बंगळुरूतील कॅफे स्फोटप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

02 Mar 2024 12:44:13
Rameshwaram Cafe Bomb Blast
 
नवी दिल्ली : देशातील आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू बॉम्बस्फोटाने हादरले आहे. बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, दि. ०१ मार्च रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोटासारखी धक्कादायक घटना घडली होती. या बॉम्बस्फोटात १० जण जखमी झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सदर प्रकरणात तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, २८ ते ३० वयोगटातील व्यक्ती रवा इडली खाण्याच्या बहाण्याने कॅफेमध्ये आला होता. संशयिताने कॅफे काऊंटरवर टोकण घेतले. त्यानंतर त्याने आपल्या जागी बॅग ठेवली आणि निघून गेला. या बॅगेत बॉम्ब असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून संशयिताचे छायाचित्र मिळवत त्याला अटक केली आहे.

सदर बॉम्बस्फोट टायमर यंत्राद्वारे झाल्याचा संशय असून आता या घटनेचे काही प्रत्यक्षदर्शी पुढे आले आहेत, ज्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. पोलिसांनी या तपासात एक पाऊल पुढे टाकत अज्ञातांविरुद्ध (युएपीए) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा बॉम्बस्फोट कमी तीव्रतेचा आईडी स्फोट होता. यात ९ जण जखमी असून एक महिला ४० टक्के भाजली आहे. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.  
 
कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रामेश्वर कॅफेला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी बॉम्बस्फोट प्रकरणावर सांगितले की, २८ ते ३० वयोगटातील हल्लेखोर रवा इडली खाण्याच्या बहाण्याने कॅफेमध्ये आला होता. काउंटरवर टोकन घेतले, बॅग ठेवली आणि निघून गेला. या बॅगेत बॉम्ब असल्याचा संशय असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0