आगरी समाजाची सुकन्या

25 Mar 2024 21:02:02
Vrishali Patil


डॉ. वृषाली पाटील यांना नुकतीच ‘डॉक्टरेट’ पदवी मिळाली. ही पदवी मिळवणार्‍या पालघरच्या सफाळा येथील आगरी समाजातील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...

वृषाली पाटील ’पीएचडी’ झाल्या, म्हणून त्यांच्या आगरवाडी गावातल्या महिलांनी त्यांचा सत्कार केला. गृहिणी, भातशेती करणार्‍या, मिठाची आगर सांभाळणार्‍या आणि सधन-संपन्न कुटुंबातील लेकी-सुनांनाही कोण एक आनंद झाला. ’पीएचडी’ मिळवणार्‍या वृषाली पाटील या पालघरमधील आगरी समाजाच्या पहिल्या महिला. वृषाली या भिवंडीच्या एका महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यही आहेत.कष्टकरी समाज, त्यातही इतर मागासवर्गीय समाजातील महिलांसाठी ही एक प्रेरणादायी घटना. महिलांसाठी अगदीच ’रांधा, वाढा, उष्टी काढा’ अशी परिस्थिती समाजात नाही. पण, घरची शेतीभाती, जमीन असेल तर महिलांनी घरी कुटुंब सांभाळावं, सासर-माहेरकडून वारसा हक्काने मिळालेल्या शेकडो तोळ्याच्या दागिन्यांत रमावे, गरज असेल, तरच बाहेर नोकरी वगैरे करावे; अन्यथा घरात काय कमी कामे आहेत? अशी साधारण पूर्वपार मानसिकता भारतातील बहुसंख्य समाजगटांमध्ये असते. डॉ. वृषाली पाटील काही या समाजरचनेच्या बाहेर नाहीत.

पालघरमधील सफाळे येथील आगरवाडीच्या सुदाम आणि सुभद्रा वझे यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक वृषाली. लहाणपणापासून त्यांना वाटे की, डॉक्टर होता नाही आले, तर परिचारिका तरी व्हावे. मात्र, वयाच्या १७व्या वर्षी बारावी इयत्तेत शिकत असतानाच, त्यांना विजयकुमार पाटील यांचे स्थळ आले. भिवंडीतील मातब्बर अतिशय श्रीमंत घराणे. बारावीच्या परीक्षेनंतर लगेचच त्यांचा विवाह होणार होता. शिक्षणाची आवड असलेल्या वृषाली यांनी बारावीची परीक्षा अगदी तयारीनिशी दिली. दुर्दैव की, परीक्षेदरम्यान पेपरला जातानाच, त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना कुत्रा चावला. जखम मोठी होती. ३०-३५ वर्षांपूर्वीची घटना. त्यावेळी पेपर लिहायला सफाळ्यासारख्या गावात लेखनिक अचानक मिळणे शक्यच नव्हते. त्यांना एक पेपर लिहिता आला नाही. त्यामुळे बाकी सर्व पेपरमध्ये त्यांना चांगले गुण मिळाले आणि एका विषयात त्या अनुत्तीर्ण झाल्या. अर्थात, गुणपत्रिका मिळण्याआधीच त्यांचा विवाह झाला होता.
 
