गोदा संस्कृतीच्या महावस्त्रातील बहुमूल्य दस्तऐवज ’गौतमी माहात्म्य’

    23-Mar-2024   
Total Views |
Goda Culture Gautami Mahatmya


‘गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ हा तीन खंडातील ग्रंथ ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केला आहे. या तीनही ग्रंथांचे संपादन डॉ. अरूणचंद्र शं. पाठक यांनी केले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ला विशेष दिलेल्या मुलाखतीत पाठक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. मुलाखतीतील या माहितीचा लेखस्वरुपात घेतलेला आढावा...

गोदाखोरे एक स्वयंपूर्ण परिसंस्था. या दक्षिण द्वीपकल्पीय, पश्चिम घाटोद्भव आणि पूर्ववाहिनी नदीला ‘वृद्धगंगा’ व ‘दक्षिणगंगा’ म्हणून ओळखतात. मध्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारी अशी गोदावरीच्या खोर्‍याची ओळख. संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगण व आंध्र प्रदेशातून प्रवाहित होणार्‍या गोदावरी नदीचे खोरे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा व कर्नाटकच्या सीमांना स्पर्श करते. प्रामुख्याने मान्सूनचे अपत्य असलेली गोदावरी नदी मान्सूननंतर काही काळाने खंडित होते.

प्रवाहात तिला प्रवरा, ढोरा, सिंदफणा, सरस्वती, मांजरा या व इतर एकूण ३३ उपनद्या मिळतात, तर तिच्या डाव्या बाजूकडून अगस्ती, शिवभद्रा, येलभद्रा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती अशा एकूण ३५ उपनद्या मिळतात. गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास या बृहत् प्रकल्पात गोदावरी नदीच्या खोर्‍याचा अभ्यास करताना, तो तिच्या विविध अंगांनी केला आहे. या पुस्तकात गोदावरीचे भौगोलिक व भूशास्त्रीय दृष्टिकोनातून तपशील दिले आहेत. शिवाय तिच्या भूपुरातत्त्वीय स्वरुपातील प्राचीन पर्यावरणाचा तपशील नोंदवला आहे.

गौतमी माहात्म्य (भाग १)

ब्रह्मपुराणांतर्गत असलेल्या गौतमी माहात्म्याच्या विविध प्रतींचे अवलोकन व संकलन करण्याचा प्रयत्न पहिल्या भागात दिसून येतो. त्याजोडीने पद्मपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण यांसारख्या पुराणग्रंथांतूनही गौतमी माहात्म्याची नोंद सापडते. प्रस्तुत प्रकल्पात रंगनाथशास्त्री वैद्य यांची प्रत प्रमाण मानून, तिचा अनुवाद उपलब्ध करून दिला आहे. या प्रतीत एकूण १०५ अध्याय असून एकूण श्लोकसंख्या ४ हजार, ६४० इतकी आहे. ’गाथासप्तशती’मध्ये गोदेला ‘गोला’, ‘गोलाई’, ‘गोलवई’ या नावांनी संबोधले आहे. गोदावरीचे नाव ‘गोदा’ या द्रविड शब्दापासून निर्माण झाले, तर दख्खनला विभागणारी म्हणून ‘गोंदे’ (मर्यादा) या तेलुगू शब्दापासून तिला हे नाव पडल्याचे, काही भाषा पंडित मानतात.

गोदावरीकाठी असलेल्या विविध जनसमूहांमध्ये भिल्ल, कोळी, वारली, कोकणा, ठाकूर, कोलम, पारधी, कोया, तसेच आंध्र-तेलंगणमध्ये कोंडारेड्डी, चेन्च्यू, थोट्टी, कोलाम, गौंड तर तिच्या त्रिभुज प्रदेशात कोंडारेड्डी, पांडवरेड्डी, राजरेड्डी आपले अस्तित्व टिकवून आहेत. विविध जमाती आपली अंगभूत वैशिष्ट्ये टिकवून राहिल्या आहेत. तिच्या विविध उपनद्यासुद्धा आपापल्या खोर्‍याचे सहअस्तित्व स्पष्ट करतात. गोदावरीच्या समन्वयात्मक स्वरुपातून आपल्याला विविधतेतील एकात्मता दिसते. पौराणिक साहित्य व स्थल माहात्म्यातून व्यक्त होताना ही कथानके, भारतीय परंपरेच्या अखंडित प्रवाहाचे सातत्य दाखवतात. अगदी वेदकाळापासूनचे संचित जनसामान्यांपर्यंत पोहोचवताना काही कथानके रुपात्मक परिवर्तनासह व्यक्त होतात.

