संकल्प निसर्गस्नेही होळी आणि रंगपंचमीचा!

    22-Mar-2024
Total Views |
Holi Festival Eco friendly


उद्याच्या होळीचा आणि सोमवारी धूलिवंदनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल. त्यानिमित्ताने होळी असेल अथवा धूलिवंदन हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने कसे साजरे करता येतील, याचा प्रत्येकाने विचार करणे ही खरं तर काळाची गरज. हे नेमके कसे करता येईल, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...

आपल्या देशात ऋतूनुसार सण साजरे केले जातात आणि प्रत्येक सणामागे काही विशिष्ट आख्यायिका प्रचलित आहेत. दिवाळी, होळी यांसारख्या विविध सणांची पाळेमुळे श्रीमद्भागवत या धर्मग्रंथामध्येही सापडतात. भारतामध्ये फाल्गुन महिन्यामध्ये धुमधडाक्यात साजरा केला जाणारा ’होळी’ हा एक महत्त्वाचा सण. सुष्ट शक्तींनी दुष्ट शक्तींवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून फाल्गुन पौर्णिमेला, होळी हा सण साजरा केला जातो.त्यानंतर येणार्‍या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. भारतातील अनेक प्रांतांमध्ये होळी व रंगपंचमी हे सण, रंग खेळून साजरे करण्याची प्रथा आहे. परंतु, जमीन-हवा-पाणी येथे प्रदूषणाने उच्चतम पातळी कधीच गाठली आहे. पर्यावरणीय असमतोल निर्माण झाल्याने निसर्गाचा र्‍हास अटळ आहे.


सर्वत्र प्रदूषणाच्या जटील प्रश्नाने डोके वर काढले असल्याने त्यावर उपाय शोधून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भूमिकेतून स्वतःच्या घराबरोबरच, घराबाहेरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी उपाय म्हणून सर्वप्रथम विषमुक्त जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. विषमुक्त जीवनशैली जगण्याकरिता दैनंदिन जीवनात योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. तसेच सणवारदेखील पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले पाहिजेत. तेव्हा होळी व रंगपंचमीबद्दल पर्यावरणास पूरक आणि मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असलेल्या पद्धतींचा विचार करूया.

होळी पेटवण्याची पर्यावरणपूरक पद्धत

होळीच्या दिवशी सूर्यास्तानंतर होळी पेटवून होलिकोत्सव साजरा केला जातो. परंतु, होळी पेटवण्यासाठी उघडपणे किंवा चोरटी वृक्षतोड केली जाते, ती प्रथम पूर्णपणे थांबवावी. तसेच होळी पेटवण्यासाठी रॉकेल किंवा केरोसीनचा वापर पूर्णपणे टाळावा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अलीकडे होळी पेटवल्यावर त्यात फटाके फोडण्याची नवी प्रथा काही जणांनी सुरू केली आहे. हे सर्व प्रकार आपल्या आरोग्यास व पर्यावरणास घातक असून निसर्गाचा र्‍हास करणारे आहेत, अशा होळीतून निघणारा धूर वातावरण दूषित करतो.

मग पर्यावरणपूरक होळी कशी पेटवावी? तर होळी पेटवण्याची पर्यावरणपूरक पद्धत कोणती हे येथे जाणून घेऊया.

- होळीतील प्रमुख घटक म्हणून लाकडाऐवजी गाईच्या शेणाच्या गोवर्‍या वापराव्यात.

- होळी पेटवण्यासाठी गोवर्‍या रचून झाल्यावर त्यामध्ये गाईचे तूप किंवा घाण्याचे तेल टाकावे.

- होळी पेटवल्यावर त्यात भीमसेनी कापूर टाकावा.

- ओवा, तुळस, पुदिना अशा औषधी वनस्पतींची पाने टाकावीत. पाने मिळाली नाहीत, तर या प्रत्येक घटकाची आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातून पावडर आणून त्यात टाकावी.

- आवश्यक वाटल्यास काँक्रीटच्या रस्त्यावर पडलेली झाडांची वाळकी पाने व काटक्या वापरल्या तरी चालतील. परंतु, झाडांखाली गळून पडलेली वाळकी पाने, काटक्या मात्र तिथून गोळा करून वापरू नये. कारण, ते त्या झाडांचे निसर्गाने तयार केलेले खत व संरक्षणासाठी नैसर्गिक आच्छादन असते.

- पर्यावरणपूरक पदार्थ वापरून पेटवलेली होळी सर्व दृष्टीने सुरक्षित असते, अशा होळीच्या राखेतून कॅल्शियम कार्बोनेट (कर्ब), पोटॅशियम (पोटॅश) तयार होतो जो जमिनीसाठी उपयुक्त ठरतो. अशा होळीची राख बागेतील, शेतातील झाडांच्या मुळांशी घालता येते. ही राख पाणवठ्यात मिसळली गेली, तरी पाण्याचे शुद्धीकरणच होते. शिवाय ही शुद्ध राख घरात कडेकडेने उधळता येते. या राखेने स्वयंपाकघरातील भांडीदेखील घासता येतात.

