धनेश संवर्धनाची नांदी; धनेशमित्र संमेलन-देवरुख | वाचा संमेलनात नेमकं काय घडलं...

    26-Mar-2024
Total Views |
friends of hornbill conference devrukh


धनेश पक्षी म्हणजे जंगलाचे शेतकरी. सह्याद्रीतील घनदाट अरण्यांच्या निर्मितीमध्ये निसर्गातल्या याच शेतकर्‍याने हातभार लावला आहे ( friends of hornbill conference devrukh). या पक्ष्याचा जागर करुन त्याच्या संवर्धनाची दिशा ठरवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख गावात दि. २३ मार्च रोजी पहिले धनेशमित्र संमेलन पार पडले (friends of hornbill conference devrukh). ‘धनेशमित्र निसर्ग मंडळ’ आणि ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते (friends of hornbill conference devrukh). दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ या संमेलनात माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी झाले होते. ‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ आणि ‘गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट’ यांनी अर्थसाहाय्य पुरवले होते, तर ‘सृष्टीज्ञान संस्था’, ‘देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ’, ‘सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण’, ‘एन. व्ही. इको फार्म गोवा’, महाराष्ट्र वन विभाग, ‘निसर्ग सोबती, रत्नागिरी’ यांचे सहकार्य लाभले होते. या संमेलनात कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाचा आराखडा आखण्यात आला. या आराखड्यातील काही मुद्दे आणि बोलक्या प्रतिक्रिया.... (friends of hornbill conference devrukh)


त्रिसूत्रींचा अवलंब करावा!
धनेश पक्ष्याचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम हे मुख्यत्वे अभ्यास, संरक्षण संवर्धन व जनजागृती या तीन विभागांत करायला हवे. आपल्या विभागातील धनेशाची प्रत्यक्ष घरटी, खाद्य इत्यादी सर्वांकष अभ्यास व त्याचे दीर्घकालीन निरक्षण, कृत्रिम घरटी बसवणे, घरटी असलेली झाडे तोडली जाऊ नयेत म्हणून मालकाला वार्षिक मानधन देऊन घरटे संरक्षित करणे, धनेशमित्रांचे जाळे तयार करणे अशा काही उपयायोजना राबवणे गरजेच्या आहेत. ’धनेशमित्र संमेलना’मुळे धनेशमित्र एकत्र आले आणि त्यांच्या संघटनाला चालना मिळाली, विविध ठिकाणी काय काम चालू आहे, ते सर्वांना समजले. एकत्रित काम चालू व्हावे, यासाठी चालना मिळाली. चर्चेतून नव्या उपाययोजना पुढे आल्या. नवीन धनेशमित्र तयार होण्यास प्रोत्साहन मिळाले.
- भाऊ काटदरे, ज्येष्ठ वन्यजीव संशोधक

आयोजनाचे समाधान
गेली 22 वर्षे ‘सृष्टीज्ञान संस्था’ समाजात पर्यावरण शिक्षणाचे कृतिशील उपक्रम राबवित आहे. यांतील वन्यजीवांपैकी एक म्हणजे धनेश पक्षी अर्थात ’हॉर्नबिल’ हा निसर्गातील एक अत्यंत महत्त्वाचा वन्यजीव आहे. ’धनेशमित्र संमेलना’च्या यशस्वी आयोजनात ’सृष्टीज्ञान संस्था’ सहभागी होती, याचे समाधान आहे. धनेश पक्षी आणि त्यांचा जंगल अधिवास राखण्यासाठी यापुढील कार्यात ‘सृष्टीज्ञान संस्था’ नेहमीच सक्रिय राहील.
- प्रशांत शिंदे, कार्यकारी संचालक, सृष्टीज्ञान संस्थाअपेक्षा समजल्या
वन विभाग, रत्नागिरी म्हणून आम्ही या संमेलनात सहभागी झालो होतो. रत्नागिरी वनपरिक्षेत्रामधील वनरक्षक या संमेलनाला उपस्थित होते. केवळ उपस्थित न राहता, त्यांनी चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवला. खुल्या स्वरुपातील चर्चासत्रामध्ये त्यांनी धनेशाविषयी आपल्या नोंदी मांडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी जागेमध्ये धनेशाच्या अधिवासाचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे, याची माहिती मिळाली. याखेरीच संशोधक, संवर्धक आणि धनेशमित्रांना धनेश संवर्धनासंदर्भात वन विभागाकडून असलेल्या अपेक्षांची माहिती मिळाली. वन कर्मचार्‍यांना यामधून बर्‍याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या.
- प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र अधिकारी, रत्नागिरीनवख्यांना मिळाली दिशा...
गावागावांतून धनेशमित्र तयार झाले, तर ते पुढच्या पिढीला तयार करू शकतील. आमच्यासारखे हौशी वन्यजीव छायाचित्रकार धनेशांचे छायाचित्रण करून, महत्त्वाच्या नोंदी ठेवण्याचे काम करू शकतात. मात्र, असे छायाचित्रण करत असताना, नैतिकतेच्या सर्व मर्यादांचे पालन कसे करावे, याविषयीचे मार्गदर्शन संमेलनातून मिळाले. संमेलनात धनेश पक्ष्यांना असणारे धोके आणि त्यावरील उपाययोजना यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यातून पुढे करावयाच्या उपाययोजनांची एक निश्चित दिशा ठरवली गेली. नवीन कार्यकर्ते कशाप्रकारे मदत करू शकतात, याविषयी त्यांना मार्गदर्शन केले गेले. पुढच्या संमेलनाच्या आधी आढावा बैठक घेऊन, धनेश संवर्धनाच्या दिशेने ठोस पावले उचलावीत, असे ठरवण्यात आले.
- नेत्रा पालकर-आपटे, वन्यजीव छायाचित्रकार, रत्नागिरीकार्यशाळांचे आयोजन
वड, पिंपळ, उंबर असे देववृक्ष जतनाची परंपरा असणार्‍या देवरूखमध्ये धनेश पक्ष्यांची संख्या स्थिर आहे. या ठिकाणी आम्ही धनेशाच्या घरट्यांवर ’सीसीटीव्ही’ कॅमेरा लावून, त्यांच्या हालचालींच्या नोंदी घेत आहोत. संमेलनामध्ये सिंधुदुर्ग आणि रायगड येथील धनेशमित्र मंडळींना काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. त्यांच्यासाठी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आम्ही कार्यशाळा राबवणार आहोत.
- प्रतीक मोरे, कार्यकारी संचालक, सह्याद्री संकल्प सोसायटी