’अष्टांगांचा अभ्यास’ (भाग २)

संत दासगणू महाराजांनी गोदावरीची पूर्ण प्रदक्षिणा करून, गौतमी माहात्म्याच्या उपलब्ध असलेल्या विविध प्रती, परंपरेने रूढ असलेल्या लोकस्मृती, विविध स्थानांवरील श्रद्धा व परंपरा यांच्या आधारे गोदावरीच्या अष्टांगांची नोंद केली. गोदावरी नदीची मानवी शरीराशी तुलना करून, विविध स्थाने निश्चित केली. त्याविषयीचा उल्लेख असा की,

शिरप्रदक्षिणा ब्रह्मगिरी, मुखप्रदक्षिणा पुणतांबेनगरी। कंठप्रदक्षिणा होय पुरी, पैठणक्षेत्राजवळी हो
मंजरथ हृदयस्थान, शंखतीर्थ नाभी जाण। कटी होय मंथन, जानु ती धर्मापुरी
त्र्यंबकेश्वर शीर्षस्थान मानले गेले आहे. येथे ब्रह्मगिरीवर गोदावरीचा उगम होतो. संस्कृतमधील एक कोश ’कल्पद्रुम’ यात जल अथवा स्वर्ग प्रदान करण्यामध्ये जी श्रेष्ठ आहे, तिला ‘गोदावरी’ म्हटले आहे. एकूण संपन्न जीवनासाठी आवश्यक जल प्रदान करणारी, गोदावरी नदी मानली गेली आहे. तिच्यावर असलेल्या आत्यंतिक निष्ठेमुळे काळाच्या ओघात आलेल्या विविध नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड देऊन सांस्कृतिक जीवनाचे सातत्य कमी-अधिक प्रमाणात टिकून आहे.

नाशिक येथे वैष्णव व शैव परंपरा आहेत. नाशिक येथे असलेली सातवाहनकाळातील बौद्धलेणी तेथील स्थापत्य व शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील बौद्ध लेण्यांमध्ये सातवाहन राजा कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञ सातकर्णी, वसिष्ठी पुत्र पुलूमावी या राजांचे दानलेख उपलब्ध आहेत. उत्तर काळातील जैन लेणी व मंदिर स्थापत्य नाशिक-अंजनेरी क्षेत्रात आढळून येते. प्राचीन यज्ञपरंपरा व पेशवेकालीन घाट हे या स्थानाचे वेगळेपण आहे.

प्रतिष्ठान (पैठण) हे गोदावरीचे कंठस्थान, गोदावरीच्या अर्धचंद्राकृती वळणावर वसलेले पैठण सातवाहन राजवंशाचे प्रमुख केंद्र होते. नाशिकप्रमाणेच मानवी वसाहतीचे आद्यकेंद्र म्हणून याची नोंद केली जाते. प्रतिष्ठानचा दबदबा संपूर्ण भारतात व भारताबाहेरही होता. गौतमीपुत्र सातकर्णी ते बदामी चालुक्य, कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि उत्तरकाळातील सर्वच राजांनी गोदावरी खोर्‍यात सत्तेसाठी संघर्ष केल्याचे आढळून येते. प्रतिष्ठान येथे राजसत्तेच्या बरोबरच धर्मसत्ता देखील होती. चक्रधर, ज्ञानेश्वर व पुढे उत्तर काळातील एकनाथ महाराज, शिवदिन केसरी, कृष्ण दयार्णव अशा संतकवींची नोंद घेऊन, त्यांचा सखोल अभ्यास डॉ. रा. मोरवंचीकर यांनी केला आहे. त्याच्याच आधारे या स्थानांची नोंद केली आहे. मंजरथ हे गोदावरीचे हृदयस्थान मानले जाते. येथे तिला सिंदफणा नदी काटकोनात मिळते.

