दिल्ली का ठग!

    26-Mar-2024
Total Views |
 Arvind Kejriwal

आम आदमी पक्ष आणि त्याचे एकमेव नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभाराची अधिक भयावह आवृत्ती बनण्याच्या प्रयत्नात आहेत. केजरीवाल यांची राजकारणात उतरण्यापूर्वीची वक्तव्ये आणि एक नेता म्हणून त्यांनी केलेले वर्तन हे भारतातील कसलेल्या भ्रष्ट नेत्यांनाही लाजविणारे. तुरुंगात जाईन, पण मुख्यमंत्रिपद सोडणार नाही, हे केजरीवाल यांचे वर्तन पाहून भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादवही शरमिंदे झाले असतील; कारण त्यांनीही अटक झाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शुचिता दाखविली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेरीस अटक झाल्यामुळे आम आदमी पार्टीच्या मनमानी आणि प्रचंड भ्रष्ट कारभाराला काहीसा लगाम बसला. दिल्लीत मद्यविक्री परवान्यांसाठी जे नवे धोरण दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने, म्हणजेच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाहीर केले होते, ते सरकारचा महसूल घटवून मद्यविक्रेत्यांचे खिसे भरणारे कसे होते आणि त्याचा थेट आर्थिक लाभ केजरीवाल यांना आणि त्यांच्या पक्षाला कसा झाला, त्याचा कागदोपत्री आणि परिस्थितीजन्य पुरावा सक्तवसुली संचालनालयाच्या (म्हणजेच ‘ईडी’च्या) हाती लागल्यानंतर, केजरीवाल यांची अटक हा काळाचा प्रश्न उरला होता. या मद्यविक्री परवान्यांचा लाभ मोजक्या लोकांना देऊन त्यांच्याकडून केजरीवाल यांनी पक्षासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला. त्याचा वापर गोवा, पंजाब वगैरे राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आला.

‘ईडी’च्या तब्बल नऊ समन्सना केराची टोपली दाखवणार्‍या केजरीवालांवरील कारवाईत हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्यावर केजरीवाल यांची अटक निश्चित झाली. पण, केजरीवाल यांना अटक करण्यासाठी त्यांच्या शीशमहालात गेल्यावर या अधिकार्‍यांवरच थक्क होण्याची वेळ आली. कारण, ‘ईडी’च्याच अनेक अधिकार्‍यांवर केजरीवाल सरकारकडून कशी पाळत ठेवली जात होती आणि त्यांच्याविषयीची खासगी स्वरूपाची माहिती कशी गोळा केली जात होती, याचा तपशील दर्शविणारी १५०च्या वर कागदपत्रे या अधिकार्‍यांना केजरीवाल यांच्या महालात आढळली. यावरून केजरीवाल हे किती कुटिल मनोवृत्तीचे नेते आहेत, त्याची कल्पना येते. आता त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीत आणखी काय काय माहिती बाहेर येते, ते लवकरच कळेल.

केजरीवाल यांच्या अटकेमुळे देशात सोडाच, पण दिल्लीमध्येही जनतेत सहानुभूतीची लाट उसळलेली नाही. आपचे कार्यकर्ते इमानेइतबारे निदर्शने करण्याचे काम करीत असले, तरी केजरीवाल यांच्यावर अन्याय झाला, अशी भावना सामान्य जनतेत तरी निर्माण झाल्याचे दिसत नाही. ती भावना फक्त केजरीवाल यांच्या सोशल मीडियावरील सहानुभूतीदारांमध्ये असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत आणि त्यांनी देशातील लोकशाही धोक्यात आणल्याचे तुणतुणे केजरीवाल वाजवीत असले, तरी कायदेशीर प्रक्रियेला धुडकावून लावीत खरा हुकूमशहा कोण आहे, तेच दाखवून दिले आहे. रीतसर काढलेल्या समन्सना बेकायदा म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

एक कथित प्रामाणिक आणि साधनशुचिता मानणारा कार्यकर्ता ते विलक्षण स्वार्थी आणि हुकूमशाही मनोवृत्तीचा नेता, असा केजरीवाल यांचा झालेला अधोगामी प्रवास थक्क करणारा तसाच मन विषण्ण करणाराही आहे. युपीए सरकारच्या उत्तरार्धात केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या सत्शील प्रतिमेचा वापर करून केजरीवाल यांनी आंदोलन उभे केले असले, तरी त्यातूनच त्यांनी आपले राजकीय बस्तान कधी बसविले, ते त्यांच्या सहकार्‍यांनाही कळले नाही. या आंदोलनाचेच रुपांतर केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी या पक्षात करून त्याची सारी सूत्रे हलकेच आपल्या हाती घेतली. पुढे त्यांच्या नेतृत्त्वाला किंचितही विरोध करणार्‍या प्रत्येक नेत्यास त्यांनी पक्षातून बाहेर काढून टाकले. आता पक्षात फक्त त्यांचे होयबा नेतेच उरले आहेत.

