"राऊत अजूनही बेशुद्धच!, ते शुद्धीवर आलेले नाहीत!"

02 Mar 2024 13:06:07

Sanjay Raut


मुंबई :
संजय राऊत अजूनही बेशुद्धच आहेत. ते शुद्धीवर आले नाहीत. त्यामुळे त्यांना अजूनही स्वप्न पडतात, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. शुक्रवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या 'लोकसभेचा महासंग्राम' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
 
या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजूनही दिल्लीतले काही नेते उद्धव ठाकरेंवर जाळं टाकत आहेत. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "संजय राऊत अजूनही बेशुद्धच आहेत. ते शुद्धीवर आले नाहीत. त्यांना अजूनही असे स्वप्न पडतात याचं आश्चर्यच आहे. अजूनतरी आमच्याकडे जाळे घेऊन फिरणारे असे नेते नाहीत. महाराष्ट्राचा काही विषय असल्यास मला विचारलं जातं. अद्यापतरी उद्धव ठाकरेंवर जाळं टाकायचं आहे का, हे मला कुणी विचारलेलं नाही. त्यामुळे संजय राऊतांना असं स्वप्न पडलं असलं तरी मला ही वस्तुस्थिती वाटत नाही."
 
ठाकरे मविआसोबत गेल्यानंतर लोकांचा विश्वास उडाला!
 
"उद्धव ठाकरेंनी ज्यादिवशी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यादिवशीच लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर जनतेचा जो विश्वास होता, तोच विश्वास जनतेने उद्धव ठाकरेंवर टाकला होता. पण ते महाविकास आघाडीसोबत गेले त्यादिवशी तो विश्वास कमी झालेला आहे. मला वाटतं की, संजय राऊत जे बोलले ते २०१९ ला च घडून चुकलेलं आहे," असेही ते म्हणाले.
 
तसेच मतभेद संपवता येतात पण मनभेद संपवणं कठीण असतं. उद्धव ठाकरेंनी ज्याप्रकारे रोज मोदीजींवर टीका केली, आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आमचे मनभेद झाले आहेत," असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


Powered By Sangraha 9.0