वृक्षारोपणाची गरज
चांदोलीत ऊस शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. याशिवाय ‘भेरले माड’ या धनेशाच्या खाद्यफळांच्या झाडामधून माडीसारखे पेय तयार केले जाते. या वृक्षांच्या लागवडीबाबतही या भागात उत्साह दिसून येत नाही. ज्या झाडांवर धनेशाची घरटी आहेत, ती झाडे दत्तक घेणे आवश्यक आहे. ’धनेशमित्र संमेलना’त केवळ चर्चा न करिता, स्थानिक समस्या ओळखून, धनेश संवर्धनाचे काम कशा पद्धतीने करावे, याचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले.
- प्रणव महाजन, वन्यजीव निरीक्षक, चांदोली


देवरायांमधील अधिवास...
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भागामधील धनेश पक्ष्यांचे 70 टक्के अस्तित्व हे देवरायांमध्ये आहे. या देवरायांमधील जेवणावळी, पार्ट्या आणि त्यावेळी मोठमोठ्याने लावण्यात येणारी गाणी यांमुळे धनेशाचा अधिवास संकटात सापडलेला आहे. अशा स्वरुपामुळे काही देवरायांमधून धनेश पक्षी आपली घरटी सोडून निघून गेले आहेत. ते पुन्हा परतले नाहीत. हे मुद्दे ’धनेशमित्र संमेलना’त आम्ही मांडले आणि पहिल्यांदाच हे मुद्दे मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. या समस्यांचे निराकरण कशा पद्धतीने करावे, याविषयी संमेलनातून मार्गदर्शन मिळाले.
- अनिकेत पाटोळे, वन्यजीव निरीक्षक, राधानगरी
धोके आणि उपाययोजना
अधिवासांचा नाश
बागायती
जंगलतोड
दरड कोसळणे
खाणकाम
रस्ते रुंदीकरण
वणवा
विदेशी वनस्पतींचे रोपण
चोरटी शिकार
पर्यावरण शिक्षणाचा अभाव
खासगी मालकीची जंगले
देवरायांमधील देवळांची पुनर्बांधणी


