मृणाल दुसानिस छोट्या पडद्यावरुन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?
मुंबई :अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हिने ‘तु तिथे मी’, ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. परंतु, छोटा पडदा गाजवणारी मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) लग्नानंतर मनोरंजनविश्वापासून दुर जात थेट अमेरिकेत स्थायिक झाली. पण आता पुन्हा एकदा ती कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे.
नाशिक ते मुंबई असा प्रवास करत मृणालने आपली अभिनेत्री ही ओळख निर्माण केली. मालिकांमध्ये काही काळ रमल्यानंतर तिने नीरज मोरे सोबत लग्नगाठ बांधली. आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मृणालने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. पण आता पुन्हा ती भारतात आली असून एबीपी माझाशी बोलताना मृणाल दुसानिस म्हणाली,"चार वर्षांनी मायदेशी परतल्यानंतर खूप छान वाटत आहे. आता मी एकटी नसून माझी लेकदेखील माझ्यासोबत आहे. त्यामुळे आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मात्र मी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे".
तसेच, अभिनयाची पुन्हा सुरुवात करण्याबाबत ती म्हणाली, "आता मला पुन्हा काम सुरू करायचं आहे. प्रेक्षकही मला आगामी प्रोजेक्टबद्दल विचारत आहेत. त्यामुळे चांगल्या संधीची वाट पाहत आहे. सिनेमात काम करण्याची माझी इच्छा आहे. तसेच नाटकात काम करायलाही मला आवडेल. प्रायोगिक नाटकात मी काम केलं आहे. आता व्यावसायिक नाटकात काम करण्याची माझी इच्छा आहे". त्यामुळे नक्कीच मृणाल आता नव्या कलाकृतीत लवकरच दिसेल अशी आशा आहे.