‘बस्तर ः द नक्सल स्टोरी’ डाव्यांच्या लाल षड्यंत्रामागचा क्रूर चेहरा

    23-Mar-2024   
Total Views |
Bastar The Naxal Story


‘बस्तर ः द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट दि. १५ मार्च रोजी प्रदर्शित झाला. नक्षली हिंसा, नक्षलवाद्यांची देशद्रोही, समाजविघातक कृत्ये, नक्षली समर्थक आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे, या षड्यंत्राचा पर्दाफाश करणारा हा चित्रपट. त्यानिमित्ताने या चित्रपटातील वास्तव अधोरेखित करणारा हा लेख...

लोकांना भावनिकरित्या भरकटवण्यासाठी दहशतवाद्यांनी आणि नक्षल्यांनी नवे षड्यंत्र रचले. ते म्हणजे, महामानव डॉ. बाबासाहेबांनी जे म्हटलेच नाही, ते तोडून मोडून समाजाला सांगायचे. यातून समाजाच्या भावना भडकवायच्या आणि स्वार्थ साधायचा. पण, दुर्दैवाने आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात याबाबत उघडपणे वाच्यता झालेली दिसत नाही. मात्र, निर्माता विपुल शहा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या, ’बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटात असलेला एक संवाद हे सत्य अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर मांडतो. चित्रपटात नक्षल्यांविरोधात जनजागरण करणारा, एक सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र कर्मा (किशोर कदम) म्हणतो की, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन, त्यांच्या विचारांच्या विरोधात काम करणारे लोक आहेत.” अशाप्रकारे देशविरोधी अराजक तत्त्वांचे बारकाईने विश्लेषण या चित्रपटात केले आहे, हे या संवादाने ठळक होते.

या देशात ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार‘ म्हणणार्‍या, देशद्रोहींविरोधात कारवाई झाली की, त्यांना लगेच ते सामान्य विद्यार्थी आहेत, असं म्हणायला तथाकथित पुरोगामी लेखक, कलाकार आहेतच. बॉम्बस्फोट करणार्‍यांना शिक्षा होऊ नये, म्हणून हेच लोक सह्यांची मोहीम राबवितात, यातले मानवतावादी कायद्याच्या पळवाटा शोधत गुन्हेगारांना अभय मिळवून देण्यासाठी अगदी जंगजंग पछाडतात. त्यांची ती कृत्ये पाहून आपल्याला असे वाटते की, हे लोक असे का बरं करत असतील? त्याचे नेमके उत्तर हा चित्रपटात सापडते.

या चित्रपटातील खलनायक नक्षलवादी. तो म्हणतो की, ”मीडिया आणि न्यायव्यवस्थेमध्ये आपली माणसं आहेत. ते वाळवीसारखे लोकशाही व्यवस्थेला आणि पर्यायाने देशाला पोखरतात. अर्थात, या मार्गाने सत्ता मिळवणे, हेच त्यांचे उदिष्ट असते.” खलनायक ज्यावेळी हा संवाद म्हणतो, त्यावेळी नक्षल्यांना, दहशतवाद्यांना समर्थन करणारे आणि देशाच्या कल्याणकारी योजनांना विरोध करणारे आपल्या सभोवतालचे याच्याशी निगडित चेहरे आपल्या डोळयासमोर आल्याशिवाय राहत नाही. तसेच या चित्रपटातील सर्व गाणीही अर्थपूर्ण आहेत, हे विशेष.

’बस्तर : द नक्सल स्टोरी’ चित्रपट हा चित्रपट दि. १५ मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्तीसगढमधील नक्षल्यांचे थैमान, हिंसा, अत्याचार आणि त्यावर झालेली कायदेशीर कारवाई अशी एकंदर कथा मोठ्या पडद्यावर दाखवली आहे. आज २०२४ साल; पण हा चित्रपट २०१० सालच्या एका घटनेसभोवती फिरतो. गावात १५ ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा फडकावला म्हणून मिलिंद कश्यप (सुब्रत दत्ता) यांचा निर्घृण खून, लंका रेड्डी (विजय कृष्णा) हा नक्षली करतो. कारण काय तर, या नक्षल्यांच्या मते बस्तरवर देशाचे राज्य नाही, तर नक्षल्यांची सत्ता आहे. बस्तर स्वतंत्र देश आहे. तिथे भारताचा झेंडा फडकवणे हा गुन्हा आहे, असा त्यांचा अविचार. मिलिंद कश्यप याचा खून त्याची पत्नी तारा (इंदिरा तिवारी) तसेच त्यांच्या मुलीसमोर गाववाल्यांसमोर केला जातो. क्रूरपणे त्याचे ३२ तुकडे केले जातात. ताराच्या मुलाला नक्षली घेऊन जातात. नक्षल्यांची आक्रमकता, पाशवी सत्ता पाहून मिलिंद कश्यप आणि तारा यांचा मुलगा रमण नक्षल्यांकडे आकर्षित होतो. पुढे तारा ही लंका रेड्डी या नक्षल्याला संपवण्यासाठी सज्ज होते. त्यासाठी तिला पोलीस ऑफिसर निरजा माधवन (अदा शर्मा) प्रेरणा देते आणि सहकार्य करते. निरजा माधवनची नक्षलविरोधी लढाई पाहण्यासारखीच. शेवटी तारा निरजा माधवनच्या मदतीने लंका रेड्डीचा खातमा करते आणि मुलाला परत घरी आणते.

