धोक्यात नेमके कोण? लोकशाही की भ्रष्टाचारी?

    23-Mar-2024
Total Views |
INDIA Alliance democracy statement


अरविंद केजरीवाल सध्या जात्यात आहे आणि बाकी सर्व सुपात आहे. म्हणून ’इंडी’ आघाडीला एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. लढण्यासाठी घोषणा लागते. म्हणून त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याची घोषणा दिली आहे. नेमके कोण धोक्यात आहे, याचा घेतलेला हा आढावा...

’ईडी’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी गुरुवार, दि. २१ मार्च रोजी अटक केली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले हे दुसरे मुख्यमंत्री. मद्य घोटाळा प्रकरण थोडक्यात असे. दारूवरील शुल्क कमी करून, त्यातून नफा मिळवण्यासाठी के. कविता यांच्या मदतीने अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मद्य घोटाळा केला. या प्रकरणात मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि के. कविता यांनाही अटक करण्यात आली आहे. नऊ वेळा समन्स पाठवून, त्याला प्रतिसाद न दिल्याने, शेवटी ’ईडी’ने अरविंद केजरीवाल यांना अटक करून, मद्य घोटाळ्यातील अपहाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच त्यांची १२८ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

अरविंद केजरीवाल हे ’इंडिया’ आघाडीचे सदस्य. अतिशय धूर्त तेवढेच बुद्धिमान आणि शासन कसं चालतं आणि कसं चालवायचं, याची उत्तम माहिती असलेले आहेत. त्याचबरोबर राजकीय संधी नेमकी पकडून तिचा फायदा कसा उठवायचा, लोकांना झुलवत कसे ठेवायचे, या सर्व बाबतीत ते तज्ज्ञ. असा राजकारणी स्वत:चे नाममाहात्म्य भरपूर वाढवितो. त्याच्या राजकीय हालचालींमुळे लाभार्थी होणारे शेकडो लोकं त्याच्या भोवती उभे राहतात. असा राजकारणी समाजाचे आणि देशाचे भले तर करीत नाही; पण नुकसान प्रचंड करतो. आज विद्यमान असलेल्या अशा प्रकारच्या राजकारणी नेत्यांतील अरविंद केजरीवाल मुकुटमणी आहेत.

असंख्य भानगडी केल्यानंतर त्या पचवायच्या कशा, ते तंत्र केजरीवाल यांना अवगत आहे. ‘मी प्रचंड भ्रष्टाचार केला म्हणून मला अटक झालेली नसून, मी मोदींच्या विरुद्ध लढतो आहे. भारतीय जनता पक्षाचा विरोध करतो आहे, म्हणून मला अटक झालेली आहे. माझी अटक ही लोकशाहीवरील हल्ला आहे. माझी अटक राज्यघटना पायदळी तुडवण्यासारखी आहे. सूडाचे राजकारण चालू आहे. मी त्याला घाबरत नाही. मी लढा देत राहणार.’

अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी इंडिया आघाडीतील शरद पवार, प्रियांका गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव असे सर्व नेते सरसावले आहेत. यापैकी एकही नेता राजकीय भ्रष्टाचाराच्या चिखलापासून दूर राहिलेला नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे- इळीवी ेष ींहश ीराश षशरींहशी षश्रेलज्ञ ीेंसशींहशी. एक सारखे पंख असलेले पक्षी एकत्र उडतात, असा त्याचा अर्थ झाला.
अण्णा हजारे यांनी २०१२ साली भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केले. दिल्ली त्याचे केंद्र होते. अरविंद केजरीवाल तेव्हा अण्णा हजारेंचे प्रवक्ते झाले. टीव्हीवर झळकू लागले. भ्रष्टाचाराविरुद्ध एक बुद्धिमान तरूण उभा राहत आहे, याचे देशाला कौतुक वाटले. परंतु, धूर्त केजरीवाल भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी उभे राहिलेले नव्हते. जनआक्रोशाचा लाभ कसा उठविता येईल, याचे त्यांनी दीर्घ नियोजन केले होते.