कृत्रिम रंगांनी होळी खेळणे का टाळावे?

कृत्रिम रंग वापरून होळी व रंगपंचमी खेळणे हे प्रदूषणात वाढ करणारे आहे. या कृत्रिम रंगांमध्ये विषारी रसायने असतात. त्यामुळे कृत्रिम रंग हे पर्यावरणास घातक तर असतातच; शिवाय आपल्या आरोग्यासदेखील हे रंग हानिकारक ठरतात.

पूर्वी होळी व रंगपंचमीला वनस्पतींची साल, मूळ, पाने, फुले व फळे इत्यादी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरले जात. कालांतराने या नैसर्गिक रंगांची जागा सिलिका, ऍस्बेस्टोस, जेन्शियन व्हायोलेट, कॉपर सल्फेट, अल्युमिनियम ब्रोमाईड, मर्क्युरी सल्फाईट यांसारखी आपल्या आरोग्यास हानिकारक ठरणारी रसायने घातलेल्या कृत्रिम रंगांनी घेतली.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अशा घातक असलेल्या कृत्रिम रंगांनी होळी व रंगपंचमी खेळल्यास बाहेरील इतर रासायनिक कचर्‍यासारखे हे विषारी रंगदेखील सांडपाण्यातून शेवटी आपल्या नदीत जाऊन मिसळतात. मग जीवनदायिनी नदीच्या अशा मानवनिर्मित प्रदूषित पाण्यातून आपल्याच पोटात परत हे विष जाते. निसर्गात चक्रीय व्यवस्था सदैव कार्यरत असते म्हणजे निसर्गात जे आपण निर्माण करतो, निसर्गाला जे आपण देतो तेच परत उलटे आपल्याकडे येत असते. याचे कारण म्हणजे पृथ्वीवरून कोणतीही गोष्ट पृथ्वी बाहेर जाण्याचा मार्ग अस्तित्वात नाही. त्यामुळे आपण जर निसर्गात विष निर्माण करून टाकले, तर ते विष परत आपल्याच शरीरात जात असते. कारण, विष-आत जाणे विष-बाहेर येणे (ढेुळपीरळप ढेुळपीर्रेीीं) असे विषारी चक्रदेखील अव्याहतपणे सुरूच राहते. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून आत्ताच शाश्वत उपाय शोधून ते उपाय त्वरित अंमलात आणण्याची आत्यंतिक गरज आहे.

सर्वप्रथम, कृत्रिम रासायनिक रंगांनी होळी व रंगपंचमी खेळणे बंद केले पाहिजे. अशा रंगांनी होणारे हवा-पाणी-जमिनीचे प्रदूषण टाळण्याकरिता होळी व रंगपंचमी हे सण रंग खेळून साजरे करण्याची प्रथा मोडणे हा एक प्रभावी शाश्वत उपाय ठरू शकतो. होळी व रंगपंचमी हे सण ऐन वसंत ऋतुमध्ये फाल्गुन महिन्यात येतात. ज्यावेळी खुद्द निसर्गातच रंगपंचमीचा अद्भुत खेळ सुरू असतो. या काळात निसर्गात जणू उत्तरोत्तर रंगत जाणारी रंग-गंध-नादाची बहारदार ’ऋतुराज मैफल’च साकार होते. या काळात कोकीळ, दयाळ, नाचण, हळद्या, बुलबूल, सुभग, कस्तुर, शामा यांसारख्या गोड गाणार्‍या पक्ष्यांच्या मैफिलींवर मैफीली झडताना दिसून येतात. याच सुमारास काटेसावर, पळस, पांगारा, गणेर, ताह्मण, अंजनी, वारस, कांचन, शिरीष अशा अस्सल देशी वृक्षांना बहर येतो. त्यांचे अप्रतिम पुष्पवैभव डोळ्यांनी न्याहाळणे हा एक बिनखर्चाचा अवर्णनीय आनंद असतो. नुसतेच पुष्पवैभव नाही, तर या सुमारास कुसुंब, पिंपळ, पिंपर्णी, टेंबुर्णी अशा देशी वृक्षांवर लालसर नवपालवी उगवते. तेव्हा तर या वृक्षांचा पर्णसंभार अगदी बघत राहावा असा लाजवाब दिसतो. अधिकाधिक लोकांनी वसंत ऋतूमध्ये निसर्ग मुक्तहस्ते जादुई रंगांची ही जी उधळण करत असतो तिचा नेत्रांनी मनमुराद आस्वाद घेत, हीच होळी व रंगपंचमी मानल्यास निसर्गाचा र्‍हास नक्कीच टाळला जाऊन मनास निखळ आनंद प्राप्त होईल. निसर्गात भटकंती केल्याने निसर्गाशी खरी मैत्री होईल. एकदा का निसर्गाशी सहजसुंदर भावनिक नाते निर्माण झाले, की निसर्गाची जपणूक करावी, अशी भावना मनात आपसूकच निर्माण होईल.