मात्र, मिलिंद कश्यपचा खून ते लंका रेड्डीचा वध, यामध्ये जे काही या कथानकात घडते ते म्हणजे नक्षल्यांच्या हिंसक, विकृत देशविघातक कृत्याचा अंगावर काटा आणणारा अनुभवच आहे. कधी कुर्‍हाडीने, कोयत्याने, बंदुकीच्या गोळ्यांनी, बॉम्बने, किड्यामुंग्यांसारखी मारली जाणारी माणसं पाहून अनेकदा डोळे दुःखाने, संतापाने मिटतात. एका दृश्यात तर नक्षली पूर्ण गाव जाळतात, तेव्हा एक बाळ वाचते. ते रडते तेव्हा नक्षली त्या बाळाला चक्क आगीत फेकतात. हे दृश्य दाखवण्याची गरज होती का? असे कधी कोणी करेल का? असेही प्रश्न अनेकांना पडले. पण, नक्षलग्रस्त भागातील पीडितांना विचारा, ते सांगतील की, हे दृश्य म्हणजे हिमनगाचे टोक. याहीपेक्षा भयंकर विकृत हिंसा नक्षल्यांनी केल्या आहेत आणि हे सगळे केवळ लोकांमध्ये दहशत पसरावी म्हणून...

असो. ही नक्षली चळवळ फक्त देशाच्या विशिष्ट भागातच का फोफावली? छत्तीसगढ, झारखंड, पुढे महाराष्ट्र सोडून कर्नाटकचा काही भाग इथेच नक्षलवादी का आढळतात? तर याबद्दल चित्रपटात स्पष्ट केले की, जिथेे विपुलतेने खनिज संपत्ती उपलब्ध आहे, तिथे ती संपत्ती लुटण्यासाठी नक्षलवाद्यांनी हिंसा केली. तसेच तिथल्या स्थानिक नागरिकांना रस्ते, वीज आणि इतर कोणत्याही प्रशासकीय सुविधा मिळू नये, यासाठीही नक्षल्यांनी हिंसा केली. खनिज संपत्ती असलेल्या या भूभागातील लोकांचा, त्या भूभागाबाहेरील लोकांशी संपर्क तोडण्यासाठी नक्षली सक्रिय असतात. बाहेरच्या जगाशी संपर्कच झालाच नाही, तर या नागरिकांसोबत काय घडते, हे बाहेर कळणार नाही, असे नक्षल्यांचे मत. गेली अनेक वर्षे हे सगळे करण्यात, ते यशस्वी ठरले, हे सगळे या चित्रपटात मांडले आहे. इतकेच काय तर सत्ताधारी राजकारणी नक्षलवाद्यांना संपवण्यास उत्सुक का नसतात? या प्रश्नाचे उत्तरही या चित्रपटात सापडते. चित्रपटातली नायिका नीरजा माधवन भ्रष्ट राजकीय नेत्याला म्हणते की, ”अशांत असलेल्या राज्यांमध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून उपाययोजनेसाठी केंद्र सरकार कोट्यवधींचा मदतनिधी पाठवते. त्याचा काटेकोर हिशोब द्यावा लागत नाही. बस्तर जर शांत झाले, तर हा निधी मिळणार नाही, म्हणून नक्षली पोसले जातात.”

असा हा चित्रपट ’स्त्रीप्रधान’ म्हणायला हवा. कारण, नक्षल्यांविरोधात बस्तरमध्ये प्रामाणिकपणे लढणारी पोलीस ऑफिसर आहे नीरजा माधवन. ही भूमिका यशायोग्य साकारली ती अदा शर्माने. नक्षली लंका रेड्डी याला संपवण्याची शपथ घेतलेली स्पेशल पोलीस ऑफिसर आहे तारा म्हणजे इंदिरा तिवारी.इतकेच काय, नक्षल्यांमध्ये भयंकर उत्पात आणि हिंसा करणार्‍यांमध्ये महिला नक्षलीच दाखवले आहेत. ज्याला आपण ‘शहरी नक्षलवादी’ म्हणू शकतो, अशा ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्यामध्येही महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, नक्षल्यांचे समर्थन करणारी महिला वकील शिल्पा शुक्ला आणि वान्या रॉय नावाच्या नक्षल्यांचे समर्थक असलेल्या लेखिकेची भूमिका साकारली आहे, ती रायमा सेन यांनी.