अण्णा हजारेंचे आंदोलन संपले आणि लगेचच अरविंद केजरीवाल यांची खेळी सुरू झाली. त्यांनी आम आदमी पक्षाची घोषणा केली आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ते उतरले. सत्पुरूष अण्णा हजारेंच्या पुण्याईचा दिल्लीत त्यांना फायदा झाला. काल जन्माला आलेली आम पार्टी सत्तेवर आली आणि मग केजरीवाल यांचा खेळ सुरू झाला. भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनात त्यांच्याबरोबर सहभागी झालेले अनेक लोकं त्यांना सोडून गेले. सत्तेवर आल्यानंतर गुळाला जशा मुंग्या चिकटतात, तसे समाजातील सत्ताभोगी सत्तेच्या गुळाला चिकटून राहतात. प्रामाणिक सहकारी गेल्याचे केजरीवालांना काहीही दुःख नव्हते. सत्तेचा वापर करणारी मंडळी गोळा झाली आणि त्यांना बरोबर घेऊन केजरीवाल यांचे राज्य सुरू झाले.

’इंडिया’ आघाडीपुढे या क्षणी एक गंभीर प्रश्न आहे. जर केजरीवाल यांना पाठिंबा दिला, तर आपण भ्रष्टाचाराचे समर्थन करतो असे होते. ’ईडी’ने केलेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर असून, दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्याचा नकार दिला. मद्य धाोरणात घोटाळा झाला आहे, हे आतापर्यंत उघड झालेल्या माहितीवरून दिसते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्याची माहिती होती. पण, भ्रष्टाचारी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊन, आपण भ्रष्टाचाराला पाठिंबा देत आहोत, असेच सिद्ध होईल. हा तिढा ’इंडिया’ आघाडीपुढे आहे.

अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला नाही, तर ‘इंडिया’ आघाडीतील अरविंद केजरीवाल यांच्या रांगेतील अन्य नेते घाबरतील. आज अरविंद केजरीवाल जात्यात आहे आणि बाकी सर्व सुपात आहे. म्हणून सर्वांना एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. लढण्यासाठी घोषणा लागते. त्यांनी घोषणा दिली आहे, लोकशाही धोक्यात आहे. केजरीवाल यांची अटक म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. हा सगळा हास्यास्पद युक्तिवाद आहे. या युक्तिवादाचा अर्थ असा होतो की, भ्रष्टाचाराला मुक्त परवाना देणे म्हणजे लोकशाही आहे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. लोकशाही राजवटीत प्रचंड भ्रष्टाचार करा, असे राज्यघटनेचे कोणते कलम सांगते, ते ’इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी जनतेला समजावून सांगावे. अरविंद केजरीवाल यांची अटक ही लोकशाहीची हत्या कशी ठरते, हे तर्कशुद्ध पटवून देते.

आपली राज्यघटना शुद्ध राज्यकारभाराची अपेक्षा ठेवते. चांगली धोरणे आखून राज्यकर्त्यांनी जनकल्याण करावे, अशी मर्यादा घालून देते. अरविंद केजरीवाल हे खर्‍या अर्थाने लोकशाही आणि राज्यघटनेचे मारेकरी आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आहे. ’ईडी’ आणि ’सीबीआय’ केंद्र शासनाच्या अधिकाराखाली येतात. शासनाची अनुमती असल्याशिवाय ’ईडी’ आणि ’सीबीआय’ कारवाया करू शकत नाही. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करून, केंद्र शासनाने जुगार खेळला आहे का? ज्याला अटक झाली, त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण होऊ शकते. विरोधी पक्षांना अटकेविरुद्ध राजकीय कथानक बनवता येऊ शकते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमागचा हा धोका आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच, घोषणा केली होती की, ‘मी भ्रष्टाचार समूळ नाहीसा करेन, भ्रष्टाचारी लोकांना सोडणार नाही, भ्रष्टाचारी कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याची गय करणार नाही.’

नरेंद्र मोदी जे बोलतात ते करतात, अशी त्यांची आजवरची प्रतिमा आहे, म्हणून केजरीवाल यांना अटक करून मोदी यांनी अनेक संदेश दिले आहेत. ते असे की, मी भ्रष्टाचार सहन करणार नाही, भ्रष्टाचारांची गय करणार नाही, राजकीय लाभहानीचा विचार करणार नाही, स्वच्छ प्रशासन हा माझा मंत्र आहे. या संदेशाविरुद्ध आता ’इंडिया’ आघाडीला लढायचे आहे. ‘लोकशाही धोक्यात, राज्यघटना धोक्यात, आणखीन काही खोक्यात’ अशा वटवटीला काही अर्थ राहिलेला नाही. अरविंद केजरीवाल यांना अटक करून, ’इंडिया’ आघाडीला अनेक बाजूने सुरूंग लावण्याचे काम मात्र झाले आहे. येणार्‍या काळात त्याचे स्फोट होत राहतील, ते आपण बघत राहू या.

रमेश पतंगे
९८६९२०६१०१