केजरीवालविरोधात दिल्ली भाजपची निदर्शने!

    26-Mar-2024
Total Views |
BJP protest march

नवी दिल्ली:
(विशेष प्रतिनिधी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने मंगळवारी दिल्लीत निदर्शने केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी निदर्शनांमध्ये भाग घेतला.दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दिल्ली प्रदेश भाजप आक्रमक झाली आहे. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी दिल्ली सचिवालयावर जाण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आला. दिल्ली पोलिसांवी विरेंद्र सचदेव यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत, अशा स्थितीत त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा. मात्र, अरविंद केजरीवाल अजूनही आपल्या पदावर आहेत. त्यामुळे त्यांन पदाचा लोभ असून ते असुरक्षित समजत आहेत, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी लगावला.आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे केजरीवाल यांची सुटका करण्याच्या मागणीसह निदर्शने करण्यात आली. आपतर्फे लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानास घेराव घालण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी, दिल्लीस पोलिस स्टेट बनविले असल्याची टिका आप नेते गोपाळ राय यांनी केली.दरम्यान, केजरीवाल यांच्यातर्फे अटकेस दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आज, बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.