‘आर्टिकल ३७०’चा ७५ वर्षांचा इतिहास!

Total Views |
article 370 movie review

दि. ५ ऑगस्ट २०१९ हा सर्व भारतीयांसाठीच सोनेरी दिवस ठरला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारतर्फे घेण्यात आला. १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, देशाला अनेकविध आव्हानांचा सामना करावा लागला. यामध्ये तत्कालीन राजकीय नेतृत्वाकडून काही चुकादेखील झाल्या. त्यापैकीच एक मोठी, घोडचूक म्हणजे ‘कलम ३७०.’

‘कलम ३७०’मुळे भारताचे अभिन्न अंग आणि भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्‍या जम्मू-काश्मीरला भारतापासून मुद्दाम विलग ठेवण्याचे पद्धतशीर षड्यंत्र आखले गेले. मग प्रश्न निर्माण होतो की, काश्मीरला देशापासून वेगळं पाडणारं ‘कलम ३७०’ का लागू केले गेले? काय होते हे ‘कलम ३७०’? आणि ते कशाप्रकारे रद्द केले गेले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, याचा संदर्भासहीत इतिहास प्रेक्षकांना आदित्य धर निर्मित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात पाहता येणार आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचाही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.मोदी सरकारने ‘कलम ३७०’ जम्मू-काश्मीरमधून हटवल्यानंतर राजकीय, सामाजिक, संविधानिक असे अनेक बदलांची गंगा तिथे प्रवाहित झाली आणि या सगळ्या स्थित्यंतराचे वास्तवदर्शी आणि पुराव्यानिशी सादरीकरण करण्यात दिग्दर्शक-लेखकांना यश आले आहे. ‘कलम ३७०’ लागू केल्यापासून जम्मू-काश्मीरमधील नागरिकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक हाल-बेहाल कसे झाले, याची संवेदनशीलता चित्रपटाच्या कथेतून उत्तमरित्या कथन करण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रारंभापासून ते अगदी शेवटापर्यंत प्रेक्षकांना ही कथा कुठेही रटाळवाणी वाटणार नाही, याची विशेष काळजी दिग्दर्शकांनी प्रकर्षाने घेतलेली जाणवते.

बरेचदा काही चित्रपटांची सुरुवात ही शेवटाला जोडणारी असते. परंतु, सादरीकरणात अशाप्रकारे काही घटना एकमेकांशी जोडण्याच्या नादात लेखक-दिग्दर्शक काही दुवे हरवून बसतात. परंतु, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या बाबतीत सर्व घटना आणि त्यांचा संदर्भ अगदी अचूकरित्या एका धाग्यात गुंफलेला दिसतो.सामान्य प्रेक्षकांनी ‘आर्टिकल ३७०’ हटवण्याच्या आधीपासूनच काश्मीरमध्ये घडणार्‍या घडामोडींची माहिती वृत्तपत्रांतून वाचली असेल, वृत्तवाहिन्यांवर वेळोवेळी पाहिलीही असेल. परंतु, ‘कलम ३७०’ हटवण्याच्या तीन-चार वर्षांआधीपासून काश्मीरमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या, त्यांचा दुवा आणि सरकारची ‘कलम ३७०’ हटवण्याची योजना यांचा कसा संयोग होता, हे या चित्रपटाने व्यवस्थित उलगडून दाखविले आहे. त्यामुळे काश्मीर समस्येविषयी अगदी खोलवर माहिती नसलेला प्रेक्षकवर्गही या चित्रपटाशी जोडला जाईल. ‘कलम ३७०’ हटवण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री यांची कामगिरी मोलाचीच. परंतु, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या निमित्ताने या कथेतील खरे पडद्यामागील कलाकार म्हणजे, भारतीय गुप्तहेर संस्था, भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस दल आणि दिल्लीतील प्रशासकीय अधिकार्‍यांनी जी रणनीती आखली, त्याची अंमलबजावणी केली, त्याची यशोगाथाही यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर आली. म्हणूनच खर्‍या अर्थाने हा चित्रपट पडद्यामागील नायकांना न्याय देतो.

कमीत कमी अ‍ॅक्शन सिक्वेन्स आणि गाणी चित्रपटाचा संवेदनशील विषय कुठेही भरकटवत नाहीत. चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी दिग्दर्शकाला ते कथानक मांडण्यासाठी काहीअंशी चित्रीकरण स्वातंत्र्य हे घ्यावे लागतेच. पण, या चित्रपटाच्या बाबतीत कुठेही अतिशयोक्ती न करता, केवळ विषयालाच केंद्रस्थानी ठेवून, त्याभोवतीच कथामांडणी करुन प्रेक्षकांना चित्रपटात गुंतवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. देशहिताशी निगडित कोणत्याही विषयाची मांडणी मनोरंजनातील विविध माध्यमांतून सादर करताना, संशोधन हे फार महत्त्वाचे. या चित्रपटाच्या बाबतीत सत्य घटना, कायदेशीर बाबी, संविधानिक तरतुदी या सगळ्यांचे काटेकोरपणे संशोधन करून, कथानकाचा पाया मजबूत करण्यात आला आहे.चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल भाष्य करायचे झाल्यास, अभिनेत्री यामी गौतम, प्रिया मणि आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी यांनी उत्तम अभिनय केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका करणारे अभिनेते अरूण गोविल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका करणारे अभिनेते किरण करमरकर यांचा अभिनय अधिक उत्तम होऊ शकला असता, असे वाटते.

याशिवाय चित्रपटातील संगीत हेदेखील कथेला पुरेपूर न्याय देणारे. चित्रपटातील गाण्यांमुळे कुठेही चित्रपटाची कथा थांबत नाही, तर गाण्यांतूनच ही कथा पुढे सरकत जाते. चित्रपट ज्यावेळी सुरू होतो, त्यावेळी रंगसंगती ही थोडीशी काळ्या रंगाकडे झुकणारी दिसते; मात्र जशी कथा सकारात्मक दिशेला वळत घेत जाते, तशी रंगांची छटादेखील अधिकाधिक खुलत जाते. यासाठी एडिटर आणि सिनेमेटोग्राफर यांचे विशेष कौतुक.या चित्रपटाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ‘कलम ३७०’चा इतिहास. त्या काळातील नेतृत्वाची त्यामागची भूमिका ते दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी ‘कलम ३७०’ हटवण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय, हा एकूण ७५ वर्षांचा कालखंड अडीच तासांत मोठ्या पडद्यावर मांडण्यात संपूर्ण टीम यशस्वी ठरली आहे. जम्मू-काश्मीरचा इतिहास जाणून घेण्यासाठी मनोरंजक पद्धतीने, पण वास्तवाशी जोडून ठेवणारा, हा चित्रपट, प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असाच.

चित्रपट : आर्टिकल ३७०
दिग्दर्शक : आदित्य जांभले
कलाकार : यामी गौतम, प्रिया मणी, वैभव तत्त्ववादी, अरूण गोविल, किरण करमरकर
रेटिंग : ****
 
श्रेयश खरात  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.