गॅस सिलेंडर, शिट्टी की रोड रोलर? वंचितला कोणते चिन्ह मिळणार?

22 Mar 2024 15:52:30
vba

मुंबई : लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत चिन्ह काय असावे, यासंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीकडुन गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
 
२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना "कपबशी" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना किल्ली, शिट्टी व पतंग ही चिन्हे दिली होती. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले होते.
 
 हे वाचलत का ?-  गोविंदा करणार शिवसेनेत प्रवेश? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट 'या' मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!
 
या निवडणुकीत ही गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तत्पुर्वी वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्या जागांवरुन निवडणुक लढवणार यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरु आहे.
 
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी केली होती. पण महाविकास आघाडीने वंचितला ४ जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी निर्णय दिलेला नाही पण संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरांनी एकमेकांवर केलेल्या टिकेवरुन लक्षात येईल की वंचितची महाविकास आघाडीत येण्याची चिन्हे धुसर झाली आहेत. त्यामुळे वंचित किती आणि कोणकोणत्या जागांवर निवडणुक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0