प्रकाश शेंडगे यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, तिसऱ्या आघाडीची चाचपणी?

23 Mar 2024 19:12:21
Prakash Shendge Met Ambedkar
 
 
मुंबई :     महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत लग्नाआधीच घटस्फोटाची शक्यता गृहीत धरून 'ओबीसी बहुजन पार्टी'चे नेते प्रकाश शेंडगे यांनी शनिवार, दि. २३ मार्च रोजी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात तिसरे समीकरण उदयाला येते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दादर येथील राजगृह निवासस्थानी आंबेडकर आणि शेंडगे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शेंडगे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्यात तिसरी आघाडी तयार होईल आणि राजकीय भूकंप होईल. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तीन बैठका झाल्या आहेत.


हे वाचलंत का? -   एमएमआरडीए प्रकल्पांचे पुनरावलोकन होणार!


ओबीसी बहुजन पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी राज्यात ताकदीने लढेल. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना आमच्या जागांचा प्रस्ताव दिला आहे. कोण कुठे लढेल, याची चर्चा त्यांच्याशी केली. आरक्षणवाद्यांनी एकत्रित लढले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले.

आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडे २२ जागा लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर काम सुरू आहे. राज्यात ६० टक्के ओबीसी आणि २० टक्के भटक्या समाजाची व्होट बँक आहे. सर्वजण एकत्र आले, तर राज्यात मोठा भूकंप होईल. ज्या आमदार आणि खासदारांनी ओबीसींविरोधात भूमिका घेतली, त्यांना ओबीसी समाज जागा दाखवून देईल. घोडा मैदान जवळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला.


शेंडगेंशी चर्चा सुरू राहणार - प्रकाश आंबेडकर

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष काढला आहे. त्यांनी एक यादी आमच्याकडे सादर केली. परंतु, आमचेच घोंगडे भिजत पडलेले आहे, ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही, असे आम्ही त्यांना सांगितले. आमच्यात दीड तास चर्चा झाली. ते कोणत्या मतदारसंघांसाठी इच्छुक आहेत, याची माहिती घेतली. पुढे चर्चा सुरू राहणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.



Powered By Sangraha 9.0