केजरीवाल गेले राऊत वाचले! राऊत कुटुंबाचा दारु घोटाळ्यात सहभाग

23 Mar 2024 17:20:41

Arvind Kejrival & Sanjay Raut 
 
मुंबई : संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनीही वाईन घोटाळा केला असून अरविंद केजरीवाल आत गेले पण संजय राऊत वाचले, असा खुलासा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारच्या काळातील वाईन घोटाळा उघडकीस आणला आहे.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "महाराष्ट्रात झालेल्या वाईन घोटाळ्याबाबत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काही बोलणार का? हा घोटाळा आम्ही जानेवारी २०२२ ला उघडकीस आणला होता. संजय राऊत परिवारानेसुद्धा दारूचा धंदा सुरु केला होता हे महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे का?"
 
हे वाचलंत का? -  मविआने ४ जागांचा प्रस्ताव दिलेला नाही : प्रकाश आंबेडकर
 
"संजय राऊत परिवाराने महाराष्ट्रात अशोक गर्ग यांच्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेडसोबत भागीदारी केली होती. या कंपनीला शेकडो कोटींचा फायदा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने आपल्या अबकारी वाइन धोरणात बदल केला. वाईन दारू नाही. किराणामालाच्या दुकानात वाईनची विक्री करता येणार, असे धोरण त्यांनी आणले संजय राऊतांनी अशोक गर्गसोबत पार्टनरशीप केली होती की, नाही हे सांगावं. संजय राऊतांची मुलगी विदीता राऊत, पुर्वशी राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजीत पाटकर हे सगळे १६ एप्रिल २०२१ ला अशोक गर्ग यांच्या मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पार्टनर झाले. राऊत या दारुच्या कंपनीत पार्टनर का झाले, कसे झालेत? अशोक गर्ग यांनी त्यांना पार्टनर का बनवलं?," असे सवाल त्यांनी केले.
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी २०२१-२२ मध्ये वाईन धोरण बदलण्याचा निर्णय घेतला. त्यातील घोटाळा मी आणि देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणला. म्हणून फेब्रुवारी २०२२ मध्ये या धोरणात केलेला बदल मागे घेतला. अरविंद केजरीवाल गेले आणि राऊत, ठाकरे सरकार वाचले. यासंबंधी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. हा घोटाळा आम्ही वाचवला पण हा घोटाळा काय होता? संजय राऊत आणि त्यांचा परिवार या कंपनीचे पार्टनर कसे झालेत? या सगळ्याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावी अशी विनंती मी त्यांना केली आहे," असे ते म्हणाले.
 
 

Powered By Sangraha 9.0