उपाययोजनांची गरज
धनेश पक्ष्यांचे खाद्यफळ आणि अधिवास असलेल्या वृक्षांचे संवर्धन
घरटी असणार्‍या वृक्षांना कायदेशीर संरक्षण देणे
वणवा रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवणे
रस्ते बांधकामांचे योग्य नियोजन करणे
धनेशाच्या खाद्य फळ असलेल्या वृक्षांची लागवड करणे
धनेशाच्या विष्ठेमधील बियांचे संकलन करून, त्यापासून रोपे तयार करणे
शाश्वत पर्यटन
स्थानिकांमध्ये धनेशाविषयी जनजागृती करणे
कृत्रिम घरटी बसवणे
विष्ठा गोळा करून रोपवाटिका तयार करणेघरट्यांचे निरीक्षण महत्त्वाचे
कोकणात धनेश पक्षी आणि त्यांच्या अधिवासाला अनेक प्रकारचे धोके आहेत. यापैकी अधिवासांचा नाश ही एक प्रमुख समस्या दिसते. अधिवासाच्या नाशामुळे धनेशाच्या घरट्यांवर कशा प्रकारे प्रभाव पडतो आहे आणि त्यांची संख्या कमी होत आहे का, हे तपासण्यासाठी घरट्यांचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे. त्यासाठी घरट्यांच्या स्थानांची नोंद करणे गरजेचे आहे. हवामान बदलामुळे घरट्यांवर होणारा प्रभाव तपासण्यासाठी वर्षांनुवर्षांच्या नोंदी आणि मोठ्या संख्येने धनेशाच्या घरट्यांचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे. हे निरीक्षण वेगवेगळ्या धनेशाच्या प्रजातींचे करणे गरजेचे आहे. सध्या ’नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’कडून आम्ही सिंधुदुर्गातील धनेशाच्या अधिवासाचे संवर्धन करत आहोत. या संवर्धनाच्या कामात येणारा सर्वात अडथळा म्हणजे स्थानिक झाडांच्या रोपांची उपलब्धता. स्थानिक झाडांची रोपे सहसा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने स्थानिक झाडांची रोपे तयार करणार्‍या रोपवाटिकांना प्रोत्साहन देणे, हे धनेशाच्या अधिवास संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. धनेशाच्या खाद्यझाडांच्या बिया गोळा करणे आव्हानात्मक आहे. धनेशाच्या प्रजनन प्रक्रियेवेळी हजारो बिया त्याच्या घरट्याखाली पडतात. त्यामुळे योग्यवेळी नैतिकतेने बिया गोळा कराव्यात. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील लोकांनी एकत्रित येऊन, ’सिटीझन सायन्स प्रोग्राम’अंतर्गत एकत्रित काम करुन, आपण या नोंदी घेऊ शकतो.
- डॉ. रोहित नानिवडेकर, वन्यजीव संशोधक, नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशनचोरटी शिकार सुरूच!
चिपळूणमधील काही भागांत पपई लागवड मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी केली जाते. पपई खाण्यासाठी धनेश त्या ठिकाणी जमतात. अशावेळी नुकसान टाळण्यासाठी आता या बागायतदारांकडून धनेश पक्ष्यांची शिकार होत असल्याचे, आमच्या निदर्शनास आले आहे. नारळाची शहाळी खाण्यासाठी आलेल्या धनेश पक्ष्यांना देखील गावकरी बेचकीने हाकलून लावण्याचा किंवा जखमी करण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्यात काही गावांमध्ये थोड्या प्रमाणात पडवळची लागवड केली जाते. गौरी-गणपतीच्या दरम्यान पडवळीची ही भाजी बाजारात विक्रीसाठी आणली जाते. पडवळ हे धनेशाचे खाद्य असल्याने, तिथेही त्यांना बेचकीने किंवा दगड मारून जखमी केल्याचे प्रकार पाहायला मिळतात. या प्रकारे धनेश पक्ष्यांना होणारे नुकसान आपल्याला टाळायचे असेल, तर फळझाडांची लागवड करणार्‍या बागायतदारांना शासनाकडून नुकसान भरपाई दिले जाणे महत्त्वाचे आहे.
- नितीन नार्वेकर, पक्षी निरीक्षक, चिपळूण


झाडांची निवड आवश्यक
धनेशाच्या खाद्यझाडांच्या बेकायदा तोडीवर बंदी आणणे गरजेचे आहे. ’महाराष्ट्र वृक्ष कायदा, 1975’ मध्ये ‘वृक्ष’ या व्याख्येची व्याप्ती व्यापक आहे. 1.3 मीटरपेक्षा उंच आणि दहा सेमीपेक्षा जास्त बुंध्याच्या घेर असणार्‍या झाडांना ’वृक्ष’ म्हटले जाते. भारतातील साग आणि साल ही झाडे सोडली, तर इतर कोणत्याही झाडाचे निश्चित वय काढता येत नाही. धनेशाच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी धनेशाला आवश्यक असणार्‍या खाद्यफळांच्या झाडांचे रोपण करणे गरजेचे आहे. हे वृक्षारोपण करताना, झाडांच्या वाढीचा वेग लक्षात घेऊनच, झाडांची निवड करावी. कमी वेगाने वाढणार्‍या झाडांचे ‘इन-सिटू‘ पद्धतीने संवर्धन करावे आणि वेगाने वाढणार्‍या प्रजाती या धनेशाच्या अधिवास संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये वापरणे गरजेचे आहे.
- डॉ. अमित मिरगळ, वनस्पती अभ्यासक


धनेशमित्र पुरस्काराचे विजेते
कोकणात धनेश संवर्धन आणि जनजागृतीसंदर्भात महत्त्वपूर्ण कामागिरी बजावणार्‍या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा धनेशमित्र पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला.


hornbill