'जेएनयू'चा परिसर 'भारत माता की जय'च्या जयघोषाने दुमदुमला

20 Mar 2024 16:24:48
जेएनयूमध्ये छात्र संघाच्या निवडणुका (JNUSU Election) येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रचाराचा एक भाग म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून भव्य मशाल पदयात्रा काढण्यात आली. यावेळी १५०० हून अधिक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

JNUSU ABVP

नवी दिल्ली :
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छात्र संघाच्या निवडणुका सध्या येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा एक भाग म्हणून मंगळवार, दि. १९ मार्च रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मशाल पदयात्रा काढण्यात आला. यात २००० हून अधिक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'च्या जयघोषात जेएनयू परिसर दणाणून गेला होता.

अभाविपचे छात्र संघाच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार उमेशचंद्र अजमिरा, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार दीपिका शर्मा, सचिव पदाचे उमेदवार अर्जुन आनंद, सहसचिव पदाचे उमेदवार गोविंद डांगी यांच्या नेतृत्वाखाली जेएनयूच्या गंगा ढाब्यापासून ते चंद्रभागा वसतिगृहापर्यंत मशाल पदयात्रा काढण्यात आली होती.

हे वाचलंत का? : "रोहिंग्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही"; मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात स्पष्ट भूमिका

अभाविपने जेएनयू छात्र संघाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सह सचिव या पदांसाठी आपल्या उमेदवारांची नावे नुकतीच जाहीर केल्यानंतर यांच्या व्यतिरिक्त ४२ समुपदेशकांच्या पदांसाठीही काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. २० मार्च रोजी प्रेसिडेंशिअल डिबेट होणार असून २२ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

अभाविपचे जेएनयू युनिटचे सचिव विकास पटेल म्हणाले की, "जेएनयूमध्ये निघालेल्या भव्य मशाल पदयात्रेत जमलेल्या गर्दीतून हे स्पष्ट झाले आहे की जेएनयूमधून डाव्यांचा नायनाट होणार आहे आणि जेएनयू छात्र संघाच्या निवडणुकीत चारही जागांवर विद्यार्थी परिषद ताकदीनिशी उतरणार आहे."
Powered By Sangraha 9.0