त तुमच्याकडे आपल्याला नक्की काय करायचं आहे, याबाबत स्पष्टता हवी. जे मी करू शकते, ते कोणीही करू शकेल याची मला खात्री आहे. पूर्वी नोकरीत ठरावीक शिफ्टमध्ये काम करण्याचे बंधन मला मान्य नव्हते. आता गुलाबशेतीतून स्वतः मालक झाल्याचे समाधान मिळते,” असे हर्षदा अभिमानाने सांगतात. हर्षदा सोनार यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.


-गौरव परदेशी