आता ते स्वत: आणि त्यांचा पक्ष देशात काँग्रेसची जागा घेऊ पाहत असले, तरी त्यासाठी काँग्रेसच्या भ्रष्ट आचरणाचा वसाही घ्यायला पाहिजे, अशी त्यांची समजूत झाली आहे की काय, हे कळत नाही. सरकारी, म्हणजेच जनतेच्या पैशाची लूट करून आपले खिसे कसे भरायचे, हे तत्त्व केजरीवाल यांनी किती चटकन आत्मसात केले, ते ४५ कोटी रुपये खर्च करून त्यांनी उभ्या केलेल्या शीशमहालावरून दिसून आलेच आहे. इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने देशात भिंद्रनवाले आणि खलिस्तानचे भूत उभे केले होते. ते कसेबसे शमले असताना केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा खलिस्तानी ठिणगीला हवा देत ती पुन्हा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. केजरीवाल यांच्या पक्षाला कॅनडातून खलिस्तानी संघटनांकडून आणि त्यांच्या पाठिराख्यांकडून सढळ हस्ते निधीचा पुरवठा होत असल्याचे पुरावे देशाच्या तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. पंजाबात अमृतपालसिंगच्या रूपाने दुसरा भिंद्रनवाले उभा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने वेळीच हाणून पाडला.

आता तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतील धार्मिक छळवणुकीपासून बचाव करण्यासाठी भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंना चोर, लुटेरे आणि ‘पाकिस्तानी’ असे संबोधण्यापर्यंत त्यांचा अध:पात झाला आहे. हिंदूंचा देश असलेल्या या देशात धार्मिक सतावणुकीपासून सुटका करून घेण्यासाठी हिंदूंनी आश्रय घ्यायचा नाही, तर कोणी घ्यायचा? पण फक्त आणि फक्त सत्तेसाठी मुस्लीम लांगूलचालनाची परिसीमा गाठणार्‍या केजरीवाल यांना हे हिंदू परके वाटले, तर नवल नव्हे! कारण हे हिंदू त्यांची मतपेढी बनू शकत नाहीत. म्यानमार आणि बांगलादेशातून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी दिल्लीतील आप सरकारने पायघड्या अंथरल्या होत्या, ते मतपेढीचे लांगूलचालनच होते. भारतात रोहिंग्या मुस्लीम वसले तरी चालतील, पण हिंदूंना जागा देता कामा नये, ही आम आदमी पक्षाची, त्यातही केजरीवाल यांची भूमिका जितकी धक्कादायक आहे, तितकीच ती संतापजनकही!

आता काँग्रेसचे घराणेशाहीचे राजकारण केजरीवाल पुढे चालवितील, हे त्यांच्या पत्नीने केजरीवाल यांनी जेलमधून धाडलेला संदेश वाचून दाखविला, तेव्हाच स्पष्ट झाले. जेलमध्ये जाईन, पण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, ही केजरीवाल यांची भूमिका पाहून भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादवही लाजले असतील. कारण, त्यांना अटक झाल्यावर त्यांनीही आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण, केजरीवालांनी तितकीही शुचिता दाखविलेली नाही. आता परिस्थितीच्या रेट्यापुढे दबून त्यांनी राजीनामा दिला, तरी त्याने काही फरक पडत नाही. कारण त्यांचा हेतू काय आहे, ते जनतेला कळून चुकले आहे. केवळ काही गोष्टी फुकटात मिळविण्याच्या लालसेपोटी दिल्लीवासीयांनी एका कुटिल नेत्याला जन्म दिल्याबद्दल देशात दिल्लीच्या मतदारांची निर्भर्त्सना होत आहे. हा नेता दिल्लीकरांचा मसिहा नसून दिल्ली का ठग निघाला!