एफ. इ. पर्जिटरच्या मते, ‘हनुमान’ या नावाची व्युत्पत्ती तामिळमध्ये ‘अणुमंती’ म्हणजे ‘नरवानर’ अशी दाखवली आहे. ऋग्वेदातील सूक्तात ‘वृषकपी’ असे नाव आले आहे. सामान्यजनांनी तामिळ नावाचे संस्कृतीकरण ‘हनुमान’ असे केले. वृषकपी, क्षणुक्षेप व अशा अन्य काही कथा गौतमी माहात्म्यात येतात. याचे काही संदर्भ वैदिक व उपनिषदिक साहित्यात आलेले दिसतात.
शंखतीर्थ हे गोदावरीचे नाभिस्थान मानले जाते. नांदेडच्या लगत हे ठिकाण असून येथे मिळणारे उजव्या सोंडेच्या शंखाचे अश्मीभूत अवशेष (फॉसिल्स) व स्थलमाहात्म्य यांचा अन्वयार्थ लावता येतो. येथील योगनरसिंह मंदिरातील असलेली योगपट्ट धारण केलेल्या नरसिंहाची मूर्ती (उत्तर चालुक्य काळातील) ही नरसिंह या विष्णूच्या अवताराची उन्नयनविषयक टप्प्यातील महत्त्वाची मूर्ती ठरते.

मंथनी हे गोदावरीचे कटीस्थान मानले जाते. याचे एक नाव ’मंत्रकूट’ असे आहे. धर्मापुरी व मंथनी ही दोन्ही स्थाने आजच्या तेलंगण प्रांतात येतात. येथील भिक्षेश्वर मंदिर हे मुळात नवव्या-दहाव्या शतकातील आहे. अलीकडे त्याचा जीर्णोद्धार केला आहे. येथील गौतमेश्वर मंदिर संकुल हे १२व्या शतकातील आहे. मंथनी येथे अनेक शिवस्थाने आहेत. फार पूर्वी हे एक प्रमुख शैव केंद्र म्हणून प्रसिद्धी पावले असावे. श्री. म. अ. ढाकी यांनी या स्थानाचे वर्णन करताना काकतीय राजवंशाचा राजा रुद्रदेव याच्या काळात त्रिनेत्र देवाचे म्हणजे शिवाचे मंदिर इ. स. ११७१ मध्ये उभारले असे म्हटले आहे. याशिवाय काकतीय राजा गणपतीदेव याच्या काळातील दि. २६ डिसेंबर ११९९ या दिवशीचा शिलालेख देवनागरी व संस्कृत भाषेतील आहे. सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरतो. काळेश्वर हे स्थान गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथे विजयनगरचा राजा हरिहर (द्वितीय) याने केलेल्या तुलापुरुषदानाची नोंद अभिलेखात उपलब्ध आहे. वैष्णवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भद्राचलम या ठिकाणी प्रतिरामदास मानला गेलेला कारचेला गोपन्ना हा संतकवी होऊन गेला.

राजमहेंद्री हे गोदावरीचे चरणस्थान. येथे मानवी वसाहतीचे अस्तित्व प्रारंभिक ऐतिहासिक काळापासून असावे. या स्थानाजवळ सातवाहनकालीन पुरातत्त्वीय गर्भक्षेत्र स्पष्ट झाले आहे. गावामध्ये अनेक मंदिरे असून कोटीलिंगेश्वर मंदिर, वेणुगोपालस्वामी मंदिर, लक्ष्मीनरसिंह मंदिर या वास्तू १९व्या शतकात मूळ ठिकाणी पुन्हा बांधल्या गेलेल्या दिसतात. येथे कुंभमेळ्याप्रमाणेच ‘पुष्कराळू’ हा महोत्सव दर १२ वर्षांनी साजरा केला जातो. यातील पहिले १२ दिवस ‘आदिपुष्करम’ व शेवटचे १२ दिवस ‘अंत्यपुष्कराळू’ म्हणन ओळखले जातात.

