'अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा उत्कंठावर्धक ट्रेलर भेटीला

    19-Mar-2024
Total Views |
विवेक बेळे लिखित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित
 

alibaba movie 
 
मुंबई : विवेक बेळे लिखित आणि अजित भुरे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ (Alibaba Ani Chalishitale Chor) या नाटकाचे आता चित्रपटात रुपांतर झाले आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ (Alibaba Ani Chalishitale Chor) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
 
२०-२५ वर्षांपासून एकमेकांचे असणारे मित्र वयाच्या चाळीशीत पुन्हा भेटतात आणि काय धमाल मस्ती करतात हे ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटात दाखवले आहे. ‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असे आजकाल म्हटले जाते आणि याचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे. चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे ‘यंगस्टर्स’ धमाल करताना दिसत आहेत. मात्र ट्रेलर पाहाता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतो.
 
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून विवेक बेळे यांनी लेखन केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे निर्माते आहेत.
 
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ''चाळीशी हा आयुष्याच्या असा टप्पा आहे जेंव्हा आलेल्या स्थैर्यामुळे जगण्यात एक विचित्र एकसुरीपणा येतो. आणि मग सुरू होतो 'एक्साईटमेंट' शोधण्याचा खेळ! आणि मग जी धमाल घडते आणि असलेल्या नात्यांचीच पुन्हा नव्याने ओळख होते हे मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक मनमुराद हसतीलही आणि कधी भावनिकही होतील. हा चित्रपट जरी चाळिशी उलटून गेलेल्या चोरांचा आहे तसाच चाळिशीत येऊ घातलेल्या चोरांसाठीही आहे."