होळी व रंगपंचमीला रंग खेळावेसे वाटलेच, तर पर्यावरणस्नेही पर्याय म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करणे. कारण, नैसर्गिक रंग घराच्या सांडपाण्यातून अगदी नदीत जाऊन मिसळले गेले तरीदेखील काही अपाय होत नाही. त्यामुळे आपली जीवनदायिनी अजिबात प्रदूषित होत नाही. हे नैसर्गिक रंग उधळल्यावर हवेत जरी पसरले तरी त्यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी पोहोचत नाही. तसेच हे रंग जमिनीत शोषले गेले तरीही जमिनीस काही धोका नाही. शिवाय निसर्गपूरक रंग वापरल्याने आपल्या शरीरास कोणतीही इजा पोहोचत नाही. उलट अशा रंगांनी होळी खेळल्यास आरोग्याची हानी न होता झाला, तर फायदाच होतो.



आता खेळण्यासाठी पर्यावरणपूरक असलेले काही नैसर्गिक रंग कसे तयार करायचे, हे येथे आपण जाणून घेऊया.


(१) तांबडा रंग गेरूची पावडर आणि मैदा यांचे समान प्रमाण घेऊन एकत्र मिश्रण करावे. रंग खेळायच्या आधी हे मिश्रण कोमट पाण्यात घालावे व ते तांबूस पाणी थंड झाल्यावर रंग म्हणून वापरावे.

(२) पिवळा रंग पिवळा झेंडू, बहावा, टाकळा, बाभुळ यांमधील सहज उपलब्ध होतील. ती फुले गोळा करून त्यांचा लगदा करावा. तो पाण्यात उकळवून घ्यावा. पिवळ्या रंगाचे पाणी तयार होते.

(३) गुलाबी रंग
(अ) मायाळूची फळे कुस्करून पाण्यात उकळवून घ्यावीत. गुलाबी रंगाचे पाणी तयार होते.

(ब) बीट किसून ते पाण्यात घातल्यावर गडद गुलाबी रंग तयार होतो.
(४) हिरवा रंग

गुलमोहोराची पाने, मेहंदीची पाने, गव्हाचे कोंब, दुर्वा, पालक, शेवग्याची पाने, हिरव्या पालेभाज्यांचे देठ, मटारची साले यांपैकी जे साहित्य उपलब्ध असेल त्याचा मिक्सरमधून लगदा तयार करणे. तो लगदा पाण्यात घालून थोडा उकळणे व गाळून ते हिरवे पाणी वापरणे.
(५) राखाडी रंग
कॉफी बियांची पावडर करून पाण्यामध्ये घालून उकळावी. राखाडी रंगाचे पाणी तयार होते.

(६) निळा रंग
अ) नीलमोहोर किंवा निळा गोकर्ण ही फुले पाण्यात उकळवून घ्यावीत. निळे पाणी रंग म्हणून वापरावे.

ब) लाल कोबी कापून पाण्यात उकळल्यावर निळा रंग मिळतो.

(७) केशरी रंग

(अ) पळसाची फुले किंवा पारिजातकाचे देठ रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवावेत. दुसर्‍या दिवशी ते केशरी पाणी गाळून घ्यावे.

(ब) केशराच्या काड्या पाण्यात घालून ते पाणी उकळावे. सुंदर, सुवासिक केशरी रंग तयार होतो. हा रंग कोरडा व दाट करण्यासाठी त्यात बेकिंग सोडा घालावा.

अशाप्रकारे फुले, फळे, भाजीपाला यांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक रंगांमुळे त्वचेस कोणताही धोका नसून हे रंग डोळे, कान, नाक व तोंडात जरी गेले तरी त्यामुळे आरोग्यास कोणतीही हानी पोहोचत नाही. कोणत्याही वयोगटातील मुलं अशा नैसर्गिक रंगांनी सुरक्षित होळी व रंगपंचमी खेळू शकतात.

निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करत थोडी कल्पकता व प्रयोगशीलता अंगी बाळगल्यास आपण आपल्या घरीच असे वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करू शकतो.
 
चला तर मग पर्यावरणपूरक रंग वापरून विषमुक्त रंगोत्सव साजरा करू या!

प्रिया फुलंब्रीकर
(लेखिका ‘ग्रीन बर्ड्स अभियाना’च्या संस्थापक असून ‘जीवितनदी’ संस्थेच्या संस्थापक- सदस्य आहेत.)