गोदावरीच्या काठी असलेले, द्राक्षाराम हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथील भीमेश्वर स्वामी मंदिरातील शिवपिंड आकाराने भव्य आहे. या लिंगाला ’मूळविराटरूप’ असे म्हणतात. हे मंदिर येथे असलेल्या ३८१ शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहे. हे शिलालेख इ. स. १०८० ते इ. स. १३३४ या काळातील आहेत. हे पूर्व चालुक्य, पश्चिमी चालुक्य, कलिंग, गंग व काकतीय राजवंशांचे श्रद्धास्थान आहे. एकूणच गोदावरी संस्कृतीच्या समग्र अभ्यासासाठी तिच्या अष्टांग स्थानांचे योगदान महत्त्वाचे असून, त्या सर्वांचा येथे साकल्याने आढावा घेण्यात आला आहे. अशा प्रकारे घेतलेला आढावा बहुधा प्रथमच नोंदवला गेलेला आहे.

गोदा संस्कृती (भाग तीन)

या खंडात गोदावरीचे विशाल स्वरूप व गोदा संस्कृतीचे विविध पैलू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे योगदान लाभले आहे. ’सच्चे भण गोदावरी’ या शीर्षकाखाली लिहिलेली प्रकल्पाचा आढावा घेणारी प्रस्तावना डॉ. रा. मोरवंचीकर यांनी लिहिली आहे. ’गोदावरीचे प्राचीन पर्यावरण’ या विषयाचा भूपुरातत्त्वीय दृष्टिकोनातून डॉ. शरद राजगुरू यांनी आढावा घेतला आहे. गोदाखोर्‍यातील पुराजीवशास्त्रीय इतिहास तसेच गोदावरी खोर्‍यातील अभिलेखांची नोंद करण्यात आली आहे. गोदाखोर्‍याच्या इतिहासाचा म्हणजे अप्पर गोदावरी, मध्य गोदावरी (म्हणजे गोदा-मांजरा संगमापासून गोदा-प्राणहिता संगमापर्यंतचे क्षेत्र व त्याचे उपखोरे) आणि त्यानंतर येणारा त्रिभुज प्रदेश (लोअर गोदावरी) अशा तीन भागांतील विविध राजवटींचा आढावा या ग्रंथात घेतला आहे. तसेच गोदाखोर्‍यातील समाज व लोकजीवन यांची नोंद स्वतंत्रपणे घेण्यात आली आहे.
 
भूशास्त्रीय दृष्टिकोनातून गोदाखोर्‍याचा केलेला विचार उद्बोधक ठरतो. गोंडवन क्षेत्रात सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी एका महान हिमयुगाची सुरुवात झाली. हे हिमयुग जवळपास एक कोटी वर्षे अस्तित्वात होते. यानंतर गोदाखोर्‍यातील पर्यावरणात बदल होत गेले. याच काळात (साधारण आठ कोटी वर्षांपूर्वी) नागमोडी वळण घेऊन, वायव्येकडे वाहणारी गोदावरी नदी अस्तित्वात आली. ही नदी बारमाही वाहणारी होती. सुमारे सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या भेगीय आणि द्रोणीय उद्रेकामुळे गोदावरी नदी बेसॉल्टच्या थराखाली लुप्त झाली. सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी भारत हा आशिया खंडाचा भाग झाला व यानंतर नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात झाली. सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेऊन वाहणारी गोदावरी नदी त्या काळी प्रथम पूर्वेस साधारण ५०० किलोमीटर व त्यानंतर आग्नेयेस सुमारे ७०० किलोमीटर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळत असे.

