मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. मनसे महायुतीत सहभागी होणार का, यासंदर्भात राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. रात्री ११ वाजता अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक होणार आहे. या घडामोडीमुळे मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी याआधीदेखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या आहेत. या भेटीमुळे मनसे-भाजप युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. तसेच, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील याबाबत सूचक विधाने केली आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे देखील लोकसभा जागावाटपाबाबत दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. भाजपने याआधीच राज्यातील २० जागांकरिता आपले उमेदवार घोषित केले आहेत. तसेच, महायुतीतील घटक पक्षांसाठी किती जागा द्याव्यात याबाबत खलबतं दिल्ली सुरू आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुती प्रवेशाबाबत वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुतोवाच करण्यात आलेले आहेत. मनसेची विचारधारा आमच्या विचारांशी सुसंगत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे भाजप-मनसे एकत्र येणार, अशा चर्चा राज्याच्या राजकारणात झडताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत, राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.