मर्कटलीलांचे थैमान

    02-Mar-2024
Total Views |
Monkey


भारतात माकडांच्या ११ प्रजाती आढळतात. त्यामधील ‘लाल तोंडा’चे माकड ही प्रजात बहुसंख्येने आढळते. त्याला ‘टोपी माकड’ असेही म्हणतात. झाडांची फळे आणि मुळे हे त्यांचे मुख्य खाद्य असते. शहरात आले की, ते आपल्या घरात जे मिळेल ते खातात. विशेषतः वाळवणं, फळं, हे त्यांना विशेष प्रिय असते. माकडे वनात लाजाळू असतात आणि शहरात आल्यावर आक्रमक होतात. वानरांच्या आहारात मुख्यतः अनेक वनस्पतींची फळे, पाने, कळ्या, फुले आणि झाडांची साल व खोड यांचा समावेश असतो.

वानरांविषयी झालेल्या अभ्यासात पश्चिम घाटात आढळणार्‍या १२६ सपुष्प वनस्पतींपैकी ९४ वनस्पतींचा समावेश आहे. आहारात इतकी विविधता असूनही, त्यांनी खाद्यासाठी मानवी वस्तीकडे केलेले मार्गक्रमण हे निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलाकडे, वृक्षतोड आणि एकसुरी पद्धतीच्या लागवडीकडे लक्ष वेधते. वानर आणि माकडांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी अनेक उपाय योजत असतात. कुत्रे पाळणे, अनेक प्रकारचे आवाज करणे, बेचकीसारखी हत्यारे वापरणे असे नानाविध उपाय करूनदेखील हा संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत. कोकणातील शेतकरी माकडांना हुसकावण्यासाठी, अनेक देशी क्लृप्त्या करतात. यामध्ये छर्‍याच्या बंदुकीचा वापर होत असला, तरी त्या पर्याय म्हणून आता बाजारात कॅल्शियम कार्बाईडच्या बंदुका मिळत आहेत. धार्मिक भावना आणि वन्यजीव कायद्याचे संरक्षण यांमुळे माकडांचा उपद्रव वाढत आहेत, हे नक्की; परंतु निर्बीजीकरण आणि स्थानिक स्वरुपाचे स्थानांतरण असे तात्कालिक उपाय काही ठिकाणी केले जात आहेत. एकंदरीत तात्कालिक उपाय करत असतानाच, वानरांचा समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधणे आता क्रमप्राप्त बनले आहे.

प्रतीक मोरे
वन्यजीव निरीक्षक, देवरुख