दख्खनमधील सर्वात जास्त लांबी असलेली ही नदी असून, तिचे खोरे खचदरी आणि घनदाट जंगलांनी युक्त आहे. गोदावरीचे खोरे साधारणतः समद्विभुज त्रिकोणाच्या आकाराचे असून, गोदावरी मुख्यतः त्या त्रिकोणाच्या पायथ्याशी समांतर वाहताना दिसते. हिच्या खोर्‍यात असलेल्या कोळसा व हिर्‍यांच्या खाणी ही भारताला मिळालेली देणगी आहे. आज दिसणारे गोदावरीचे स्वरूप (१,४६५ किलोमीटर लांबीचे पात्र) तिला मध्य प्लायस्टोसीन काळात (सुमारे सहा ते सात लक्ष वर्षांपूर्वी) प्राप्त झाले. येथे मानवी अस्तित्वाचे पुरावे अश्मयुगापासून उपलब्ध होतात. मध्याश्मयुगीन मानवाला तर पर्यावरणाच्या दृष्टीने संपूर्ण खोरे नंदनवनासारखे होते. गोदावरी खोर्‍याचे भूशास्त्रीय तपशील प्रदीप वेसनेकर यांनी नोंदवले आहेत. गोदावरी खोर्‍यातील जलव्यवस्थापनाचा भाग म्हणून या खोर्‍यात २८६ मोठे व मध्यम प्रकारचे सिंचन प्रकल्प उभारले गेले आहेत.

गोदा संस्कृतीचा आढावा घेताना, तिच्या आसपासच्या गावांचा/शहरांचा सांस्कृतिक इतिहास, तिच्या काठावरील वसाहतींची वैशिष्ट्ये, लोकसाहित्य व परंपरा यांचा आढावा डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतला आहे. गोदा काठावरील यज्ञपरंपरेची नोंद केली गेली आहे. या खोर्‍यातील बौद्ध व जैन परंपरांचा आढावा घेण्यात आला आहे. येथील मंदिर स्थापत्याचा परिचय डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी करून दिला आहे. या खोर्‍यातील विविध धर्म, संप्रदाय, चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर व वारकरी संप्रदाय, भागवत परंपरा व एकनाथ महाराज, रामदासी संप्रदाय, शीख संप्रदाय या प्रमुख व अन्य संप्रदायांचीही ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील कुंभमेळा व पुष्कराळू तसेच या खोर्‍यातील अन्य उत्सव व परंपरांची नोंद केली आहे.

योगी अरविंद यांनी आपल्या ’भारतीय संस्कृतीचा पाया’ या ग्रंथात भारतीयांच्या मनातील मूलभूत संकल्पनांविषयी व्यापक चर्चा करून संस्कृतीची वैशिष्ट्ये, योगदान, यथार्थता यांचा परामर्श घेतला आहे. हे लक्षात घेता, आपण गोदाकाठच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेतो, तेव्हा तेथील संस्कृतीचे सातत्य स्थलकालाच्या आरोह-अवरोहातून सलगपणे प्रवाहित असल्याचे जाणवते. कधी ही गती मंदावली; पण अनंताची ओढ सातत्य टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरली. या अभ्यासानंतर मध्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारे, गोदावरीचे खोरे हे संयोग भूमी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुख्य नदीप्रवाह व तिला मिळणार्‍या महत्त्वाच्या उपनद्या यांच्या काठी असलेली विविध सांस्कृतिक वैशिष्ट्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. या प्रकल्पातून गोदाखोर्‍याचे एकात्म दर्शन होते.

या बृहत् प्रकल्पात गोदाखोर्‍यातील सांस्कृतिक जीवनाचा परिचय करून देताना, गोदा संस्कृतीच्या महावस्त्रातील विविध धाग्यांना स्पर्श केला असून, गोदासंस्कृतीचे विविध पैलू स्पष्ट केले आहेत. या प्रकारे केलेले हे काम निश्चितच साहित्य व संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक बहुमूल्य दस्तऐवज आहे.







मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.