या सगळ्यांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्यांचे दिसणे, वागणे, बोलणे बस्तर परिसरातले वाटते. अजून एक महत्त्वाचे म्हणजे, आजकाल देशात, समाजात फूट पाडणारे लोक स्वतःला ‘लंकेश’, ‘लंकापती’, ‘लंका’ वगैरे उपाधी लावतात. ते रावणाला आपला बाप मानतात. प्रभू श्रीरामचंद्रांना विरोध करतात. हे आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटातील खलनायकाचे नाव आहे-कॉमरेड लंका रेड्डी.

नक्षल्यांमुळे नागरिकांचे विस्कळीत झालेले, जनजीवन ’बस्तर : द नक्सल स्टोरी’ चित्रपटात दाखवले आहे. मात्र, हे दाखवताना बस्तर आणि छत्तीसगढमधील भोळ्या वनवासी बांधवांचे धर्मांतरण दाखवणेही तितकेच गरजेचे होते. कारण, पूर्वी छत्तीससगढ काय किंवा झारखंड काय, येथील नक्षलबहुल परिसरात प्रशासकीय यंत्रणा किवा पोलिसांसकट बाहेरील सामान्य माणूस सुखासुखी जाऊ शकत नव्हता. मात्र, येशूचे माहात्म्य सांगायला फादर आणि नन्स जाऊ शकत होते. त्यांना नक्षल्यांनी कधीच विरोध केला नाही. म्हणूनच ये रिश्ता क्या केहलाता हैं? असा प्रश्न पडतो. या मुद्द्यावरही या चित्रपटात कुठे तरी प्रकाश टाकणे गरजेचे होते, असे वाटते. दुसरे असे की, नक्षली काय हिंसाच करतात? गावातल्या लेकी-सुना या नक्षल्यांपासून सुरक्षित असतात का? याबद्दलही चित्रपटात भाष्य करता आले असते. तसेच बस्तरचे जनजीवन, परंपरा यांबाबतचे वास्तव दाखवून चित्रपट आणखीन अर्थपूर्ण होऊ शकला असता. बाकी तांत्रिकदृष्ट्या म्हणायचे, तर चित्रपटातली बहुसंख्य दृश्ये ही अंधार्‍या पार्श्वभूमीवर आहेत. अनेकदा कोण कोणाला मारतो, हे कळतच नाही.

असे जरी असले तरीसुद्धा माओचे स्वप्न पूर्ण होण्याच्या वल्गना करणार्‍या, हिंसेचा क्रूर नंगानाच करणार्‍या नक्षल्यांचे वास्तव स्वरूप ’बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटात यशस्वीपणे दिग्दर्शकांनी उभे केले आहे. नक्षल्यांची विकृत हिंसक मानसिकता, समाजविघातक आणि तितकीच देशविघातक वृत्ती अगदी सडेतोडपणे ’बस्तर : द नक्सल स्टोरी’ चित्रपटात मांडण्यात आली आहे. चिनी माओच्या काळातली हुकूमशाही आणून, देशावर सत्ता प्रस्थापित करण्याचे जंगलातल्या नक्षल्यांचे आणि त्यांच्या शहरी नक्षलवाद्यांचे लाल स्वप्न. त्यासाठी त्यांचे डावपेच काय असतात? ते कशाप्रकारे षड्यंत्र रचतात? त्यांना मदत कोण करते? ते कोणत्या विचारांवर काम करतात, हे सगळे दाखवण्यात ’बस्तर : द नक्सल स्टोरी’ चित्रपट यशस्वी ठरला आहे.

आपण हा चित्रपट का पाहावा, तर नक्षली, दहशतवादी, आंतरराष्ट्रीय देशविरोधी शक्ती आपल्या देशाला अस्थिर करण्यासाठी काय-काय षड्यंत्र रचतात, हे या चित्रपटातून सामान्यांनाही लक्षात येईल. तसेच चित्रपटामध्ये शेवटी सध्या २०२३-२४ साली नक्षलग्रस्त परिसरात काय सकारात्मक बदल घडले, हे दाखवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आत्मविश्वास येतो. जाणीव होते की, देशविरोधी शक्ती कितीही मोठी असली, तरी जनता आणि प्रशासन तसेच प्रामाणिक नेता एकत्र येत, त्या शक्तीला उखडून फेकू शकतो. हा विश्वास, ही जाणीव देणारा ’बस्तर : द नक्सल स्टोरी’ हा चित्रपट म्हणूनच चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा असाच!


९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.