मुंबई : चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात रस्सीखेच सुरु असताना अखेर धानोरकरांना उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान, उमेदवारीबद्दल आभार मानताना त्यांनी वडेट्टीवारांचं नाव घेणं टाळलं. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
प्रतिभा धानोरकर यांनी सोमवारी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "मल्लिकार्जून खर्गे, राहूल गांधी, सोनिया गांधी, के. सी. वेणूगोपाल, रमेश चेन्नीथला, नाना पटोले, मुकुल वासनिक, शिवाजीराव मोघे, सुधाकर अडबाले, सुनील केदार, नितीन राऊत, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमुळे मला उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन, असा मला विश्वास आहे."
हे वाचलंत का? - पत्राला पत्रानं उत्तर! प्रणिती शिंदेंवर राम सातपूतेंचं शरसंधान
काँग्रेस पक्षात चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून वाद सुरु होता. विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार आपली मुलगी शिवानी वेडट्टीवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यासुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या. चंद्रपूर लोकसभा उमेदवारीचा प्रश्न सोडवताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. अखेर प्रतिभा धानोरकर यांना ही उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. मात्र, याविषयी बोलताना धानोरकरांनी विजय वडेट्टीवार यांचे नाव घेणे टाळले.
यावर वडेट्टीवारांनी सारवासारव केल्याचेही बघायला मिळाले. ते म्हणाले की, "पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण अंतिम निर्णय पक्षाचाच असतो. जिथे जिथे मला जाता येईल तिथे तिथे मी धानोरकरांच्या प्रचाराला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रतिभा धानोरकर गडबडीत माझं नाव घेण्याचं विसरल्या असतील. नावामुळे फार काही फरक पडत नाही. त्यामुळे ते घेतलंच पाहिजे असं काही नाही," असे ते म्हणाले.