सफाळ्यावरून भिवंडीला सासरी आल्यावर, वृषाली यांनी सून म्हणून सगळ्या जबाबदार्‍या स्वीकारल्या. मात्र, आपण शिकायला हवे, असे त्यांना सारखे वाटे. तसे त्यांनी पतीला आणि सासर्‍यांना सांगितले. यावर बारावीचा अनुत्तीर्ण राहिलेल्या, एका विषयाचा पेपर देण्यासाठी, त्यांना परवानगी मिळाली. पुढच्या शिक्षणासाठी मात्र त्यांना सांगितले गेले की, ’तालेवार घरच्या सुना घराबाहेर पडत नाहीत. तसेच शिकून काय करायचे आपल्याकडे तर सगळेच आहे.’ सासरच्यांच्या इच्छेपुढे जाणे शक्य नव्हते. तसेच त्यावेळी समाजात अशीच परिस्थिती होतीच. मात्र, पतीच्या सांगण्यानुसार, या काळात त्यांनी हस्तकला शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे वृषाली यांना दोन मुले झाली.त्यांचे सासरे वन अधिकारी होते. काही वर्षांनी त्यांची बदली शहापूरला झाली. सासू-सासरे आणि कुटुंब शहापूरला गेले आणि त्या पती, मुलांसोबत भिवंडीला राहिल्या. कारण, पाटील कुटुंबाचे इथे वडिलोपार्जित घर आणि जमीन होती. आता वृषाली यांनी शिकायचेच ठरवले. पतीने शिकायला परवानगी दिली. शिकायची संधी मिळाली, हेच मोठे भाग्य! आता शिक्षणाचा खर्च आपला आपण करायचा, असे वृषाली यांना वाटले. त्यामुळे एका शाळेत शिकवायला सुरुवात केली. सकाळी शाळा, दुपारी खासगी शिकवणीमध्ये शिकवणे, तद्नंतर घरी स्वतःच्या खासगी शिकवणीमध्ये मुलांना शिकवणे सुरू केले. यातून मिळालेल्या पेशातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ’बीएड’ केले.

इतकेच नव्हे, तर भिवंडीतच फ्लॅटही घेतला. याच काळात सासरीही बर्‍याच घडामोडी घडत होत्या. सासरच्या मालमत्तेबाबत फसवणूक झाली. तसेच विजयकुमार यांनी नोकरीचा राजीनामा देत, सफाळा येथे व्यवसाय करण्याचे ठरवले. व्यवसायात व्यवस्थित लक्ष देता यावे, म्हणून अधूनमधून भिवंडीला घरी यायचे. व्यवसायाची घडी बसेपर्यंत सफाळ्याला राहायचे ठरवले. पतीला व्यवसायात पूर्ण लक्ष देता यावे, म्हणून मग वृषाली यांनी सर्वार्थाने कुटुंबाची सर्वच जबाबदरी स्वीकारली. अशातच त्यांना महाविद्यालयाच्या विश्वस्तांनी सांगितले की, तुम्ही ’पीएचडी’ केली, तर महाविद्यालयाच्या प्राचार्य होऊ शकता. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांनी ’पीएचडी’साठी प्रवेश घेतला. २०२० साली कोरोना आला. विजयकुमार यांना कोरोना झाला. डॉक्टरांनी सांगितले की, वाचायची शक्यता कमीच. पण, वृषाली यांनी पतीला कोरोनाच्या तोंडातून अक्षरशः परत आणले. या सगळ्या काळात घरच्यांबरोबरच त्यांच्या मैत्रिणी कविता खैरनार, सुजाता पाटील आणि मानलेला भाऊ शरद धुळे आणि कुटुंबीयांनी खूप सहकार्य केले. नुकतीच वृषाली यांना ’पीएचडी’ मिळाली.

डॉ. वृषाली पाटील म्हणतात की, ”उच्चशिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे, यासाठी समाजातील युवक-युवतींना जागृत करणार आहे. तसेच वडिलोपार्जित जमीन विकणे, हा प्रकार समाजात सर्रास घडतो. मात्र, मिळालेल्या पैशांचे काय होते? पुढच्या पिढीचे काय होते? अनेकदा उत्तर नकारात्मकच मिळते. त्यामुळे समाजात आर्थिक नियोजनासाठीही जागृती करते आणि पुढेही करणार. माझ्या समाजाच्या प्रगतीसाठी मला खारीचा वाटा उचलायचा आहे.” डॉ. वृषाली यांचे विचार पाहून वाटते की, त्यांच्या नावापुढे लागलेली ‘डॉक्टरेट’ बिरुदावली ही प्रत्येक कष्टकरी समाजशील महिलेसाठी अभिमानास्पद आहे. डॉ. वृषाली या आगरी समाजाच्या सर्वार्थाने सुकन्या आहेत.


 
- योगिता साळवी


Powered By Sangraha 9.0